Maan BJP News : अयोध्येत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते प्रभू रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा झाली आणि त्याच क्षणी आमदार जयकुमार गोरे आणि माणच्या जनतेचे स्वप्न साकार झाले. माण तालुक्याच्या दुष्काळाची दाहकता कमी करण्यासाठी कृष्णामाई आंधळी धरणाकडे झेपावली. अनेक वर्षांच्या अथक संघर्ष आणि प्रयत्नानंतर आलेल्या जिहे-कठापूर उपसा सिंचन योजनेच्या पाण्याचे माणवासीयांनी जल्लोषात स्वागत केले.
जिहे-कठापूर योजनेचे पाणी खटाव तालुक्यातील नेर धरणात पोहोचले आहे. सोमवारी दुपारी 12 वाजून 29 मिनिटांनी हे पाणी महिला आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत आंधळी बोगद्यात सोडण्यात आले. यावेळी सोनिया गोरे, कृष्णा सिंचन विभागाचे वरिष्ठ अधिकारी, अपर्णा भोसले, सारिका मलकमीर, गौरी जगदाळे, अरुणा जगदाळे, रत्नमाला जगदाळे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
गेल्या 14 वर्षांत आमदार जयकुमार गोरे यांना अथक प्रयत्न करून जिहे-कठापूर योजनेसाठी लागणारा निधी मिळविण्यात यश आले. या योजनेची रखडलेली अनेक कामे मार्गी लागून एका नलिकेद्वारे पाणी नेर धरणात पोहोचले होते.
हे पाणी आंधळी धरणात नेण्यासाठी बोगद्याचे काम पूर्ण केल्यानंतर सोमवारी माण तालुक्यासाठी पाणी सोडण्यात आले. या पाण्याने आंधळी धरण भरल्यानंतर पंतप्रधान मोदींच्या हस्ते गुरुवर्य लक्ष्मणराव इनामदार जिहे-कठापूर उपसा सिंचन योजनेचे 19 फेब्रुवारी रोजी जलपूजन करण्यात येणार आहे.
जिहे-कठापूरचे पाणी आंधळी धरणात पोहोचल्याने माणगंगा नदी प्रवाहित होणार आहे. हेच पाणी उचलून तालुक्याच्या उत्तर भागातील 32 गावांना देण्याची वाढीव योजना प्रगतिपथावर आहे. सर्वेक्षण करून उर्वरित वंचित गावेही जिहे-कठापूरच्या लाभक्षेत्रात आणण्याचे आमदार जयकुमार गोरेंचे प्रयत्न अंतिम टप्प्यात आले आहेत.
वर्षानुवर्षे दुष्काळाच्या दुष्टचक्रात अडकलेल्या माणच्या जनतेला आज आंधळी धरणात आलेल्या पाण्याने मोठा दिलासा मिळाला आहे. रात्री पाणी आंधळी धरणात पोहोचताच माणवासीयांनी फटाके फोडून आणि पेढे वाटून जल्लोष साजरा केला.
नेर धरणातून जिहे-कठापूर योजनेच्या पाण्याचा भला मोठा प्रवाह आंधळी धरणाकडे झेपावताच उपस्थित महिलांच्या चेहऱ्यावर समाधान झळकले. अनेक महिलांना आनंदाश्रू आवरता आले नाहीत. आमदार जयकुमार गाोरे यांच्या अथक प्रयत्नांना पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलेले पाठबळ निर्णायक ठरले. आमच्यावरील दुष्काळाचे मळभ दूर झाले. आमचे आणि भविष्यातील पिढ्यांचे कल्याण झाल्याची भावना अपर्णा भोसले, सारिका मलकमीर आणि महिलांनी व्यक्त केल्या.
(Edited By : Ganesh Thombare)
R...
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.