

Sangli ZP Politics : सांगली जिल्हा परिषदेमध्ये सत्ता स्थापनेचा तिढा अजुनही सुटलेला नाही. भाजपला महायुती म्हणून काठावरचे बहुमत आहे. अजित पवारांची राष्ट्रवादी सत्ता कोणाची हे ठरवणार आहे. मात्र, राष्ट्रवादीमध्ये अंतर्गत वाद सुरू असल्याने भाजपच्या हातातून सत्ता जाणार असल्याची चिन्हे आहेत. भाजपच्या बाजुने असलेले राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील हे एकटे पडले आहे.
भाजपच्या नेत्यांकडून महायुतीतील घटक पक्षांवर सुरू असलेल्या दबावाच्या राजकारणाला वैतागून राष्ट्रवादी काँग्रेसकडून जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपाचा करेक्ट कार्यक्रम केला जाण्याची शक्यता आहे.
जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी पाठिंबा भाजपचा द्यायचा की महाविकास आघाडीला द्यायचा? यावरून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटांमध्ये दोन मतप्रवाह निर्माण झाले आहेत. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील हे भाजपसोबत जाण्यासाठी आग्रही आहेत तर इतर सर्व प्रमुख नेत्यांनी महाविकास आघाडी म्हणजेच माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांच्यासोबत जाण्याच्या भूमिकेत आहेत.
निशिकांत पाटील हे जयंत पाटील यांचे कट्टर राजकीय विरोधक आहेत. त्यामुळे अजित पवार गटांमध्ये निशिकांत पाटील हे एकटे पडल्याचे चित्र आहे.
विधानसभा निवडणुकीपासून भाजपचे नेते आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्या सातत्याने टीका टिप्पणीमुळे महाविकास आघाडीतील राष्ट्रवादीमध्ये प्रचंड रोष आहे. तर सांगली महानगरपालिकेमध्ये भाजपकडून इतर घटक पक्षांना समान न्यायाची भूमिका मिळाली नसल्याने महायुतीतील घटक पक्ष देखील भाजपवर नाराज आहेत. शिवाय आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर देखील काही अंतर्गत नाराजी आहे.
जिल्हा परिषदेच्या राजकारणात सध्या महायुतीकडे काठावरचे बहुमत आहे. महाविकास आघाडीला बहुमतासाठी केवळ एका जागेची कमतरता आहे. अशातच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत जिल्हा परिषदेवर सत्ता स्थापन करण्याच्या हालचाली सुरू आहेत.
जिल्हा परिषदेच्या निवडणुकीनंतर एक महिना उलटला तरी अद्याप महायुतीचे सत्तेचे गणित जुळत नसताना दिसत आहे. त्यातच भाजपची सत्ता स्थापन करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून कोणताच प्रतिसाद मिळत नाही. जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील हे भाजपसोबत सत्ता स्थापन करण्यासाठी आग्रही आहेत. मागील आठवड्यात पक्षाचा व्हीप आपल्याकडेच ठेवण्यासाठी त्यांची धडपड दिसून आली. तर राष्ट्रवादीचे इतर नेते माजी खासदार संजय पाटील, माजी मंत्री अजितराव घोरपडे, शिवाजीराव नाईक, माजी आमदार विलासराव जगताप, राजेंद्र अण्णा देशमुख आदी नेत्यांकडून महाविकास आघाडीसोबत जाण्याचे संकेत मिळत आहेत.
मागील आठवड्यात प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी जिल्हा परिषदेच्या सत्ता स्थापने संदर्भात मुंबईत बैठक बोलावली होती. मात्र या बैठकीकडे जिल्ह्यातील सर्वच राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पाठ फिरवली. जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील हे प्रदेशाध्यक्षांच्या निर्णयावरच निर्णय घ्यावा, अशा भूमिकेत आहेत. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी स्थानिक स्थिती लक्षात घेऊन जिल्ह्यातील नेत्यांनी निर्णय घ्यावा, अशा सूचना दिल्या आहेत.
स्थानिक नेत्यांना प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी अधिकृत निर्णय कळवलेला नाही. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याशी चर्चा करून पुढील निर्णय होणार आहे.
सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेस कडून जिल्हा परिषदेवर पहिला अध्यक्षपदाचा मान जो पक्ष देईल त्याला पाठिंबा देण्याची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी घेतली होती. मात्र त्यानंतर आमदार गोपीचंद पडळकर यांना राष्ट्रवादीतील काही नेत्यांचा विरोध आहे. भाजपकडे सध्या 16 जिल्हा परिषद सदस्य आहेत. यामध्ये पडळकर यांचे आठ सदस्य आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस कडून सत्ता स्थापन करण्यासाठी पडळकर यांना विरोध केला जात आहे. मात्र भाजप सहज सहजी पडळकर यांना सोडेल अशी शक्यता कमीच आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.