कोल्हापूर : कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील (Satej Patil) यांनी आपल्या विधान परिषदेच्या उमेदवारी अर्जाबरोबर सादर केलेल्या शपथपत्रामध्ये स्थावर मालमत्तेची आणि कर्जाची माहिती लपवली आहे. त्यांनी महापालिकेचा घरफाळाही थकवला आहे. निवडणूक आयोगाच्या नियमाप्रमाणे हे चुकीचे आहे. त्यामुळे पाटील यांचा उमेदवारी अर्ज अवैध असल्याचा आरोप माजी खासदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांनी आज (ता.24 नोव्हेंबर) पत्रकार परिषदेत केला. तसेच, याबाबत आम्ही न्यायालयात जाणार असून निवडणूक आयोगाकडेही याची तक्रार करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
धनंजय महाडिक म्हणाले, पाटील यांनी उमेदवारी अर्ज भरताना आपले उत्पन्न, मालमत्ता, कर्ज, शासकीय देयकाची थकित रक्कम याची खरी माहिती शपथपत्रावर द्यायची असते. मात्र, पाटील यांनी शपथपत्रातच अपूर्ण माहिती दिली आहे. याबाबत भाजप उमेदवार अमल महाडिक यांनी हरकत घेतली. त्याबाबतचे पुरावेही जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. त्यानुसार कसबा बावडा येथील सर्व्हे नं.५४८/२/१४ क्षेत्र ०.०५ आर. या मिळकतीची माहिती त्यांनी लपवली आहे. तसेच, कावळा नाका (ताराराणी चौक) येथील सिटी सर्व्हे नं. २१०४/१५ या मिळकतीतील क्षेत्र व त्यातील त्यांचा हिस्सा याबाबत खोटी माहिती दिली आहे. या ठिकाणी सयाजी हॉटेल व डी.वाय.पी सिटी मॉल हे व्यावसायिक इमारत आहे. शिवाय कॉसमॉस को.ऑप.बँक येथून घेतलेल्या कोट्यावधी रुपयांच्या कर्जाचा उल्लेखही शपथपत्रात नाही. कावळा नाका येथील मिळकतीचा घरफाळा न भरल्याने त्यांना महाराष्ट्र महापालिका कायदा अंतर्गत १५ (२) प्रमाणे नोटीस बजावली आहे. त्याचा व थकीत रक्कमेचा उल्लेखही शपथपत्रात नाही. त्यांनी सीटी.सर्व्हे नं.२१०४/१५ या मिळकतीची वाटणी आपापसात केली असून ती शंभर रुपयांच्या स्टँपवर केल्याचे निदर्शनास आले.
याबाबत मुद्रांक जिल्हाधिकारी कोल्हापूर यांनी त्यांना बुडवण्यात आलेल्या मुद्रांक वसुलीबाबत नोटीसही पाठली आहे. त्याचा आणि देय रक्कमेचा उल्लेख शपथपत्रात नाही. या सर्व बाबी जिल्हाधिकाऱ्यांना पुराव्यासह हरकतीच्या माध्यमातून निरदर्शनास आणून दिल्या. मात्र, कायद्याने निर्णय देण्यास असमर्थ असल्याने न्यायालयात न्याय मागणे योग्य होईल असे सांगून कार्यवाही पूर्ण केली.
त्यामुळे आम्ही या विरोधात गुरुवारी (ता.२५ नोव्हेंबर) उच्च न्यायालयात दाद मागणार आहोत.' असे महाडिक म्हणाले. यावेळी माजी महापौर सुनिल पाटील, माजी नगरसेवक प्रा. जयंत पाटील, सत्यजीत कदम, पृथ्वीराज महाडिक आदी उपस्थित होते.
दरम्यान, महाडीक यांना आपला पराभव दिसत असल्याने ते कायद्याची भाषा बोलत असल्याची टीका सतेज पाटील यांनी केली आहे. या दोन्ही मातब्बर नेत्यांच्या शांब्दीक चकमकीने व आरोप प्रत्यारोपाने कोल्हापूर जिल्ह्याचे व राज्याचे मात्र, लक्ष वेधले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.