

Sangli ZP Election : जिल्हा परिषद निवडणुकीनंतर सांगली जिल्ह्यात महायुतीमधील घटक पक्षांमध्ये भाजपविरोधात असंतोषाचे वातावरण आहे. महायुतीमध्ये भाजपने सर्वाधिक जागा जिंकल्या असल्या तरी सत्ता स्थापनेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेची मदत आवश्यक आहे. मात्र सांगली महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीपूर्वी जागावाटपामध्ये घटक पक्षांना दिलेले दुय्यम स्थान, भाजपने केलेली एकाधिकारशाही यामुळे जिल्हा परिषदेच्या सत्ता स्थापनेत घटकपक्षांकडूनच गेम केला जाण्याची शक्यता आहे.
भाजपच्या जवळ असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांना एकटे पाडून माजी आमदार विलासराव जगताप यांनी भाजपविरोधात राष्ट्रवादीतील नेत्यांची मोट बांधली आहे. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी बोलावलेल्या बैठकीला अनुपस्थितीत राहून जिल्ह्यातील नेत्यांनी भाजपविरोधातील असंतोष स्पष्ट केला. यानंतर माजी आमदार विलास जगताप यांच्यासह जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेतली.
यात जिल्हा परिषदेवर भाजपचा अध्यक्ष होईल असा ठामपणे दावा करणाऱ्या चंद्रकांत पाटील यांना जगताप यांनी टोला लगावला. "आमच्या परस्पर जाऊन आमचा बाजार उठवणे इतके सोपे नाही किंवा आम्ही वेडे नाही. जिल्हा परिषदेचा निर्णय प्रदेश पातळीवर नाही तर जिल्ह्यात होईल असे स्पष्ट केले. तसेच चंद्रकांत पाटील यांनी व्हीपची भीती घालू नये, 40 वर्ष राजकारणात आहे, असे म्हणत इशारा दिला होता.
यानंतर अजितराव घोरपडे यांनी मिरज पंचायत समितीमध्ये काँग्रेसला पाठिंबा देऊन भाजपला धक्का दिला. आमदार सुरेश खाडे यांची पंचायत समितीतील सत्ता उलथवून लावली. याला मोहन वनखंडे यांच्या रुपाने शिवसेनेनेही साथ दिली. आता भाजपचे नेते, आमदार गोपीचंद पडळकर यांना शिवसेना आमदार सुहास बाबर यांचा असलेला विरोध लक्षात घेऊन त्यांच्या मदतीने जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाबाबतही भाजपचा गेम करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर राष्ट्रवादीचे नेत्यांचा आधारवड हरपला आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणात दबदबा ठेवण्यासाठी वरिष्ठ स्तरावरून कोणचाच हात डोक्यावर नसल्याने काहीजण सावध पावले टाकत आहेत. मात्र विलासराव जगताप आणि अजितराव घोरपडे यांनी भाजपच्या विरोधात टाकलेले पाऊल हे इतर नेत्यांच्या भूमिकेला बळ देणारे ठरले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रिकरणाच्या चर्चा आहेत. सांगलीतील दोन्ही राष्ट्रवादीतील नेत्यांचीही हीच भूमिका आहे. केवळ निशिकांत पाटील सोडून इतर सर्व नेत्यांची भूमिकाही जिल्हा परिषदेच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षासोबतच जावे, आमदार जयंत पाटील यांच्याशी जुळवून घ्यावे अशी आहे. आता जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादी कोणती भूमिका घेते हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.