सुजय विखे विरुद्ध निलेश लंके या लढाईच्या सेमीफायनलची तयारी जोरात

अहमदनगर ( Ahmednagar ) जिल्ह्यातील जिल्हा परिषद, पंचायत समित्या व नगरपालिकांच्या निवडणुका जवळ आल्या आहेत. ही निवडणूक अहमदनगर जिल्ह्यातील आगामी राजकारणाची नांदी ठरण्याची शक्यता आहे.
Nilesh Lanke and Dr. Sujay vikhe
Nilesh Lanke and Dr. Sujay vikheSarkarnama
Published on
Updated on

अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील जिल्हापरिषद, पंचायत समित्या व नगरपालिकांच्या निवडणुका जवळ आल्या आहेत. ही निवडणूक अहमदनगर जिल्ह्यातील आगामी राजकारणाची नांदी ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे राजकीय डाव प्रतिडाव सुरू झाले आहेत. जिल्ह्यात सर्वत्र महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असे समीकरण दिसत असताना पारनेर तालुक्यात मात्र वेगळी राजकीय समीकरणे पहायला मिळू शकतात. येथे खासदार डॉ. सुजय विखे पाटील गट विरूद्ध आमदार नीलेश लंके गट असा काहीसा सामना रंगताना दिसणार आहे. हे दोन्ही 2024 च्या लोकसभा निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात असतील, अशी चर्चा आतापासूनच आहे. त्याच्या सेमीफायनलची तयारी आता सुरू आहे. Preparations are in full swing for the semi-final match between Sujay Vikhe and Nilesh Lanke

अहमदनगर जिल्ह्याचे राजकारण पक्षापेक्षा व्यक्ती केंद्री राहिले आहे. पारनेर तालुक्यातील सत्ताकारणात अनेक वर्षांपासून विखे कुटूंबाची महत्त्वाची भूमिका राहिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आमदार नीलेश लंके यांना लोकसभा निवडणुकीचे तिकीट देण्याचा शब्द दिल्याची चर्चा आहे. त्यामुळे पारनेर तालुक्यातील आगामी जिल्हा परिषद, पंचायत समित्या व नगरपालिकेच्या निवडणुकीत राजकीय पक्षांपेक्षा व्यक्ती केंद्री व व्यक्तीविरोधी राजकारण दिसण्याची शक्यता आहे. तत्कालीन तहसीलदार ज्योती देवरे यांच्या ऑडिओ प्रकरणानंतर या व्यक्ती केंद्री राजकारणाला वेग आला आहे.

Nilesh Lanke and Dr. Sujay vikhe
आमदार नीलेश लंके यांनी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचाराला केली सुरवात

राजकीय पक्षांची स्थिती

पारनेर तालुक्यात सर्वाधिक जिल्हा परिषद सदस्य शिवसेनेकडे आहेत. त्यातील आमदार लंके यांच्या पत्नी राणी लंके सोडल्या तर उर्वरित सर्व जिल्हा परिषद सदस्य अजूनही शिवसेनेतच आहेत. विखे यांच्या भाजप प्रवेशामुळे पारनेर तालुक्यातील काँग्रेसची शक्ती क्षीण झाली आहे. उलट पक्षी विखे व सुजित झावरे यांच्या भाजप प्रवेशामुळे पारनेर तालुक्यातील भाजपची ताकद वाढली आहे. त्यामुळे पारनेर तालुक्यात सध्या तरी राष्ट्रवादी, शिवसेना व भाजप हेच तीन प्रमुख पक्ष आहेत.

आमदार नीलेश लंकेंचे सुतोवाच

आमदार लंके यांनी नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात जिल्हा परिषद व पंचायत समित्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून कोण उमेदवार उभा आहे ते न पाहता मीच उमेदवार आहे, असे समजून मतदान करा, असे आवाहन केले होते. पारनेरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून आमदार लंके यांचाच चेहरा दाखवून निवडणूक लढविली जाणार हे स्पष्ट झाले आहे. आमदार लंके यांच्या पत्नी जिल्हा परिषद सदस्य आहेत. त्यांचे काही खंदे समर्थकही निवडणूक लढविण्यासाठी तयारीत आहेत. त्या दृष्टीने त्यांनी तयारीही सुरू केली आहे.

Nilesh Lanke and Dr. Sujay vikhe
उत्तरेतील नेत्यांनी दक्षिणेकडील लुडबूड थांबवावी; डाॅ. विखे यांच्यावर अॅड. ढाकणे गरजले 

विखेंची राजकीय खेळी

आमदार नीलेश लंके यांना थांबविण्यासाठी खासदार विखेंनी राजकीय मोट बांधण्यास सुरवात केली आहे. शिवसेना व भाजप यांची युती करून पारनेर तालुक्यातील आगामी निवडणुका लढविण्याची तयारी सुरू केली आहे. खासदार विखे यांनी एका कार्यक्रमात माजी आमदार विजय औटी, माजी आमदार नंदकुमार झावरे यांच्यावर स्तुती सुमनांचा वर्षाव केला. काही दिवसांपूर्वीच त्यांनी भाजप व शिवसेना पारनेर तालुक्यात एकत्र असल्याचे सांगितले होते. यावर शिवसेनेच्या नेत्यांनी निर्णय वरिष्ठ पातळीवरून होतील, असे सांगितले होते.

Nilesh Lanke and Dr. Sujay vikhe
पवार-विखे वादाला तरूणाई मैत्रीत बदलू पाहतेय...

