Sangli News : लोकसभा निवडणुकीतील पराभवाचे कारण शोधण्याचा प्रयत्न सर्वच पक्षांकडून केला जात आहे. सत्ताधारी व विरोधकांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात असल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. त्यातच भाजपकडून लोकसभा निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागलेल्या मतदारसंघात चिंतन बैठक घेतली. त्यामध्ये पराभवाच्या कारणाचा शोध घेतला जात आहे.
सांगली लोकसभा निवडणुकीत भाजपच्या (Bjp) झालेल्या पराभवावरुन तब्बल सात तास शनिवारी चिंतन करण्यात आले. पक्ष निरीक्षक खासदार धनंजय महाडीक (Dhanjay Mahadik ) आणि अतुल भोसले यांच्याकडून प्रत्येक विधानसभा मतदारसंघाचा बंद खोलीत आढावा घेण्यात आला. (Sangli Bjp News)
मराठा, दलित आणि मुस्लिम समाजाची मते विखुरल्याने पराभवाला सामोरे जावे लागल्याचे म्हणणेही नेत्यांनी मांडले. याशिवाय निवडणुकीतील कामांवरुन अनेकांनी नाराजी व्यक्त केली. या बैठकीचा अहवाल प्रदेश भाजपकडे पाठविला जाणार आहे.
येथील खरे सांस्कृतिक भवनमध्ये 'लोकसभा निवडणूक 2024’ च्या विचार मंथन बैठक निरीक्षक खासदार महाडीक, लोकसभा मतदारसंघ प्रभारी अतुल भोसले, पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे, माजी खासदार संजयकाका पाटील (Sanjaykaka Patil), आमदार सुधीर गाडगीळ, पश्चिम महाराष्ट्र समन्वयक शेखर इनामदार यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
निवडणुकीत झालेल्या पराभवाबाबतची माहिती निरीक्षकांकडून सविस्तर घेतली. प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील नेत्यांशी बंद खोलीत सविस्तर चर्चा केली. निवडणुकीतील मते कमी पडल्याबाबतची कारणेही जाणून घेण्यात आली.
काही नेत्यांकडून मराठा, दलित आणि मुस्लिम मते विभागली गेल्याने निवडणुकीत फटका बसल्याचे कारण दिले. पक्षाच्या संघटनेकडून अपेक्षित काम झाले नसल्याचा ठपकाही ठेवण्यात आला, तर काही मंडळींनी उमेदवाराच्या विरोधात काम केल्याबद्दल नाराजी व्यक्त केली.
भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना यावेळी त्यांनी मार्गदर्शन केले. आपल्याला निवडणुकीत जरी अपयश आले असले तरी खचून न जाता जोमाने काम करायचे आहे. नेमके कोणकोणत्या मुद्द्यांवर आपण मागे पडलो, भविष्यात आणखीन कोणत्या सुधारणा करणे आवश्यक आहे, या मुद्द्यांवरही चर्चा झाली. येणार्या काळात मतदारसंघाच्याबाबतीत त्या भूमिकांमध्ये सुधारणा करण्याचा संकल्प करण्यात आला.
जतमध्ये पडळकर यांचे काय काम?
जतचे तम्मनगौडा रवी पाटील यांनी जत विधानसभा मतदारसंघात आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी तयारी सुरु केली असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. त्यांचा खानापूर-आटपाडी मतदारसंघ आहे. तेथे त्यांना नाकारले आहे का? त्यामुळे जतमधून निवडणूक लढविण्याची तयारी असल्याचा आरोपही त्यांनी केला.
पृथ्वीराज देशमुख शेवटी आले अन् निघूनही गेले
भाजपच्या विचार मंथन बैठकीला माजी जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख (Prathvairaj Deshmukh) हे उशिरा आले. काही वेळ थांबले आणि निरीक्षकांच्या काही तरी सांगून काही वेळातच निघून गेले. पृथ्वीराज देशमुख विचार मंथन बैठकीच्या शेवटी आले अन् लगेच निघूनही गेले.
(Edited By : Sachin Waghmare)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.