Sangli Murder Case Twist : सांगलीत मंगळवारी (ता.11) मध्यरात्री दलित महासंघाच्या मोहिते गटाचा संस्थापक उत्तम मोहिते याची त्याच्या वाढदिवशीच (38) निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तर या हत्येचा बदला त्याच्या पुतण्याने घेतला आणि त्यामध्ये हल्लेखोर शाहरुख शेखचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जात होतं.
मात्र, आता या हत्या प्रकरणात मोठा ट्विस्ट आला आहे. कारण शाहरूख शेख याची हत्या मोहिते याच्या पुतण्याने नव्हे तर मोहितेवर हल्ला करणासाठी आलेल्या संशयितांपैकीच एकाचा चाकू मांडीत घुसल्याने शाहरूखचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
दलित महासंघाच्या मोहिते गटाचा संस्थापक उत्तम मोहितेचा मंगळवारी वाढदिवस होता. वाढदिवसानिमित्त त्याने घरासमोरच मंडप घातला होता. वाढदिवसानिमित्त त्याला शुभेच्छा देण्यासाठी सायंकाळच्या सुमारास कार्यक्रम स्थळी मोठी गर्दी झाली होती.
याच परिसरातील रेकॉर्डवरील गुन्हेगार गणेश मोरे आणि उत्तम मोहिते यांच्यात वर्चस्वातून काही दिवसापासून वाद होता. काल देखील या दोघांमध्ये वाद झाला यावेळी गणेश मोरे हा उत्तमच्या अंगावर गेला असता उत्तमचा पुतण्या योसेफ मोहितेने त्याला मध्यस्ती करत हा वाद मिटवला. मात्र, रात्री बाराच्या सुमारास पुन्हा गणेश त्याच्या साथीदारांसह हातात शस्त्रे घेऊन उत्तमच्या घराजवळ आला.
यावेळी उत्तमला हे लोक हल्ला करणार हे समजताच तो धावत घरात निघाला मात्र तो दरवाजा बंद करण्यापूर्वीच हल्लेखोरांनी त्याच्यावर हल्ला चढवला. यावेळी हल्लेखोरांनी उत्तमच्या छातीवर, पोटावर आणि हातावर सपासप वार केले. या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला. मात्र, उत्तम मोहितेवर हल्लेखोर हल्ला करत असतानाच एका हल्लेखोराचा चाकू शाहरूख शेखच्या मांडीत घुसला.
त्यामुळे त्याच्या मांडीतून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव सुरू झाला. त्यानंतर जखमी मोहिते आणि शेख दोघांनाही उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. परंतू या दोघांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला. उत्तम मोहितेचा खून झाल्याची बातमी पसरताच गारपीर चौक आणि सिव्हील हॉस्पिटलमध्ये मोठी गर्दी जामा झाली.
त्यानंतर सांगली शहर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत सिव्हील हॉस्पिटलमध्ये बंदोबस्त तैनात केला. त्यानंतर पोलिसांच्या गुन्हे अन्वेषणच्या पथकाने काही संशयितांना ताब्यात घेतलं. दरम्यान, मृत उत्तम मोहितेने त्याच्या घरात बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे शाहरूख शेख याच्यावर झालेला हल्ला रेकॉर्ड झाला. यामध्ये तो घराबाहेर लंगडत आल्याचं दिसत आहे. शिवाय उत्तम मोहितेवर हल्लेखोरांनी हल्ला केलेला थरार देखील या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.
या फुटेजमध्ये शाहरूखच्या मांडीत त्याच्याच साथीदाराचा चाकू घुसल्याचंही दिसत आहे. त्यामुळे आता पोलिसांच्या तपासाला दिशा मिळाली असून शाखरूखची हत्या त्याच्याच साथीदारामुळे झाल्याचं उघडकीस आलं आहे. दरम्यान, मृत उत्तम मोहिते याची पत्नी ज्योती यांनी शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार आठजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर मृत उत्तम मोहिते आणि शाहरूख शेख हे दोघेही रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याची माहिती आता समोर आली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.