अप्रत्यक्ष वार, प्रतिवार

पारनेरच्या तत्कालीन तहसीलदार ज्योती देवरे यांच्या ऑडिओ प्रकरणानंतर भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी आमदार लंके यांना लक्ष्य करत जोरदार टीक केली. तसेच पारनेरमध्ये येऊन देवरे यांची भेटही घेतली होती. जवळे येथील अल्पवयीन मृत मुलीच्या कुटूंबीयांचीही वाघ यांनी भेट घेतली होती. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे युवक प्रदेशाध्यक्ष मेहबुब शेख यांनी पारनेर तालुक्यातील एका सभेत एक वक्तव्य केले होते. यात त्यांनी देवरे प्रकरणात चित्रा वाघ यांना अहमदनगर जिल्ह्याच्या उत्तरेतील मोठ्या नेत्याने सुपारी दिल्याचा आरोप केला होता.

त्याचवेळी लंके यांचे निष्ठावान कार्यकर्तेही असाच आरोप करत होते. तर त्याच कालावधीत खासदार विखे यांना देवरे प्रकरणाविषयी पत्रकारांनी विचारले असता त्यांनी तहसीलदार देवरे व आमदार लंके यांनी आपापसात बसून हा प्रश्न सोडवावा असा सल्ला दिला होता. तर भाजपचे सुजित झावरे यांनी पारनेरचा बिहार झाल्याचे वक्तव्य केले होते. आमदार लंके यांचे कार्यकर्ते अॅड. राहुल झावरे यांच्यावर पारनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्यावेळी राहुल झावरे यांनी या प्रकरणात ज्योती देवरे व सुजित झावरे यांचे नाव घेतले होते.

Nilesh Lanke and Dr. Sujay vikhe
लंकेंच्या सेल्फीमुळे चित्रा वाघ गरजल्या, म्हणाल्या...

देवरे प्रकरणात आमदार नीलेश लंके यांच्या प्रतिमेला मोठा धक्का बसला. यातच लंके यांच्या जीवनावरील चित्रपट व जवळे येथील मुली मृत्यू प्रकरणात लंके लक्ष घालत नसल्याने त्यांच्या विश्वासार्हतेवर लोक खासगीत शंका घेऊ लागले आहेत. आमदार लंके यांनी कोविड काळात केलेले काम व पारनेर तालुक्यातील विकासासाठी आणलेला निधी यामुळे अजूनही त्यांचे पारडे काहीसे जड आहे.

राज्यात महाविकास आघाडी असूनही पारनेरमधील शिवसेना ही राष्ट्रवादी काँग्रेसपासून दूर राहणेच पसंत करत आहेत. तर आमदार लंके माजी आमदार स्वर्गीय अनिल राठोड यांच्या प्रथम पुण्यतिथीच्या कार्यक्रमात अहमदनगर शहरातील शिवसेनेचे नेते व कार्यकर्त्यांसमवेत दिसून आले. श्रीरामपूर तालुक्यातील राष्ट्रवादीच्या एका मेळाव्यातही आमदार लंके यांनी उपस्थित राहून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले होते. आमदार रोहित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमांना आमदार लंके कर्जतमध्ये होते. त्यावेळी त्यांनी कर्जत-जामखेडच्या मतदारांना तुम्ही भाग्यवान असल्याचे सांगितले होते. आमदार लंके आता केवळ पारनेरपुरतेच मर्यादित न राहता अहमदनगर जिल्ह्यातील विविध कार्यक्रमांत दिसू लागले आहेत.

Nilesh Lanke and Dr. Sujay vikhe
'तहसीलदार देवरे यांच्या बदलीसाठीचा नवस लंकेंनी पोलिसांसह फेडला...'

विखेंचे पारनेरपासून पारनेरपर्यंत

खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केंद्राच्या वयोश्री योजनेची शिबिरे जिल्हाभर यशस्वी करून दाखविली. त्यांनी या योजनेतील शिबिरांची सुरवात पारनेर तालुक्यापासून केली व या शिबिरांची सांगताही पारनेर तालुक्यातच केली.

विखेंचे राष्ट्रीय महामार्गाचे काम

खासदार विखे हे 2024च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी जिल्ह्यातील सर्व राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू करण्याच्या प्रयत्नात आहेत. यातच अहमदनगर शहरातील उड्डणपूल व अहमदनगर-करमाळा रस्त्याचे काम लोकसभा निवडणुकीपूर्वीच पूर्ण करण्यासाठी खासदार विखेंनी विशेष लक्ष घातले आहे. विखे म्हणजे नियोजनबद्ध विकास अशी प्रतिमा ते अहमदनगर जिल्ह्यातील दक्षिणेच्या मतदारांच्या मनात उभी करू पाहत आहेत.

Nilesh Lanke and Dr. Sujay vikhe
कोविड सेंटरवर फोटो काढणे एवढाच काहींचा उद्योग - खासदार डॉ. सुजय विखे पाटील

आमदार लंकेही सर्वसामान्यांतील व सर्वसामान्यांसाठीचा नेता अशी प्रतिमा तयार करू पाहत आहेत. त्यांनी कोविड काळात केलेल्या कामांमुळे ते देशभर पोचले आहेत. राज्यभरात त्यांचा चाहता वर्ग तयार झाला आहे. आमदार लंके यांच्याकडून दक्षिण अहमदनगर जिल्ह्यातील नागरिकांच्या समस्या जाणून त्या सोडविण्याचा सपाटा लावला आहे. दुसरीकडे आमदार लंकेंनी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतील मतदारांचे गणित जुळविण्याचे काम सुरू केले आहे.

आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिका निवडणुकीत पारनेर तालुक्यात राष्ट्रवादी विरूद्ध शिवसेना-भाजप असा सामना रंगविण्याची तयारी सुरू झाली आहे. फक्त प्रतीक्षा आहे, वरिष्ठ नेत्यांनी या निवडणुकीची सर्व जबाबदारी स्थानिक नेत्यांवर टाकण्याची.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com