

Karad, 18 May : शेतकरी संघटनेचे नेते पंजाबराव पाटील यांच्या जीवन कार्यावरील पुस्तक प्रकाशन सोहळा हा केवळ साहित्यिक कार्यक्रम न राहता शेतकऱ्यांची राजकारण्यांवरील अंतर्गत अस्वस्थता आणि सरकारविरोधातील खदखद अधोरेखित करणारे व्यासपीठ ठरला. कऱ्हाड (जि.सातारा) येथे माजी खासदार राजू शेट्टी, आमदार सदाभाऊ खोत, राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांच्यासह विविध शेतकरी संघटनांचे नेते एकत्र आले मात्र व्यासपीठावरून सरकारच्या धोरणांवर झालेल्या थेट प्रहार झाले. खोतांबाब ‘सदाभाऊ-सदाभाऊ धुम धडाका’ अशी घोषणा दिली जाते, आज मात्र त्यांचा धडाका दिसलाच नाही, तर त्यांनी मौन बाळगणे पसंत केले.
राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी नीट पेपरफुटी प्रकरणावरून सरकारला लक्ष्य करत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप केला. पेपरफुटीत सहभागी असणाऱ्यांच्या घरावर सरकार बुलडोझर चालवणार का? असा थेट सवाल त्यांनी आमदार खोत यांच्यासमोर उपस्थित केला. मात्र खोत यांनी मला ऐकू आले नाही, असे म्हणत प्रतिक्रिया टाळल्याने उपस्थितांमध्ये हशा पिकला.
त्यानंतर दुसऱ्यांदाही प्रश्न विचारल्यानंतर सदाभाऊ खोत (Sadabhau Khot ) यांनी मौन बाळगल्याने राजकीय अर्थ काढले जाऊ लागले आहेत. महादेव जानकर यांनीही शेतकरी, बहुजन आणि सत्ता समीकरणांचा संदर्भ देत सरकारच्या शक्तीपीठ धोरणावर निशाणा साधला. शेतकऱ्याला मारून शक्तीपीठ उभारण्याचा प्रयत्न हाणून पाडू, असा इशारा त्यांनी दिला. त्यावेळी खोत मोबाईलमध्ये व्यस्त असल्याची चर्चा रंगली.
बळीराजा संघटनेचे बी. जी. पाटील यांनी तर अप्रत्यक्षपणे राजकीय निष्ठांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ‘राम-लक्ष्मण एक आहेत म्हणणारे आता कुठे आहेत?’ असा टोला त्यांनी खोतांकडे पाहून लगावल्याने सभागृहात राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत याच्या नावांची कुजबूज झाली.
या कार्यक्रमातून एकीकडे शेतकरी संघटनांमध्ये पुन्हा एकत्र येण्याचे संकेत दिसले, तर दुसरीकडे सरकाविरोधी अस्वस्थता उघडपणे समोर आली. सदाभाऊ खोत यांनी संपूर्ण कार्यक्रमात बचावात्मक आणि मौनाची भूमिका घेतली.
नव्या समीकरणांची चाहूल
कऱ्हाडमधील कार्यक्रमात राजू शेट्टी, महादेव जानकर, बी. जी. पाटील यांच्यासारखे वेगवेगळ्या विचारांचे शेतकरी नेते एकाच व्यासपीठावर एकत्र आले होते. सरकारच्या विविध धोरणांवर जोरदार टीका होत असताना आमदार सदाभाऊ खोत यांनी संयमी भूमिका घेतल्याचे दिसून आले.
नीट पेपरफुटी, शक्तीपीठ, शेतकरी प्रश्न, राजकीय निष्ठा आणि ग्रामीण भागातील वाढती नाराजी या मुद्द्यांवरून झालेल्या भाषणांनी उपस्थितांमध्ये मोठी चर्चा रंगली. आगामी काळात शेतकरी, बहुजन आणि ग्रामीण प्रश्नांवर एकत्रित येऊन भूमिका घेतली जाण्याची शक्यता आहे, त्यासाठी हा कार्यक्रम महत्वाचा मानला जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.