

Nagarpalika Election News : भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी अमरसिंह देशमुख गटावर टीका केल्यानंतर भाजपमधील आटपाडीतील अंतर्गत संघर्ष चांगलाच बळावला होता. त्यामुळे नगरपंचायतीच्या निवडणुकीत पडळकर आणि देशमुख गटाची युती होईल का? याकडे तालुक्याचे लक्ष लागले होते. अखेर सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री आणि उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पडळकर आणि देशमुख यांच्यातील वादाचा तोडगा काढत आटपाडी नगरपंचायत एकत्र लढण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे दोन्ही गट आता एकत्र लढण्याची तयारी करत असून स्वाभिमानी आघाडी गटाला देखील सोबत घेण्यासाठी तयारी सुरू ठेवली आहे.
नगरपंचायतीसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. तत्पूर्वी भाजपमधील देशमुख आणि पडळकर गटातील वाद बाहेर पडला होता. वरिष्ठांनी स्थानिक वादावर तोडगा काढावा, अशी अमरसिंह देशमुख यांनी भूमिका घेतली होती. त्यामुळेच त्यांनी उमेदवारांच्या मुलाखतीकडे पाठ फिरवली होती. करगणी येथील सभेत आपल्यावर केलेल्या टिकेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी कारण सांगावे, अशी त्यांची पक्षश्रेष्ठींकडे मागणी होती. उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया चार दिवस सुरू झाली, तरी देशमुख-पडळकर गटातील वाद मिटला नव्हता.
अखेर नगरपंचायत निवडणुकीचे अर्ज भरण्याची मुदत संपत आली तरी दोन्ही गटावर निर्णय झाला नव्हता. त्यामुळे दोन्ही गट कोणती भूमिका घेणार, याकडे लक्ष लागले होते. अखेर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासमवेत आमदार गोपीचंद पडळकर आणि अमरसिंह देशमुख यांची बैठक झाली. बैठकीत दोघांतील वादावर यशस्वी तोडगा काढला गेला. देशमुख-पडळकर गटांनी नगरपंचायतीची निवडणूक भाजपच्या झेंड्याखाली संपूर्ण ताकदीने लढवण्यावर शिक्कामोर्तब केले.
पडळकर यांच्या गटाला नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिल्याची चर्चा आहे. पडळकर गटातून प्राथमिक शिक्षक बँकेचे माजी अध्यक्ष यू. टी. जाधव यांच्या नगराध्यक्ष उमेदवारीला अमरसिंह देशमुख यांनीही सहमती दर्शवली आहे. त्यामुळेच जाधव यांनी उमेदवारी दाखल करण्याची हालचाल सुरू केली आहे.
त्यांनी तीन महिन्यांचे वेतन राज्य शासनाकडे जमा केले. या प्रक्रियेनंतर राजीनामा मंजूर होऊन ते निवडणूक लढवण्यास पात्र झाले आहेत. त्यामुळेच भाजपमधून नगराध्यक्ष पदाकरिता जाधव हेच भाजपचे अधिकृत उमेदवार असतील यावर शिक्कामोर्तब झाले. दुसरीकडे, स्वाभिमानी आघाडीची भाजपबरोबर जागा वाटपाची बोलणी अंतिम टप्प्यात आली होती. स्वाभिमानी आणि भाजप दोन दिवसांत अधिकृतरीत्या एकत्र येतील, अशी चर्चा आहे. शिवसेनेने मात्र स्वतंत्र लढण्याची तयारी सुरू ठेवली आहे. राष्ट्रवादीने अद्याप भूमिका स्पष्ट केलेली नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.