Vishwajeet Kadam Vishal Patil friendship : महायुतीचा चक्रव्यूह अन् 'मविआ'चा रोष; तावून-सुलाखून निघालेले 'विश्वविशाल' मैत्री!

Political Bond Between Vishwajeet Kadam and Vishal Patil Gains Spotlight Amid Mahayuti-MVA Tensions in Sangli : लोकसभा निवडणुकीत सांगलीतील आमदार विश्वजीत कदम आणि खासदार विशाल पाटील यांची जोडी राज्यात चर्चेत आली.
Vishwajeet Kadam Vishal Patil friendship
Vishwajeet Kadam Vishal Patil friendshipSarkarnama
Published on
Updated on

अजितकुमार झळके

Sangli Congress leaders alliance : गेल्या वर्षी लोकसभा निवडणुकीत सांगलीत रचला गेलेला राजकीय चक्रव्यूह भेदल्यानंतर आमदार विश्वजीत कदम आणि खासदार विशाल पाटील यांची जोडी राज्यात चर्चेत आली. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना त्यांची एकजूट आवडली. ते किती काळ एकत्र राहू शकतील, अशा शंकाही उपस्थित केल्या गेल्या.

परंतु केंद्र आणि राज्यातील विपरीत परिस्थितीत या दोन युवा नेत्यांनी संयम आणि आक्रमण, या दोन्हींचा मेळ साधत अत्यंत सुंदरपद्धतीने राजकीय कसब दाखवली. त्यामुळे त्यांची जोडी 'विश्वविशाल' या नावाने आता सुपरिचित झाली. त्यांच्या मैत्रीचे पर्व काँग्रेसला सांगली जिल्ह्यात मजबुती देऊ शकते का? हे काळच ठरवेल. कदम अन् पाटील घराण्यातील सुप्त संघर्ष संपून मैत्रीचे पर्व किती राजकीय तप एकत्रित पाहणार, याची उत्सुकता सांगलीकरांना आहे.

विशाल पाटील हे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे नातू. त्यांचे वडील प्रकाश बापू पाटील खासदार होते. त्यांच्या निधनानंतर 2006 ला पोटनिवडणुकीत विशाल पाटील (Vishal Patil) यांना लोकसभा लढवायची होती. तेव्हा त्यांना दाबून त्यांचे मोठे बंधू प्रतिक यांना काँग्रेसने संधी दिली. त्यानंतर जवळपास दोन दशकांचा काळ विशाल यांना लोकसभेत जाण्यासाठी वाट पाहावी लागले.

2019ला ते लढले मात्र त्यांना काँग्रेसची (Congress) उमेदवारी मिळाली नव्हती. 2024 ला देखील पुन्हा एकदा त्यांच्याबाबत तोच चक्रव्यूह रचला गेला. या संकटकाळात त्यांच्या मदतीसाठी धावून आले ते, काँग्रेसचे सांगली जिल्ह्यातील प्रमुख नेते आमदार विश्वजीत कदम!

Vishwajeet Kadam Vishal Patil friendship
RSS BJP Congress political clash : 'संघाचा विचार फुटीरतावादी'; श्यामाप्रसाद मुखर्जींच्या उपमुख्यमंत्रीपदाचा हर्षवर्धन सपकाळांनी 'इतिहास'च काढला

कडेगाव, सांगली आणि जत या तीन मतदारसंघात विश्वजीत यांची ताकद महत्त्वाची. शिवाय काँग्रेसचे सगळे गट एकसंघपणे बांधून ठेवण्यासाठीही त्यांची मदत गरजेचे होती. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचा प्रचंड दबाव असताना विश्वजीत कदम यांनी ती परिस्थिती अत्यंत हुशारीने हाताळली. कुठेही ओपन प्रचारात न करता त्यांनी विशाल यांचे मैदान अधिक सुकर होईल, अशा पद्धतीने रचना केली. त्यासाठी त्यांनी भाजपमधील अनेक नेत्यांनाही दुखावले.

Vishwajeet Kadam Vishal Patil friendship
Fadnavis Tambe beyond politics : फडणवीस अन् तांबेंची मैत्री; बीज कुणी पेरलं? भाजप सोडा काँग्रेसचीही नाही आडकाठी!

सत्तेचा दबाव विश्वजीत त्यांच्यावर होताच. विशाल पाटील यांनी इतिहासात कदम कुटुंबियांबाबत केलेल्या काही विधानांचा दाखला देत या दोघांमध्ये वितुष्ट वाढवण्याचा प्रयत्नही केला गेला. या परिस्थितीत दोघांनी इतिहास मागे सोडून भविष्याच्या दिशेने योग्य वाटचाल करण्याबाबत एकविचार दाखवला.

