मोहोळ (जि. सोलापूर) : मला सध्या कुठल्याही पदाची अपेक्षा नाही. मला माझ्या पक्षाने भरपूर दिले आहे. माझ्या शेतकऱ्यांची दोन कामे आहेत. अनगर आणि दहा गावे उपसा सिंचन योजना व सीना-भोगावती जोड कालवा या योजनेबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या बरोबर मी स्वतः, आमदार यशवंत माने (Yashwanat Mane), आमदार सचिन कल्याणशेट्टी (Sachin Kalyanshetti), आमदार राजेंद्र राऊत (Rajendra Raut) व अन्य दोन आमदार यांची चर्चा झाली आहे. त्यांनी मला या दोन योजना पूर्णत्वास नेण्याबाबत व निधी उपलब्ध करून देण्यासंदर्भात आश्वासित केले आहे. जो कोणी माझ्या शेतकऱ्यांची ही दोन कामे करेल, त्यांच्यासोबत मी जाणार, असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) माजी आमदार राजन पाटील (Rajan Patil) यांनी केला. (Rajan Patil made a secret about joining BJP)
गेल्या काही महिन्यांपासून माजी आमदार पाटील भाजपत जाणार, अशी चर्चा जिल्ह्यात सुरू झाली होती. आता गेल्या १५ दिवसांपासून राजन पाटील हे येत्या १९ फेब्रुवारी रोजी भाजपत प्रवेश करणार, अशी चर्चा तालुक्यात पुन्हा सुरू झाली आहे. लोकनेते बाबूराव पाटील यांची १९ फेब्रुवारी रोजी पुण्यतिथी आहे, तर छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे. त्या संदर्भात त्यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी वरील माहिती दिली. या सर्व घडामोडींमुळे माजी आमदार पाटील भाजपात जाणार, या चर्चेला उधाण आले असून चर्चेला पुष्टी मिळत आहे.
दरम्यान, ता ६ फेब्रुवारी रोजी मोहोळ तालुक्यातील दहा गावांच्या ग्रामपंचायतीचे ठराव जलसंपदा विभागाचे कार्यालय असलेल्या सिंचन भवन येथे दाखल केल्याचे त्यांनी सांगितले, त्यामुळे आता या योजनेच्या सर्व्हेचा मार्ग मोकळा झाला आहे. माजी आमदार राजन पाटील व आमदार यशवंत माने यांच्या प्रयत्नातून अनगर आणि परिसरातील दहा गावांच्या शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायम स्वरूपी निकालात काढण्यासाठी अनगर आणि दहा गावे उपसा सिंचन योजना ही महत्वाकांक्षी योजना तयार केली आहे. ही योजना कार्यान्वीत झाल्यानंतर दहा गावांतील सुमारे २५ हजार एकर क्षेत्र ओलिताखाली येणार असल्याची माहिती माजी आमदार पाटील यांनी दिली.
या संदर्भात माजी आमदार पाटील म्हणाले, अनगरसह देवडी, वाफळे, खंडोबाची वाडी, नालबंदवाडी, कोंबडवाडी, कुरणवाडी, हिवरे, वडाचीवाडी व चिखली ही गावे कायम दुष्काळी छायेतील गावे आहेत. या परिसरातील शेती केवळ पावसावर अवलंबून आहे. एरवी पावसाळ्यातही या गावांना पिण्याच्या पाण्याची भ्रांत असते. ही अडचण ओळखून या गावासाठी उपसा सिंचन योजनेचा आराखडा तयार केला आहे. या योजनेसाठी 0.58 दशलक्ष घनफूट पाणी लागणार आहे. ही योजना आष्टी उपसा सिंचन योजनेच्या विस्तारीकरणात सामाविष्ट असल्याने या योजनेसाठी वेगळे पाणी उपलब्ध करण्याची गरज नाही. तसेच, आष्टी उपसा सिंचन योजनेतील पाणीही वापरण्यात येणार नाही.
या योजनेसाठी सुमारे २०० कोटींच्या निधीची आवश्यकता आहे. या गावांच्या उपसा सिंचन योजनेचा मुख्य उद्भव आष्टी तलाव आहे. तेथून बंदिस्त जलवाहिन्या टाकून पाणी आणण्याची ही योजना आहे. या सिंचन योजनेचा मुख्य चेंबर खंडाळीच्या माळावर काढण्यात येणार असून, तिथून पाण्याचे वितरण होणार आहे. या योजनेचा सर्वे करण्याचा सरकारचा आदेश प्रस्तावित असून एकूण योजनेची किंमत व सुधारित आराखडा सादर करण्याचे आदेश संबंधित विभागाने दिला असल्याची माहिती पाटील यांनी दिली.
या योजनेच्या सर्वेक्षणाचा कालावधी तीन महिन्यांचा आहे. ही योजना कार्यान्वीत झाल्यावर या परिसरात ऊस शेतीसह द्राक्ष, डाळिंब, पेरू, केळी या फळबागांचे क्षेत्र वाढीस लागणार आहे. तसेच, माढा तालुक्याच्या धर्तीवर या सिंचन योजनेच्या पाण्याद्वारे पाझर तलाव, बंधारे भरून घेण्यात येणार आहेत. त्यामुळे वाया जाणारे पाणी वापरात येणार असून विहिरी व बोअर यांच्या पाणी पातळीत वाढ होणार आहे. यावेळी आमदार यशवंत माने यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकध्यक्ष प्रकाश चवरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपाध्यक्ष दत्ता पवार आदीसह अन्य राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.