Kolhapur News : राज्यातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सरकारसह प्रशासकीय पातळीवर हालचाली सुरू झाल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांकडूनही जोरदार तयारी सुरू झाली आहे. याचदरम्यान,उद्धव आणि राज या ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या चर्चांनाही उधाण आले होते. अशातच आता केंद्रीय मंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांना (Prakash Ambedkar) एकत्र येण्याचे आवाहन केले होते. आता त्यांनी आंबेडकरांबाबत एक गौप्यस्फोट केला आहे.
केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे त्यांच्या रोखठोक विधानांसाठी ओळखले जातात. ते सोमवारी (ता.16) कोल्हापुरात आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना आगामी काळात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसह प्रकाश आंबेडकरांबाबतही मोठा दावा केला आहे.
आठवले म्हणाले,शिवसेना आणि राष्ट्रवादीसारखे आमच्यात वाद नाहीत,आम्ही वेगळे असलो, तरी आमच्यात समझोता आहे. बाळासाहेब आणि आम्ही एकत्र आल्याशिवाय दबाव गट तयार होणार नाही. हे मी सातत्याने सांगत आलो आहे.
रामदास आठवले (Ramdas Athawale) म्हणाले, आम्ही 90 च्या दशकात एकत्र होतो. त्याचवेळी आम्ही काँग्रेसला पाठिंबा दिला,असता तर आमचे 12 आमदार झाले असते.त्याचवेळी त्यांनी जर माझं ऐकलं असतं, तर ते आज उपमुख्यमंत्री असते. त्यावेळी त्यांनी माझं ऐकलं नाही. त्यामुळे मी पवार,आणि काँग्रेससोबत गेलो आणि मंत्री झालो, असा धक्कादायक गौप्यस्फोट करत पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे.
प्रकाश आंबेडकरांना अनेकवेळा एकत्र येण्याचं आवाहन केलं. पण एकत्र येण्याची त्यांची मानसिकता दिसून येत नसल्याचा आरोपही आठवलेंनी यावेळी केला. तर याचवेळी त्यांनी आपण आपल्या कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव भाजपसोबत गेलो आहे, असंही बोलून दाखवलं.
रामदास आठवलेंनी यावेळी आगामी निवडणुकीत आरपीआयला जास्तीत जास्त जागांवर संधी द्यावी,अशी मागणी करत भाजपबाबत पुन्हा नाराजी व्यक्त केली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये काही ठिकाणी युती म्हणून तर काही ठिकाणी स्वतंत्र लढायचे झाल्यास लढणार आहे. भाजपने जिल्हा नियोजन समितीमध्ये देखील जागा द्याव्यात.
भाजपमधून आम्हाला जागा मिळणार आहेत, त्यांनी त्या द्याव्यात. मी सत्तेसोबत असल्याने माझा पक्ष देशांत वाढला. पण आरपीआयला एकही जागा दिली जात नाही. आरपीआयला डावलून चालणार नाही. सत्तेवर यायचं असेल तर आरपीआयलासोबत ठेवले पाहिजे. कोणाला पाडायचं आणि कोणाला निवडून आणायचं हे आरपीआय छोटा पक्ष असला तरी ठरवू शकतो,असा इशाराही मंत्री रामदास आठवले यांनी दिला आहे.
इंद्रायणी नदीवर पूल कोसळला, त्यात लोकांचा मृत्यू, काहीजण जखमी असल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच संबंधित पूल तपासणीसाठी एक समिती नेमण्यात यावी.हा पूल नवीन बांधण्याची शिफारस करतानाच असा अपघात पुन्हा होणार नाहीत याची काळजी घ्यावी,असेही आठवले म्हणाले.
‘मी आधी काँग्रेसशी युती केली होती, आता मी दोन टर्मसाठी भाजपसोबत आहे. मी राज्यसभा सदस्य आहे. आपण सर्व भारतीय आहोत आणि वैचारिक मतभेद असले तरी, आपण चांगल्या सौहार्दाने राहायला हवे’, असेही मत मंत्री आठवले यांनी म्हटले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.