
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वातावरण तापले आहे. आता कोणत्याही क्षणी निवडणूक कार्यक्रम जाहीर होईल; पण विविध पक्षांकडून उमेदवार निश्चितीबाबत अद्याप हालचाली सुरू झालेल्या नाहीत, तरीही ग्रामीण भागात इच्छुकांनी पोस्टरबाजीतून उमेदवारी जाहीर करून टाकली आहे. त्यामुळे पक्षाकडून उमेदवारी जाहीर करताना नेत्यांचा कस लागणार आहे. ऐनवेळी एखाद्याला माघार घेण्यास सांगणेही कठीण होणार असून, यातूनच पुढे बंडखोरीची लागण होण्याची शक्यता बळावली आहे.
आरक्षण आणि मतदार यादीचा घोळ दिवाळीनंतर मिटणार आहे. त्यानंतरच निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार आहे; पण इच्छुकांनी ऐन दिवाळीतच शुभेच्छा फलकांच्या पोस्टर, बॅनरच्या माध्यमातून आपण रिंगणात आहोत, असे सांगून टाकले आहे. चौकाचौकांत दीपावलीच्या शुभेच्छा देणारे इच्छुक उमेदवारांचे बॅनर सध्या झळकू लागले आहेत. यातून ऐन दिवाळीत ग्रामीण भागातील वातावरण तापले आहे. जिल्हा परिषद गट व पंचायत समितीच्या गणांचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर इच्छुकांनी आपल्याला सोयीचा मतदारसंघ शोधून तेथून तयारी सुरू केली आहे. कोणत्याही परिस्थितीत रिंगणात उतरायचे या हेतूने अनेक इच्छुकांनी तयारी सुरू केली आहे.
निवडणुकीच्या तोंडावर दिवाळी सण आल्याने याचा फायदा उठविण्याचे डोक्यात ठेऊन गावोगावच्या इच्छुकांनी मुख्य गावांतील चौकात शुभेच्छांचे बॅनर लावून त्यावर आपण जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीच्या रिंगणात आहेच हे सांगून टाकले आहे.
गावोगाव, चौकाचौकांत ‘जनतेचा उमेदवार’, ‘आपला सेवक’ अशा घोषवाक्यांसह लावलेले फ्लेक्स नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहेत. यामुळे पक्षातील अंतर्गत स्पर्धा आणि उमेदवारीसाठी सुरू असलेली धडपड उघडपणे दिसू लागली आहे. पक्षाकडून अद्याप अधिकृत उमेदवारांची घोषणा झालेली नसतानाही, फ्लेक्सबाजीमुळे पक्ष कार्यकर्त्यांमध्ये चर्चेला उधाण आले आहे.
काही ठिकाणी या फ्लेक्सबाजीमुळे नाराजीही व्यक्त होत आहे. एरवीही पक्षाकडून इच्छुकांची मुलाखत होते, त्यानंतर उमेदवारीबाबत चर्चा आणि मग निर्णय देऊन लढणाऱ्या उमेदवारांची यादी पक्षांकडून जाहीर होते; पण यावेळेस वेगळाच ट्रेंड आला आहे. पक्ष, नेत्यांपेक्षा स्वत: इच्छुकच आपली उमेदवारी जाहीर करू लागला आहे. पक्ष, नेत्याचा निर्णय नंतर बघू, असे चित्र पाहायला मिळत आहे.
ही सर्व परिस्थिती तब्बल तीन, साडेतीन वर्षांनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत असल्यामुळे आली असून, जुन्या नेत्यांचे आरक्षणाने पत्ते गुल केले आहेत, तर ज्यांना संधी आली ते सर्व नवखे, तरुण, महिला आहेत. त्यांना रेडिमेड पुढारी होण्यातच रस आहे. पक्ष, नेता हे उमेदवारी दिल्यानंतर ठरवले जात आहे. एखाद्याला पक्षाने उमेदवारी नाकारली तरी दुसऱ्या पक्ष, आघाडीचा पर्याय या इच्छुकांपुढे आहे. त्यामुळे पक्ष व नेत्यांची आता अडचण होणार हे निश्चित आहे. याचा परिणाम बंडखोरी वाढण्यात होणार आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक ही बऱ्यापैकी ठिकाणी सर्व पक्ष स्वबळावरच लढवण्याची शक्यता आहे. त्यामुळे महायुतीमधील भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी
तर दुसरीकडे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष, काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे अशा पक्षांची महाविकास आघाडी असे सहा पक्ष आमने सामने उभे ठाकणार आहेत. त्यामुळे इच्छुक उमेदवारांपुढेही या सहा पक्षांचा पर्याय आहे. युतीतील एका पक्षाने नाकारले, तरी आघाडीत जाऊन तिकीट मिळवता येते, या गणितामुळे इच्छुकांची संख्या मोठी असणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.