

Satej Patil on Drought: राज्यात सध्या दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होत आहे. यावरुन विरोधी नेत्यांनी सरकारकडे दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे. यातच राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर बोलताना काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली आहे. दुष्काळी परिस्थितीच्या नियमावर बोट ठेवले जात असेल तर, राज्यातील सरकार किती नियमावर चालते? याची आम्हाला माहिती आहे.
निवडणुकीच्या तोंडावर मतासाठी लाडक्या बहिणींना अचानक पैसे देताना नियम नाहीत सरसकट महिलांना पैसे देण्यात आले मात्र, शेतकरी दिसला की तुम्हाला नियम दिसतात. निवडणुक नसल्यामुळेच शेतकऱ्यांसाठी दुष्काळ आहे अशी टीका पाटील यांनी केली.
दुष्काळ दौरा करून निधी जाहीर करण्यापेक्षा यापूर्वीच शेतकऱ्यांसाठी तात्काळ मदत करावी. परतीचा मान्सून नसल्यामुळे यंदा कमी होणाऱ्या उत्पादनाची नुकसान भरपाई देण गरजेचं आहे. अशी देखील मागणी सतेज पाटील यांनी केली.
सुपर अलनिनो याबाबत सरकारला या सगळ्या परिस्थितीची माहिती होती. हवामान खात्याने आधीच अंदाज व्यक्त केला होता.
मात्र आज सरकारला शेतकऱ्यांच्या बांधावर जाण्याचा मुहूर्त मिळाला. पंचनामे होई पर्यंत शेतकऱ्यांना तातडीने मदत करावी. कर्नाटक सरकारने दुष्काळ जाहीर केला. त्यांचा अहवाल केंद्राकडे गेला त्यानंतर आता सरकारला जाग आली. सरकार झोपलेलं आहे त्यांना आता आम्हाला जाग करावं लागेल. असा आरोप आमदार पाटील यांनी केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यावर देखील आमदार सतेज पाटील यांनी टीका केली. दुष्काळजन्य परिस्थिती ही 15 दिवसांपूर्वीच अधिक बिकट झाली आहे. त्यावर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पत्रव्यवहार केल्यानंतर सरकारला जाग आली.
दौऱ्याला निघण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांसाठी मदत जाहीर करायला हवी होती. मात्र मी दौरा केल्यावर मदत करणार ही भूमिका आहे का? म्हणजे त्याचे श्रेय घेण्यासाठी हे सगळ सुरू आहे का? असा सवाल आमदार सतेज पाटील यांनी केला.
राज्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदार संघातील निवडणुकांवर बोलताना ते म्हणाले महाविकास आघाडी म्हणून आम्ही पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाची निवडणूक एकत्र लढणार आहोत. दोन दिवसात याबाबत आमची बैठक होईल.
शिक्षकांच्या प्रश्नावर सरकारने काहीही काम केलं नाही. शिक्षणाच्या बाबतीत सरकारची अनास्था दिसून आली आहे. पेपर फोडले जातात. MPSCसारख्या नोकर भरतीच्या जाहिरातीमध्ये काही त्रुटी ठेवून ती भरती रखडवली जाते. त्यामुळे हे सरकार नॉन सिरिअस आहे. जुनी पेन्शन लागू करण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले होते त्याचे पुढे काय झालं पदवीधरांना अजूनही नोकरीची प्रतीक्षा आहे. या समस्यांकडे बघता पदवीधर मतदारदेखील आमच्या बाजूने उभा राहतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.