
Pandharpur, 03 March : नुकत्याच झालेल्या पंढरपूरच्या आमसभेत माजी आमदार प्रशांत परिचारक यांना टार्गेट करण्यात आले होते. मोहोळचे आमदार राजू खरे यांनी थेट परिचारक यांच्यावर टीकास्त्र सोडले होते. परिचारकांनी आपल्या घराकडे जाणारे रस्ते तयार करून घेतले आहेत, असा आरोप केला होता. तसेच, आमदार अभिजीत पाटील हेही पंढरपूरच्या प्रश्नावर आक्रमक होते, त्याला आता आठवडाभराने परिचारक समर्थकांनी उत्तर दिले आहे.
पंढरपूरच्या (Pandharpur) आमसभेत राजू खरे आणि अभिजीत पाटील हे जनतेच्या प्रश्नावर आक्रमक होते. पंढरपूर तालुक्यातील वाळू उपशावरून आमदार खरे यांनी थेट भाजप आमदार समाधान आवताडे यांना खडे बोल सुनावले होते. तसेच, प्रशांत परिचारक यांच्या घराकडे जाणारे सर्व रस्ते करण्यात आले आहेत. शहरातील उद्यानाची कामे निकृष्ट दर्जाची करण्यात आली आहेत, असा आरोप आमसभेत करण्यात आला होता.
आमसभेत उपस्थित असलेल्या काही परिचारक समर्थकांनी त्याला विरोध केला होता, त्यामुळे आमसभेत वातावरण गरम झाले होते. मात्र, आमसभेचे अध्यक्ष या नात्याने आमदार अभिजीत पाटील (Abhijeet Patil) यांनी मध्यस्थी करत कार्यकर्त्यांना शांत केले होते. त्यानंतर सभा पुढे सुरळीत सुरू झाली होती. तब्बल दहा तासांपेक्षा जास्त वेळ ही आमसभा चालली होती.
आमदार राजू खरे यांनी यापूर्वीही माजी आमदार (स्व.) सुधाकर परिचारक यांच्यावरही टीका केली होती. त्याच वेळी मी मोहोळमधील मालकशाही संपवली आहे. आता पंढरपुरातील मालकशाही संपवण्याची भाषा करत प्रशांत परिचारकांना (Prashant Paricharak) आव्हान दिले होते. खरे यांनी केलेली टीका आणि आमसभेत झालेले आरोप याला परिचारक समर्थकांनी आज उत्तर दिले.
माजी आमदार प्रशांत परिचारक यांना आमदार राजू खरे यांनी आव्हान देण्याची भाषा करु नये. खरे यांनी परिचारकांवर टीका करण्यापेक्षा मोहोळच्या विकास कामांवर लक्ष द्यावे. परिचारकांना आव्हान देणारे अनेक जण आले अन गेले. परिचारक आहे, त्याच ठिकाणी आहेत. आमदार राजू खरे यांनी या पुढे आपली मर्यादा ओळखून बोलावे; अन्यथा जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशारा पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती हरिष गायकवाड यांनी दिला.
पंढरपूरच्या आमसभेत केवळ प्रशांत परिचारक द्वेष दिसला. महिलांना चुकीची वागणूक देण्यात आली, महिला अधिकाऱ्यांचा अपमान करण्यात आला, त्यामुळे आम्ही आमदार राजू खरे आणि अभिजीत पाटील यांच्या विरोधात महिला आयोगाकडे तक्रार देणार आहोत. आमदार राजू खरे हे कसे निवडून आले आहेत, हे आम्हालाही माहिती आहे, असा गर्भित इशाराही परिचारक समर्थकांनी या वेळी दिला.
माजी नगरसेवक विक्रम सिरसाट यांनी राजू खरे आणि अभिजीत पाटील यांनी आपल्या मतदारसंघाचं बघावं. त्यांचं पंढरपूरमध्ये काय काम आहे, असा सवाल करत पुढच्या निवडणुकीत ते निवडूनसुद्धा येऊ शकणार नाहीत. ते जिल्हा परिषदही जिंकणार नाहीत, अशी त्यांची स्थिती आहे, असा टोला लागवला होता.
अभिजीत पाटील यांच्या आमसभेच्या अध्यक्षपदावर परिचारक समर्थकांनी आक्षेप घेतला. ते माढ्याचे आमदार आहेत, त्यांचं पंढरपुरात काय कामं. पंढरपूरच्या आमसभेचे आमदार समाधान आवताडे यांनी अध्यक्ष व्हायला पाहिजे होते. आमसभेत अगदीच शिवराळ भाषा वापरण्यात आला, असाही आरोप यावेळी परिचारक समर्थकांनी केला.
माजी आमदार प्रशांत परिचारक आणि त्यांचे कार्यकर्ते हे संयमी आहेत. पण, त्यांच्या संयमाचा गैरफायदा कोणी घेणार असेल तर आम्ही खपवून घेणार नाही. विरोधक ज्या भाषेत बोलतात, त्याच भाषेत त्यांना उत्तर दिले जाईल, असा इशाराही गायकवाड यांनी दिला आहे. या वेळी अर्बन बॅंकेचे अध्यक्ष सतीश मुळे, माजी उपसभापती प्रशांत देशमुख, तानाजी वाघमाेडे, लक्ष्ममण पापरकर, लक्ष्मण धनवडे, माऊली हळणवर, पंडीत भोसले, अनिल अभंगराव, प्राजक्ता बेणारे, सुभाष मस्के, राजू गावडे आदी उपस्थित होते.
Edited By : Vijay Dudhale
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.