
Satara, 25 February : साताऱ्याचे भारतीय जनता पक्षाचे खासदार उदयनराजे भोसले आणि विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्यात काही वर्षांपर्यंत विळ्या भोपळ्याचे संबंध होते. मात्र, गेल्या काही वर्षांपासून या दोन्ही राजांमध्ये मनोमिलन झाले असून दोघांचा एकमेकांशी संवादही वाढला आहे. ही दोन्ही छत्रपती घराणी सध्या एकत्र असल्याचे दिसून येत आहे. त्यातूनच रामराजेंनी आपल्या ‘व्हॉट्स ॲप’ला स्टेटस ठेवून उदयनराजेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात त्यांच्या समर्थकांनी साजरा केला. वाढदिवसानिमित्त उदयनराजे यांच्यावर देशभरातील मान्यवरांंकडून शुभेच्छांचा वर्षाव झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याकडूनही खासदार उदयनराजेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
फलटणचे श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर (Ramraje Naik Nimbalkar ) यांनी आपल्या व्हॉट्स ॲपला स्टेट्स ठेवत छत्रपती घराण्याचे थेट वंशज उदयनराजे भोसले यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या स्टेट्समध्ये रामराजे यांनी उदयनराजेंसोबत असलेला फोटो ठेवला आहे. उदयनराजेंना महाराजसाहेब म्हणत औक्षवंत व्हा, जन्मदिनाच्या लाख लाख शुभेच्छा, असे रामराजेंनी आपल्या स्टेट्समध्ये म्हटले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना साताऱ्याचे राजे आणि फलटणचे राजे यांच्यातून विस्तवही जात नव्हता. एकाच पक्षात राहून ते दोघे एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडत नव्हते. साताऱ्यातील विश्रामगृहात तर एकदा बाका प्रसंग उद्भवला होता. दोन्ही राजे गटाचे कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याच्या पावित्र्यात होते. खुद्द उदयनराजे ॲग्रीसिव्ह झाले होते. मात्र, मोठ्या शिताफीने तो प्रसंग टळला होता.
सातारा जिल्हा बॅंक आणि जिल्हा परिषदेतील नियुक्त्यांवरूनही या दोन्ही राजेंमध्ये टोकाचे मतभेद दिसून यायचे. दोन्ही राजे आपल्या कार्यकर्त्यांना संधी देण्यासाठी आग्रही असायचे. मात्र, गेल्या काही वर्षांत उदयनराजे भोसले आणि रामराजे नाईक निंबाळकर यांच्यात मनोमिलन झाले आहे. दोन्ही राजे एकमेकांची ख्यालीखुशाली विचारतात. त्यांच्या अलीकडच्या काळात चांगलाच सुसंवाद वाढला आहे आणि तो साताऱ्याच्या विकासासाठी महत्वपूर्ण मानला जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.