

Solapur, 01 September : सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. राजेंद्र जगन्नाथ रुपनवर यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेले अधिकारी व संबंधित व्यक्तींवर तत्काळ कठोर कारवाई करण्यात यावी, यासाठी आज (ता. ०१ सप्टेंबर) नातेपुते (ता. माळशिरस, जि. सोलापूर) येथे पंढरपूर-फलटण महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात माळशिरसचे आमदार उत्तमराव जानकर, माजी आमदार राम सातपुते, माजी आमदार ॲड. रामहरी रुपनवर आणि हजारो नागरिकांनी सहभाग घेतला होता.
माजी आरोग्य मंत्र्यांचे ओएसडीने डॉ. राजेंद्र रुपनवर यांच्यावर फिटनेस सर्टिफिकेटसाठी दबाव टाकला होता, त्यानंतरही वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून होणारी छळवणूक याविरोधात सोशल मीडियात पोस्ट करून डॉ. रुपनवर यांनी मुंबईत आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यांना उपचारासाठी सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर त्यांचे मूळगाव असलेल्या माळशिरस तालुक्यात त्याचे तीव्र पडसाद उमटले आणि दोन माजी आमदार, एक आमदाराने एकत्र येऊन रास्तो रोको आंदोलन केले.
या आंदोलनात बोलताना आमदार उत्तम जानकर म्हणाले, डॉ. राजेंद्र रुपनवर यांचा मृत्यू हा व्यवस्थेने घेतलेला बळी आहे. फलटणच्या महिला डॉक्टरांच्या आत्महत्येनंतर आरोग्य विभागाने संवेदनशील होणे गरजेचे होते. मागील दोन महिन्यांपासून डॉ. रुपनवर हे समाज माध्यमावर याविषयी लिहित होते. आपल्या भावना व्यक्त करीत होते.
या प्रकरणातील उपसंचालक डॉ. भगवान पवार, माजी मंत्र्यांचा पीए प्रसाद कोंडे देशमुख व डॉ. लीला मदने या तिघांनी छळ करून त्यांना बडतर्फ करून आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले आहे. या तिघांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. कोणत्याही परिस्थितीत रुपनवर कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे; अन्यथा या विषयावर राज्यभर आंदोलन केले जाईल, असा इशारा आमदार जानकर यांनी दिला.
आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांना अटक करा
डॉ. राजेंद्र रुपनवर यांच्या मृत्यूस कारणीभूत असणाऱ्या वैद्यकीय अधीक्षक, उपसंचालक व इतर घटनेला जे जे लोक जबाबदार आहेत. त्या सर्वांवर कडक कारवाई झाली पाहिजे. मृतास न्याय मिळाला पाहिजे. आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याबद्दल संबंधितांना अटक करून फास्ट ट्रॅक कोर्टात केस चालवली पाहिजे. यासाठी तालुक्यातील शिष्टमंडळासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांना भेटून मी निवेदन देणार आहे, असे माजी आमदार राम सातपुते यांनी सांगितले.
जबाबानंतर लगेच मृत्यू कसा होतो?
माजी आमदार ॲड. रामहरी रुपनवर म्हणाले, डॉ. राजेंद्र रुपनवर यांच्या मृत्यूची चौकशी झाली पाहिजे. डॉ. राजेंद्र हे बरे झाले होते. नातेवाईकांना म्हणाले होते की, मी आता बरा झालो आहे. संबंधितांनी जबाब घेतला आणि जबाबानंतर त्यांना मृत्यू घोषित केले आहे.
मोठ्या नेत्याच्या पीएला फिटनेस सर्टिफिकेट दिले नाही; म्हणून बडतर्फ केले गेले. मंत्र्याच्या पीएला अटक झाली पाहिजे. संशयास्पद मृत्यू झाला आहे. माझी तक्रार नाही, हे खोटे आहे. सिटीस्कॅननंतर मृत्यू कसा होतो. जबाबानंतर लगेच मृत्यू कसा होतो? या सगळ्या गोष्टींची उकल झाली पाहिजे, अशी मागणीही माजी आमदार रुपनवर यांनी केली.
डॉ. राजेंद्रचा मृतदेह ताब्यात घेणार नाही
मयत डॉ. राजेंद्र यांचे मामा ज्ञानदेव सोमाजी पाटील (मांडवे) यांनीही राजेंद्र हा शालेय जीवनात हुशार होता. इयत्ता दहावीत तो राज्यात पाचवा आला होता. अशी माहिती सांगून तो २७ तारखेला घरी येणार होता. परंतु तो घरी न येता २८ तारखेला मुंबईत जाऊन त्याने प्रशासनाच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याचे सांगितले. जोपर्यंत न्याय मिळत नाही. संबंधितांना अटक होत नाही. तोपर्यंत आम्ही डॉ. राजेंद्रचा मृतदेह ताब्यात घेणार नाही, असे सांगितले.
या आंदोलनात माळशिरसचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती मामासाहेब पांढरे, जिल्हा परिषद सदस्य गौतम माने, माजी पंचायत समिती सदस्य माऊली पाटील व तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रास्ता रोको आंदोलनानंतर उपस्थित हजारो लोक सातारा-सोलापूर जिल्हा सरहदीवरील राजुरी येथील टोल नाक्यावर जाऊन तेथे आंदोलन करून आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना निवेदन दिले. या प्रसंगी पोलीस खात्याच्या वतीने मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.