

Akluj, 04 July : राज्याच्या राजकारणातील मोठे नाव असलेल्या आणि माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे गाव असलेल्या अकलूज शहराला सध्या तीव्र पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. ‘वीर धरणात अत्यल्प पाणी असल्याने ही परिस्थिती उद्भवली असून पालखीसाठी धरणातून पाणी सोडल्यानंतर ता. १५ जुलैपासून नळाद्वारे पाणीपुरवठा केला जाणार आहे. तोपर्यंत संपूर्ण शहराला टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येणार आहे,’ असे नगरपालिकेचे मुख्याधिकारी सचिन पाटील यांनी सांगितले.
मुख्याधिकाऱ्यांनी धरणातील पाणीसाठ्याचे कारण दिले असले तरी अकलूजमध्ये निर्माण झालेली पाणीटंचाई राजकीय आहे की नैसर्गिक? अशी चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे. कारण गेल्या काही महिन्यांपासून मोहिते पाटील विशेषतः खासदार धैर्यशील मोहिते पाटील विरुद्ध भाजप असा टोकाचा संघर्ष दिसून येत आहे.
तत्कालीन सरपंच जयसिंह मोहिते पाटील यांनी अकलूज ग्रामपंचायतच्या वतीने गुरुत्वाकर्षण पद्धतीने नळाद्वारे पाणी पुरवठा योजना राबवली होती. त्यानंतर वेळोवेळी त्यात सुधारणा करीत पाणीपुरवठा केला जात होता अनेकदा दुष्काळी परिस्थिती असूनही आत्तासारखी परिस्थिती यापूर्वी कधीही निर्माण झालेली नव्हती.
अकलूज ग्रामपंचायतीचे नगरपरिषदेत रूपांतर झाले आहे. नगर परिषदेने ग्रामपंचायत असताना पाणीसाठवण तलावाचे खोलीकरण सुरू केले असून नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू आहे.
अकलूज शहराला विझोरी येथील साठवण तलावातून पाणीपुरवठा होतो. या तलावाला वीर धरणाच्या कालव्यातून पाणी येते. सध्या वीर धरणात अत्यल्प पाणी असल्याने कालव्याद्वारे पाणी मिळालेले नाही. पालखी सोहळ्यासाठी धरणातून पाणी सोडल्यानंतर कालव्याद्वारे मिळालेले पाणी साठवण तलावात येईल तसेच कालव्यातून थेट शुद्धीकरण केंद्राकडे जाणारी पाईपलाईन चालू केल्याने पाणी आल्यानंतर ता. १५ जुलैपासून नियमित पाणीपुरवठा केला जाईल, असेही पाटील यांनी स्पष्ट केले आहे.
सध्या नगरपरिषदेकडील एकूण उपलब्ध ४६ बोअरवेलपैकी (विंधनविहीर) चालू ३४ बोअरवेलवरून पाणी पुरवठा करण्यात येत आहे. तसेच, १० टँकरद्वारे जिथे बोअरवेल नाही, तेथील नागरिकांना पाणीपुरवठा केला जाईल. उपलब्ध पाणी काटकसरीने वापरून नगरपरिषदेस सहकार्य करण्याचे आवाहन पाटील यांनी केले.
पाऊस न झाल्यास पालखीनंतरही पाणीटंचाईची शक्यता
वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस कमी झाल्याने आजही (ता. ४) पाणीसाठा अत्यल्प आहे. धरणात पाणी आले नाही तर केवळ पालखीसाठीच पाणी सोडले जाईल. त्यानंतर पाणी बंद होण्याची शक्यता आहे, त्यामुळे पाऊस न पडल्यास पालखीनंतरही अकलूजला पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.
टँकरद्वारे पाणीपुरवठ्याचा प्रयत्न : मुख्याधिकारी
नळाद्वारे पाणीपुरवठा होत नसला तरी टँकरद्वारे संपूर्ण शहराला पाणीपुरवठा करण्याचा प्रयत्न केला जात आहे. उपलब्ध पाणी हे काटकसरीने वापरणे गरजेचे आहे. तसेच, ता. १५ जुलैपासून नळाद्वारे पाणीपुरवठा सुरू केला जाणार असला तरी नागरिकांनी नळाला तोट्या बसवाव्यात. उपलब्ध पाणी काटकसरीने वापरावे, असे आवाहन अकलूज नगर परिषदेचे मुख्याधिकारी सचिन पाटील यांनी केले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.