"नगर शहरातील विविध कामांसाठी राज्य सरकारने पूर्वी 40 कोटी रुपये मंजूर केले होते. यात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या सुशोभीकरणाचादेखील समावेश होता. परंतु काही ब्लॅकमेलरांनी विभागीय आयुक्तांकडे चुकीच्या तक्रारी केल्या. त्यामुळे मंजूर कामातील काही कामे वगळली गेली. यात स्मारकाच्या सुशोभीकरणाचे काम वगळले केले आणि ते होऊ शकले नाही," असा सनसनाटी आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप (Ajit Pawar Group) यांनी केला.
नगर शहरात महापालिकेकडून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळा उभारला जात आहे. या कार्यक्रमाच्या माहितीसाठी आयोजिलेल्या पत्रकारपरिषदेत आमदार जगताप यांनी माहिती दिली. यावेळी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.
या पुतळ्याच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम शनिवारी (ता. 20) सायंकाळी पाच वाजता होत आहे. या कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी झालेल्या पत्रकारपरिषदेत महापालिका अधिकारी उपस्थित होते. परंतु ते मौन बाळगून होते. कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रमाची माहिती दिली.
पालकमंत्री, खासदारांचा उपस्थितीपासून अनेक मुद्दे यातून निसटले. ऐनवेळी हे मुद्दे उपस्थित झाल्यानंतर नगर जिल्ह्यातील मंत्री, खासदार यांच्यासह सर्व लोकप्रतिनिधींना निमंत्रण असणार असल्याचे सांगून बाजू सावरण्यात आली.
नगर शहरातील मार्केट यार्ड चौकात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारला जात आहे. या पुतळ्याच्या कामाचे भूमिपूजन कार्यक्रम शनिवारी (ता. 20) सायंकाळी पाच वाजता क्रीडामंत्री संजय बनसोडे यांच्या उपस्थितीत होणार असल्याची माहिती कृती समितीचे अशोक गायकवाड यांनी दिली.
आमदार संग्राम जगताप, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रदीप पठारे, अभियंता परिमल निकम, श्रीकांत निंबाळकर, सुरेश बनसोडे, कुमारसिंह वाकळे, प्रशांत गायकवाड, संजय कांबळे या पत्रकारपरिषदेला उपस्थित होते.
अशोक गायकवाड म्हणाले, "नगर शहरात उभारण्यात येत असलेल्या पूर्णाकृती पुतळा हा सर्वोच्च न्यायालयाच्या प्रांगणात उभारलेल्या पूर्णाकृती पुतळ्याची प्रतिकृती असणार आहे. राज्यात प्रत्येक जिल्ह्यात बाबासाहेबांचा पूर्णाकृती पुतळा आहे. नगर शहर त्याला अपवाद होते.
आता हा पूर्णाकृती पुतळा उभा राहत असल्याने नगर शहराच्या वैभवात भर पडणार आहे. तसेच पुतळ्याभोवती सुशोभीकरण होणार आहे. भूमिपूजन कार्यक्रमाच्या दिवशी सायंकाळी गायक अजय देहाडे यांच्या 'तुफानातील दिवे' हा भीमगीतांचा कार्यक्रम होईल.
या पुतळ्याच्या कामासाठी अनेक अडथळे आले. जागा, जागेवरील अतिक्रमणे, कोर्ट-कचेरी, अशा अनेक वादानंतर हा पुतळा उभा राहत असल्याने नगरकरांसह आंबेडकरी जनतेमध्ये आनंदाचे वातावरण आहे."
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
असा असेल पूर्णाकृती पुतळा...
नगरमध्ये उभारला जाणारा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा हा सर्वोच्च न्यायालयाच्या आवारात उभारलेल्या पुतळ्याची प्रतिकृती असणार आहे. पुतळा ब्राँझ आणि लोखंडापासून बनवलेले असून त्याचे वजन अडीच टन एवढे आहे. पुतळ्याची उंची दहा फूट आहे. पुतळ्यासाठी 18 फुटांचा चौथरा उभारण्यात आला आहे. चौथरा ते पुतळ्यापर्यंतचा खर्च 70 लाख रुपये आहे. पुतळ्याभोवती सुशोभीकरण करण्यात येणार असून त्याचा खर्च वेगळा असेल.
काय झाले पत्रकारपरिषदेत?
नगर महापालिकेकडून हा पुतळा उभारला जात आहे. महापालिकेने यासाठी जागा दिली असून तिच्यावर अतिक्रमण हटविण्यासाठी न्यायालयीन पातळीवर बराच संघर्ष झाला. पुतळ्याचे भूमिपूजनाची माहिती देण्यासाठी ही पत्रकार परिषद आयोजिली होती. महापालिकेचे अधिकारी मात्र या पत्रकारपरिषदेत मौन साधून होते.
कृती समितीचे पदाधिकारी माहिती देताना, नगरच्या स्थानिक नेते आणि अधिकारी यांची नावे आवर्जुन घेतली. परंतु पालकमंत्री, खासदार आणि इतर लोकप्रतिनिधींचे नाव टाळले गेले. याकडे लक्ष वेधल्यावर कृती समितीकडून जिल्ह्यातील सर्वच लोकप्रतिनिधींनी निमंत्रण असणार असल्याचे सांगण्यात आले.
संविधान धोक्यात आहे का? उत्तर...
देशात विरोधकांकडून नेहमीच संविधान आणि लोकशाही धोक्यात आहे, असा आरोप केला जात आहे. या प्रश्नांवर कृती समितीचे पदाधिकारी अशोक गायकवाड यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आवारातील आणि नगर शहरात उभारले जात असलेले भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा या आरोपांना उत्तर आहे, असे सांगितले. तरी हा प्रश्न गंभीर आहे. यावर स्वतंत्र पद्धतीने मांडणी करेल, असेही गायकवाड म्हणाले.
edited by sachin fulpagare
R...
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.