

Pune News : पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत समाविष्ट झालेल्या २३ गावांच्या नियोजनबद्ध विकासाच्या दृष्टीने आज पालिका सभागृहात एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि मोठा निर्णय घेण्यात आला. या २३ गावांचा प्रलंबित असलेला प्रारूप विकास आराखडा तयार करण्याच्या प्रक्रियेला पुणे महापालिका सभागृहाने एकमताने मंजुरी दिली आहे. यामुळे गेल्या काही वर्षांपासून विकासाच्या प्रतीक्षेत असलेल्या या गावांच्या सर्वांगीण विकासाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे.
विशेष म्हणजे, या संपूर्ण प्रकल्पाची तांत्रिक आणि प्रशासकीय धुरा महापालिकेचे शहर अभियंता अनिरुद्ध पावसकर यांच्याकडे सोपवण्यात आली असून, त्यांची 'नगररचना अधिकारी' म्हणून नियुक्ती करण्यासही सभागृहाने हिरवा कंदील दाखवला आहे.
...आता चेंडू महापालिकेच्या कोर्टात!
दरम्यान या २३ गावांच्या विकासाचा प्रवास अत्यंत राजकीय आणि प्रशासकीय संघर्षाचा राहिला आहे. ३० जून २०२१ रोजी महापालिकेत समाविष्ट झालेल्या या गावांचे नियोजनाचे अधिकार आधी 'पीएमआरडीए'कडे होते. पीएमआरडीएने २०२१ मध्ये प्रसिद्ध केलेला प्रारूप आराखडा नागरिकांच्या हरकती, तांत्रिक त्रुटी आणि तीव्र राजकीय विरोधामुळे सप्टेंबर २०२५ मध्ये थेट रद्द करण्याची नामुष्की आली होती.
अखेर, राज्य शासनाने फेब्रुवारी २०२६ मध्ये पीएमआरडीएकडून हे अधिकार काढून महापालिकेकडे वर्ग केले. त्यानंतर महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी ४ जून रोजी शहर सुधारणा समितीसमोर ठेवलेला प्रस्ताव आज मुख्य सभेने मंजूर केल्याने महापालिकेचा स्वतःचा 'डीपी' तयार करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
बिल्डर लॉबी' आणि स्थानिक राजकारण्यांचे लक्ष
या निर्णयामुळे वाघोली, म्हाळुंगे, सूस यांसारख्या झपाट्याने वाढणाऱ्या आणि रिअल इस्टेटचे हब बनलेल्या २३ गावांमध्ये भविष्यातील रस्ते विकास, पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्था, सार्वजनिक आरक्षणे आणि वाहतूक नियोजनाला एक कायदेशीर आणि शाश्वत दिशा मिळणार आहे. अनियोजित आणि बेकायदेशीर बांधकामांच्या विळख्यात अडकलेल्या या भागाला आता शिस्त लावण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर असेल.
या २३ गावांचा होणार डीपी
म्हाळुंगे, सूस, बावधन बुद्रुक, किरकटवाडी, पिसोळी, कोंढवे-धावडे, कोपरे, नांदेड, खडकवासला, मांजरी बुद्रुक, नर्हे, होळकरवाडी, औताडे-हांडेवाडी, वडाचीवाडी, शेवाळेवाडी, नांदोशी, सणसनगर, मांगडेवाडी, भिलारेवाडी, गुजर निंबाळकरवाडी, जांभुळवाडी, कोळेवाडी आणि वाघोली.
याबाबत सभागृह नेते गणेश बिडकर म्हणाले, पुण्याच्या विस्तार क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी हा निर्णय मैलाचा दगड ठरेल. नागरिकांच्या अपेक्षेनुसार आधुनिक आणि सक्षम नागरी सुविधा निर्माण करण्याच्या दिशेने हे आमचे निर्णायक पाऊल आहे. समाविष्ट २३ गावांच्या दीर्घकालीन विकासासाठी आजचा निर्णय अत्यंत महत्त्वाचा आहे. विकास आराखड्यामुळे रस्ते, पाणी, सांडपाणी आणि भविष्यातील नागरी विकासाला स्पष्ट दिशा मिळणार असून, पुणेकरांना दर्जेदार सुविधा देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.