सतेज पाटलांची भाजपच्या सात नगरसेवकांसह युवा नेत्याबरोबर खलबते!

सतेज पाटील यांनी आपल्या विश्वासू माजी नगरसेवकाला अपक्षांना गळाला लावण्यासाठी हुपरीत कामाला लावले आहे.
satej patil
satej patilSarkarnama

शिरोळ : विधान परिषदेच्या प्रचाराला कोल्हापुरात चांगलाच ज्वर चढला आहे. महाविकास आघाडीचे संभाव्य उमेदवार पालकमंत्री सतेज पाटील यांनी शनिवारी ज्येष्ठ नेते कल्लाप्पाण्णा आवाडे यांचे आशीर्वाद घेतल्यानंतर आज कुरुंदवाडमध्ये भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी थेट शिरोळ गाठत भाजपचे सात नगरसेवक आणि भाजपचे कोल्हापूर जिल्हा युवाध्यक्ष पृथ्वीराज यादव यांच्याशी बंद खोलीत खलबते केली. पाटील यांनी प्रचारात भाजपच्या तुलनेत आघाडी घेतली आहे. (Satej Patil discusses with seven BJP corporators and young leaders)

दरम्यान, पालकमंत्र्यांनी कोल्हापुरातील आपल्या विश्वासू माजी नगरसेवकाला अपक्षांना गळाला लावण्यासाठी हुपरीत कामाला लावले आहे. आता पाटलांच्या गळाला कोण कोण लागते, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

शिरोळ नगरपरिषदेच्या सत्ताधारी राजश्री शाहू आघाडी व विरोधी भाजप नगरसेवकांच्या भेटीसाठी पालकमंत्री पाटील आज (ता. १४ नोव्हेंबर) शिरोळ येथे आले होते. ‘गोकुळ'चे माजी संचालक अनिल यादव यांच्या निवासस्थानी भाजपच्या सात नगरसेवकांशी तसेच भाजपचे जिल्हायुवा अध्यक्ष पृथ्वीराज यादव यांच्याशी त्यांनी बंद खोलीत चर्चा केली.

satej patil
सतेज पाटलांची भाजप नेत्याबरोबर बंद खोलीत चर्चा!

शिरोळचे लोकनियुक्त नगराध्यक्ष अमरसिंह पाटील यांच्या वाड्यावर मंत्री पाटील यांनी हजेरी लावली. येथे उपनगराध्यक्ष राजेंद्र माने यांच्यासह राजश्री शाहू आघाडीच्या नगरसेवकांशी चर्चा केली. सर्जेराव शिंदे, मुरलीधर जाधव, वैभव उगळे आदी उपस्थित होते. महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर, प्रत्येक नगरपरिषदेला व जिल्हा परिषद सदस्यांना विकास निधी देऊन सहकार्य केले, यामुळे शिरोळ तालुक्यातील मतदार १०० टक्के सहकार्य करतील, असा विश्वास सतेज पाटील यांनी व्यक्त केला.

satej patil
राज्यमंत्री यड्रावकर आमच्यासोबतच; त्यांच्याशी कोणतेही मतभेद नाहीत

सतेज पाटील यांचे विश्वासू कोल्हापूरचे माजी नगरसेवक राजू लाटकर यांनी अपक्ष नगरसेवकांशी संपर्क साधला आहे. हे नगरसेवक कुणाच्या गळाला लागणार याची चर्चा सुरू आहे. हुपरी पालिकेत मनसेप्रणित अंबाबाई आघाडीचे पक्षप्रतोद दौलत पाटील, अमर गजरे तर अपक्ष संदीप वाईंगडे व सपना नलवडे असे चार नगरसेवक आहेत. पालिकेत ते विरोधी गटात आहेत. विधान परिषद निवडणुकीत ते कोणत्याही पक्षाशी अथवा उमेदवाराशी बांधील नाहीत. त्यामुळे या नगरसेवकांना महत्त्‍व आले आहे. लाटकर यांनी अपक्ष नगरसेविका नलवडे यांची भेट घेतली. त्यांनी सतेज पाटील यांना साथ देण्याचे आवाहन केले. अपक्ष नगरसेवक वाईंगडे तसेच मनसेचे दौलत पाटील व गजरे हे बाहेरगावी असल्याने लाटकर यांची त्यांच्याशी भेट होऊ शकली नाही.

satej patil
प्रकाश आवाडेंनी भाजपला पाठिंबा देताच सतेज पाटील कल्लाप्पाण्णांच्या भेटीला!

वडगाव नगरपालिकेच्या १७ व २ स्वीकृत सदस्यांची भेट पाटील यांनी घेतली. सत्ताधारी युवक क्रांती महाआघाडीचे १३ व २ स्वीकृत सदस्य, विरोधी यादव आघाडीचे ४ सदस्यांची वेगवेगळ्या ठिकाणी भेटी घेऊन सहकार्य करण्याची विनंती पाटील यांनी केली. महाआघाडीची भेट राजाराम चित्रमंदिर येथे तर यादव आघाडीची भेट देवगिरी बंगल्यावर घेतली. या वेळी आमदार राजूबाबा आवळे, सर्जेराव माने व कार्यकर्त्यांचा फौजफाटा होता. यादव आघाडीच्या विद्याताई पोळ बाहेर गावी असल्यामुळे त्यांची भेट झाली नाही. परंतु पाटील यांचे स्वागत माजी पोलिस आयुक्त गुलाबराव पोळ यांनी केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com