तीन वर्षांनंतर राम शिंदे पुन्हा आमदार : कर्जत-जामखेडच्या भाजप कार्यकर्त्यांनी केला जल्लोष
अहमदनगर - कर्जत-जामखेड विधानसभा मतदार संघातील निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा आमदार रोहित पवार ( Rohit Pawar ) यांनी माजी मंत्री राम शिंदे ( Ram Shinde ) यांचा पराभव केला होता. तेव्हापासून राम शिंदे यांना रोहित पवार यांच्या विरोधात ताकद मिळावी यासाठी भाजप कार्यकर्त्यांकडून शिंदेना विधानपरिषदेचे आमदार करण्याची मागणी होत होती. अखेर तीन वर्षांनंतर राम शिंदे हे आज पुन्हा आमदार झाल्याने कर्जत व जामखेड तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. ( Ram Shinde got strength: BJP workers of Karjat-Jamkhed cheered )
राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली विधानपरिषदेच्या पाच जागा भाजपने जिंकल्या आहेत. भाजपने पाचच उमेदवार दिले होते. ते सर्व उमेदवार विजयी झाल्याने भाजपमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. राज्यसभेच्या महाराष्ट्रातील जागांच्या निवडणुकीतील विजयानंतर भाजपचे नेते व कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास द्विगुणीत झाला होता.
भाजपचे पाचही उमेदवार विजयी झाल्याची बातमी कळताच कर्जत व जामखेडमधील भाजप कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी केली. गुलाल उधळत मिठाई वाटली. या दोन्ही तालुक्यातील काही भाजप पदाधिकारी राम शिंदे यांच्या बरोबर मुंबईत आहेत. राम शिंदे हे बुधवारी ( ता. 22 ) चौंडीला येणार आहेत. त्यांचे जल्लोषात स्वागत करण्याची तयारी भाजप कार्यकर्त्यांनी सुरू केली आहे. भाजपचे जिल्हा सरचिटणीस सचिन पोटरे, पप्पू दोधाड, शेखर खरमरे, गणेश शिरसागर, गणेश पालवे, निळकंठ शेळके यांनी कर्जतमध्ये जल्लोष केला.
चौंडीत आनंदोत्सव
राम शिंदे यांचे निवासस्थान असलेल्या चौंडी गावातही आज भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. राम शिंदे यांच्या घरासमोर भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येत गुलाल खेळताना दिसले. भाजपच्या कार्यकर्त्यांच्या डोक्यावरून राम शिंदे यांच्या मातोश्रींनी मायेने हात फिरविला. राम शिंदे यांच्या या विजयाची भाजप कार्यकर्ते मागील काही महिन्यांपासून आतुरतेने वाट पाहत असल्याचे सांगण्यात आले.
मागील अडीच वर्षांपासून कर्जत-जामखेडमध्ये जे भावनिक राजकारण सुरू होते. यात स्वराज्यध्वज, चित्रशिल्प, पैठणीची साडी, गंगाजल या माध्यमातून चाललेले विरोधाकांचे राजकारण हे भूलभूलैया होते. त्यामुळे मतदार संघाचा विकास खुंटला. कुकडीच्या अनियमित आवर्तनामुळे कर्जत तालुक्यातील फळबागा व शेती जळाली. आता विधानपरिषदेवर राम शिंदे यांच्या नियुक्तीमुळे व पाणीदार आमदार म्हणून महाराष्ट्रभर ओळख असल्याने नक्की जनतेला न्याय मिळेल. दादागिरी, दडपशाही व दहशतीच्या राजकारणाला आळा बसेल.
- सचिन पोटरे, सरचिटणीस, अहमदनगर जिल्हा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.