Sangola News: सांगोला तालुक्यातील सहकारी संस्थांवर शेतकरी कामगार पक्षाने वर्चस्व कायम राखले आहे. सांगोला सहकारी सूतगिरणी, खरेदी- विक्री संघ आणि आता बाजार समितीवरही माजी आमदार गणपतराव देशमुख यांचे नातू बाबासाहेब देशमुख यांनी सहकाऱ्याच्या मदतीने पुन्हा शेकापचा झेंडा फडकवाला आहे. ज्येष्ठ नेते गणपतराव आबा देशमुख यांच्या निधनानंतरही बाबासाहेब देशमुख यांनी सर्वांना सोबत घेऊन तालुक्यावरील पकड सैल होऊ दिलेली नाही. (PWP's Samadhan Patil Chairman of Sangola Bazar Samiti)
सांगोला (Sangola) कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी समाधान पाटील, तर उपसभापतीपदी माणिक वाघमारे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. त्यामुळे शेकापचा सांगोला तालुक्यात पुन्हा बोलबाला दिसून येत आहे.
कृषी उत्पन्न बाजार समितीची (Bazar Samiti) निवडणूक (Election) बिनविरोध व्हावी, यासाठी शेतकरी कामगार पक्षाने राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप आदी पक्षांना घेऊन हालचाली केल्या होत्या. परंतु, या निवडणुकीमध्ये शेकापचे माजी जिल्हा परिषद सदस्य सचिन देशमुख, राष्ट्रवादीचे बाबूराव गायकवाड यांनी परिवर्तन आघाडी स्थापन करून निवडणूक लावली होती. परंतु या निवडणुकीत परिवर्तन आघाडीला यश मिळाले नव्हते. सत्ताधारी शेतकरी विकास आघाडीने सर्वच १८ जागा जिंकल्या होत्या.
शेकापने बाजार समितीच्या निवडणुकीत सर्व पक्षांना सामावून घेऊन निवडणूक लढली असली तरी सभापती व उपसभापतिपद हे स्वतःकडेच ठेवले आहे. या सभापती, उपसभापती निवडीसाठी मोठी रस्सीखेच सुरू होती. सभापतिपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडते, याकडे सर्वांचे लक्ष होते. शेवटी सभापतिपदी समाधान पाटील यांची तर उपसभापतिपदी माणिक वाघमारे यांची वर्णी लागली आहे.
ग्रामपंचायत मतदार संघातून सर्वसाधारण जागेतून विजयी झालेले समाधान पाटील सभापती, तर ग्रामपंचायतच्याच अनुसूचित जाती जमातीच्या प्रवर्गातून विजयी झालेले माणिक वाघमारे उपसभापती झाले आहेत. सभापती व उपसभापती शेकापचे झाल्याने फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण करत जल्लोष केला.
शेकापचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत देशमुख, पोपट देशमुख, पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब देशमुख यांच्या हस्ते नवनिर्वाचित सभापती, उपसभापती व संचालकांचा सत्कार करण्यात आला.
बळीराजाला केंद्रबिंदू मानून कारभार करावा : देशमुख
सांगोला कृषी उत्पन्न बाजार समितीवर शेकापचे वर्चस्व अबाधित आहे. (स्व.) आबासाहेब (गणपतराव देशमुख) यांच्या विचारानुसार बळिराजा व सर्वसामान्यांना केंद्रबिंदू मानून नूतन सभापती, उपसभापती व सर्व संचालक मंडळाने पारदर्शक कारभार करावा, असा सल्ला पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी व्यक्त केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.