अपक्ष लढणाऱ्या विशाल पाटील यांच्या पाठीशी विश्वजीत यांनी काँग्रेसची संपूर्ण ताकद उभी केली. चक्रव्यूह भेदण्यात विशाल यशस्वी झाले. त्यावेळी त्यांनी विश्वजीत कदम हे माझे पायलट असतील आणि ते माझं विमान दिल्लीत सुखरूप लँड करतील, असा विश्वास बोलून दाखवला होता.

पाटलांचा विशाल संयम

विश्वजीत कदम यांचा ते वारंवार भावी मुख्यमंत्री, असाही उल्लेख करत होते. त्यामध्ये संदेश स्पष्ट होता. जिल्ह्यात काँग्रेसच्या दोन प्रमुख युवा नेत्यांमध्ये भविष्यातील नेतृत्वाची स्पर्धा निर्माण झाली तर विश्वजीत कधीही विशाल यांच्यासाठी वरिष्ठ असतील, असेच सांगण्याचा प्रयत्न या माध्यमातून विशाल यांनी केला. खरंतर विशाल यांची भूमिका त्यांच्या स्वभावाशी विपरीत होती. परंतु विश्व विशाल मैत्रीचे नवे पर्व याच दोन पावले मागे येण्याच्या भूमिकेतून पुढे गेले.

कदमांची राजकीय वाटचाल

विश्वजीत कदम हे राज्याचे वरिष्ठ नेते दिवंगत डॉ. पतंगराव कदम यांचे चिरंजीव. डॉ. कदम यांच्या हयातीत त्यांनी काँग्रेसच्या बांधणीमध्ये आपले योगदान दिले. युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणून अत्यंत चांगली कामगिरी केली. पुणे लोकसभा मतदारसंघातून ही ते लढले होते. मात्र त्यांना यश आले नाही. पतंगराव कदम यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर त्यांनी विधानसभा लढवली आणि यश मिळवले.

कदमांचं बेरजेचं राजकारण

विश्वजीत यांच्यावर एका वेळेस राज्यातील राजकारणात आपले बस्तान बसवतानाच भारती विद्यापीठासारख्या महाकाय संस्थेचा कारभार सांभाळण्याची दुहेरी जबाबदारी आली. ती त्यांनी अत्यंत समर्थपणे पुढे नेली. हे करताना जिल्ह्याच्या राजकारणात काँग्रेससाठी बेरजेचे राजकारण करण्याची भूमिका त्यांनी विशाल पाटील यांच्याशी जुळवून घेत दाखवली. कदम आणि पाटील घराण्यातील सुप्त संघर्ष तसा नवा नाही. दिवंगत मदन पाटील यांच्या काळात या दोन गटांमध्ये मोठा संघर्ष पाहायला मिळाला होता. विश्वजीत यांनी अनेकदा त्याबाबत नाराजी बोलून दाखवली होती.

दोघांची एकत्रित राहुल गांधी भेट

विश्वजीत यांचे चुलते माजी आमदार मोहनराव कदम यांच्या विधानपरिषद निवडणुकीवेळी विशाल यांनी घेतलेली भूमिका विश्वजीत यांना खटकली होती. त्यानंतरच्या काळातही काँग्रेसमध्ये गटबाजी सातत्याने दिसून आली. लोकसभा निवडणुकीनंतर मात्र विश्वजीत आणि विशाल यांच्यात सूर जुळताना दिसले आणि हे पर्व मैत्रीच्या दिशेने जाताना दिसते आहे. लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर विश्वजीत आणि विशाल दोघेही एकत्र सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना भेटायला गेले होते.

मैत्रीचा एकत्र प्रवास

नाराज उद्धव ठाकरे यांची देखील या दोघांनी दिल्लीत एकत्रित भेट घेतली होती. मुंबईत काही माध्यमांना दोघांनी एकत्र मुलाखत दिली होती. अलीकडेही कोल्हापूर मुंबई, सांगली मुंबई, मुंबई दिल्ली, असे अनेक प्रवास या दोघांनी एकत्र केलेले आहेत. महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने दोघांच्यात अनेक बैठकांचे फेरही झाले आहेत. विशाल यांचे होमग्राउंड असलेल्या सांगलीमध्ये विश्वजीत यांचा स्वतंत्र समर्थक गट आहे. भविष्यात विशाल पाटील यांच्या समर्थक गटाशी या गटाचे कसे जुळते हे पाहणे देखील महत्त्वाचे असणार आहे.

'विश्वविशाल' मैत्री पर्व

विश्वजीत कदम आणि विशाल पाटील यांची अलीकडे रंगलेली मैत्री ही सांगलीतील अनेक राजकीय पंडितांना धक्का देणारी मानावी लागेल. या दोघांचे कधी जुळेल, असे कुणालाच वाटत नव्हते. त्यांचे सारे आखाडे चुकीचे ठरवत 'विश्वविशाल' जोडी सध्या तरी मैत्री पर्व जपत फार्मात दिसते आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com