Mumbai News, 24 Jul : सांगलीतील वाळवा तालुक्यातील तांदुळवाडी येथील जलजीवन मिशनचे काम करणाऱ्या एका सरकारी कंत्राटदाराने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हर्षल पाटील असं या कंत्राटदराचं नाव असून राज्य सरकारकडे असलेली 1 कोटी 40 लाखांची थकबाकी वेळेत न मिळाल्याच्या नैराश्यातून त्याने हे टोकाचे पाऊल उचललं आहे.
या आत्महत्येच्या घटनेवरून विरोधकांनी सरकारवर सडकून टीका केली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी देखील या प्रकरणावरून मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. पंतप्रधानांनी दोन दिवस महाराष्ट्रात येऊन रहावं आणि फडणवीस आणि त्यांच्या दोन डेप्युटींनी या राज्याचं कसं स्मशान केलं आहे ते समजून घ्यावं, अशा शब्दात त्यांनी टीका केली आहे.
माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, हर्षल पाटील या मराठी उद्योजकाने काल आत्महत्या केली. 80 लाखांचे कर्ज घेऊन जलजीवन मिशनमध्ये 1 कोटी 40 लाखांचं काम केलं आणि त्याला बिल मिळालं नाही, महिनोमहिने त्याने सरकारी कार्यालयात चपला झिजवल्या. शेवटी हतबलतेने त्याने आत्महत्या केली.
मुख्यमंत्र्यांनी आज दिल्लीला येण्याऐवजी, त्या हर्षल पाटीलच्या घरी जायला हवं होतं. त्याच्या कुटुंबाचा आक्रोश या निर्दयी सरकारच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी पाहिला असता तर महाराष्ट्रात काय परिस्थिती आहे हे कदाचित त्यांना कळलं असतं. या राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री हे कोणत्या भ्रमात, जगात वावरत आहेत.
पंतप्रधानांनी परवा देवेंद्र फडणवीसांचं खूप कौतुक केलं, त्याच पंतप्रधानांनी दोन दिवस महाराष्ट्रात येऊन रहावं आणि गेल्या पाच महिन्यात ज्या शेतकऱ्यांच्या आणि तरूण उद्योजकांनी आत्महत्या केल्या आहेत त्यांच्या कुटुंबियांना बोलवावं आणि फडणवीस आणि त्यांच्या दोन डेप्युटींनी या राज्याचं कसं स्मशान केल आहे ते समजून घ्यावं, असा हल्लाबोल राऊतांनी केला.
शिवाय हर्षल पाटीलची आत्महत्या हा तर सदोष मनुष्यवध असून त्याला आत्महत्या का करावी लागली, जलजीवन मिशनच्या कामाचे पैसे त्याला वेळेवर का मिळू शकले नाहीत, त्याला कोण जबाबदार, कोणते मंत्री, कोणते अधिकारी जबाबदार आहेत? असा सवाल करत दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणारा का? असा सवाल त्यांनी सरकारला केला.
शिवाय अनेक ठेकदारांनी आत्महत्या केल्या आहेत. काल हर्षल पाटील या तरूणाने आत्महत्या केली. तरीसुद्धा सरकारमधले हे दोन तीन लोकं नरेंद्र मोदींप्रमाणे मौजमजा करत फिरत आहेत, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.