

करमाळा नगरपरिषद निवडणुकीत तीव्र चुरस:
माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या विरोधात सर्वपक्षीय नेते एकत्र आले असून, त्यांच्या पत्नी नंदादेवी जगताप या उमेदवार आहेत.
भाजप उमेदवारीवर पेच:
भाजपकडून जयश्री घुमरे आणि सुनीता देवी या दोघींच्या नावांवर चर्चा सुरू असून, रश्मी आणि दिग्विजय बागल या दोघांनी आपल्या मावशी जयश्री घुमरे यांच्यासाठी मोर्चेबांधणी केली आहे.
तिरंगी लढतीची शक्यता:
सावंत गट, जगताप गट आणि भाजप गट यांच्यात तिरंगी लढतीचे चित्र दिसत आहे, तर काही कार्यकर्त्यांच्या हालचालींमुळे समीकरणे बदलत आहेत.
Karmala, 12 November : नगरपरिषद निवडणुकीत दिवसेंदिवस रंगत वाढताना दिसत आहे. सोलापूर जिल्ह्यातील करमाळा नगरपरिषदेच्या निवडणुकीत माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या विरोधात सर्वपक्षीय नेतेमंडळी एकत्र येताना दिसत आहेत. जगताप गटाकडून त्यांच्या पत्नी नंदादेवी जगताप यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यांच्याविरोधात भाजपच्या महिला प्रदेश उपाध्यक्ष रश्मी बागल आणि शिवसेना नेते दिग्विजय बागल यांच्या मावशी तथा विद्या विकास मंडळाचे सचिव विलास घुमरे यांच्या पत्नी जयश्री घुमरे, कन्हैयालाल देवी यांच्या पत्नी सुनीता देवी यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. भाजपकडून नेमकं कोण उमेदवार असणार, याविषयी उत्सुकता लागली आहे.
करमाळा (Karmala) नगरपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल होण्यापूर्वीच प्रचंड चुरस निर्माण झाली आहे. माजी आमदार जयवंतराव जगताप गटाविरोधात भाजपकडून नगराध्यक्षपदाची उमेदवारी कोणाला मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. इतर पक्षांकडून भाजपच्या उमेदवाराला मदत मिळते का हेही पाहावे लागणार आहे.
माजी आमदार जयवंतराव जगताप (Jaywantrao Jagtap) यांच्या पत्नी नंदादेवी जगताप यांची उमेदवारी जगताप यांच्याकडून जाहीर झाली आहे. सावंत गटाकडून माजी नगरसेवक संजय सावंत यांच्या पत्नी मोहिनी सावंत यांची उमेदवारी निश्चित आहे. निवडणूक प्रभारी अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी नगराध्यक्षपदाचा उमेदवार हा भाजपचाच असेल, असे जाहीर केले आहे. त्यामुळे भाजपकडून कन्हैयालाल देवी यांच्या पत्नी सुनीता देवी की जयश्री घुमरे यांना उमेदवारी मिळणार, याविषयी चर्चा रंगली आहे.
भाजप नेत्या रश्मी बागल (Rashmi Bagal) आणि शिवसेनेचे दिग्विजय बागल (Digvijay Bagal) यांनी आपल्या मावशी जयश्री घुमरे यांना उमेदवारी मिळावी, यासाठी आपापल्या पक्षातून जोरदार मोर्चेबांधणी करत असल्याची माहिती आहे. नगराध्यक्षपद डोळ्यासमोर ठेवूनच काही दिवसांपूर्वी कन्हैयालाल देवी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे भाजपच्या नगराध्यक्षपदाची उमेदवारी आपल्या पत्नी सुनीता देवी यांना मिळावी, यासाठी देवी प्रयत्न करीत आहेत.
दरम्यान भाजपकडून नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक असलेल्या जयश्री घुमरे यांचे पती विलासराव घुमरे हे करमाळ्याच्या राजकारणातील महत्त्वाची भूमिका बजावणारे राजकारणी आहेत. घुमरे यांनी माजी आमदार (कै.) नामदेवराव जगताप, माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्यासोबतही काम केले आहे. रश्मी आणि दिग्विजय बागल यांचे वडील माजी राज्यमंत्री (कै) दिगंबरराव बागल यांना 1995 मध्ये करमाळ्यातून अपक्ष उभा करून निवडून आणण्याची रणनीती त्यांनीच आखली होती. बागलांचे पडद्यामागचे राजकारण घुमरे यांनी चालवले.
दिगंबरराव बागल यांच्या मृत्यूनंतर त्यांची पत्नी श्यामलताई बागल यांना आमदार करण्यात घुमरे यांचा मोठा वाटा होता. रश्मी बागल यांनी लढवलेल्या विधानसभेच्या 2014 च्या निवडणुकीत घुमरे यांनी आपली भूमिका बदलून माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्याबरोबर जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर 2019 मध्ये रश्मी बागल यांच्यासाठी, तर 2024 मध्ये दिग्विजय बागल यांच्यासाठी त्यांनी काम केले होते.
करमाळ्याच्या राजकारणात गेली 40 वर्षांहून अधिक काळ घुमरे हे नाव चर्चेत आहे. त्यांनी यापूर्वी कधीही कुठली निवडणूक लढवली नाही, यावेळी मात्र त्यांच्या पत्नी जयश्री घुमरे यांच्या नावाचा नगराध्यक्षपदासाठी आग्रह धरला आहे, त्यामुळे मावशीला नगराध्यक्षपदाची उमेदवारी मिळावी, यासाठी रश्मी आणि दिग्विजय बागल प्रयत्न करत आहेत.
तिरंगी लढतीची शक्यता?
करमाळा शहरात सावंत गट व जगताप गट एकत्र यावेत यासाठी प्रयत्न सुरू असतानाच, जगताप गटातील काही कार्यकर्ते फुटून सावंत गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे सावंत व जगताप एकत्र येण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सद्य:स्थितीत तिरंगी लढतीचे चित्र दिसत आहे. शेवटच्या टप्प्यात काय तडजोडी होतात का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Q1: करमाळा नगरपरिषद निवडणुकीत प्रमुख उमेदवार कोण आहेत?
A1: नंदादेवी जगताप, जयश्री घुमरे आणि सुनीता देवी यांच्या नावांची चर्चा आहे.
Q2: जयश्री घुमरे यांना कोण पाठिंबा देत आहे?
A2: भाजप नेत्या रश्मी बागल आणि शिवसेनेचे दिग्विजय बागल यांनी त्यांना पाठिंबा दिला आहे.
Q3: कन्हैयालाल देवी यांनी अलीकडे कोणता निर्णय घेतला?
A3: त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करून आपल्या पत्नी सुनीता देवी यांना उमेदवारी मिळावी, यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
Q4: या निवडणुकीत लढत कशी दिसते?
A4: सध्या करमाळा नगरपरिषदेत तिरंगी लढतीचे चित्र स्पष्ट दिसत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.