Sangli News : दुष्काळाच्या प्रश्नावर सांगली शहर व जिल्हा काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली आहे. तळपत्या उन्हात काँग्रेस नेत्यांनी राज्य सरकार आणि प्रशासनावर हल्लाबोल केला. सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. या वेळी राज्य सरकारच्या कारभाराविरोधात रणशिंग फुंकताना येत्या काळात जर कोयनेचे पाणी आडवाल तर जिल्ह्यात फिरू देणार नाही, असा इशारा काँग्रेसच्या नेत्यांनी मंत्री शंभूराज देसाईंचे नाव न घेता दिला आहे.
दुष्काळी भागातील शेतकरी पाण्यासाठी टाहो फोडत असताना पक्ष फोडण्यात व्यस्त असणाऱ्या सरकारला त्याचे काही देणेघेणे नाही. कोयना धरणातील पाण्याचे राजकारण करून शेतकऱ्यांची कोंडी केली जात आहे. काँग्रेस त्याविरोधात शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी आहे. आता कोयनेतील पाणी अडवाल तर तुम्हाला जिल्ह्यात फिरू देणार नाही, असा गंभीर इशारा काँग्रेसचे नेते, आमदार विश्वजित कदम यांनी साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे नाव न घेता दिला.
दुष्काळाच्या प्रश्नावर शहर व जिल्हा काँग्रेसतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. त्यावेळी कदम बोलत होते. येथील विश्रामबाग चौकातील क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यापासून निघालेल्या मोर्चात आमदार विक्रम सावंत, प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्री पाटील, संचालक महेंद्र लाड, डॉ. जितेश कदम, प्रा. सिकंदर जमादार यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी आणि शेतकरी सहभागी झाले होते.
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. विश्वजित कदम म्हणाले, ‘‘जिल्ह्यात पाणी, चारा टंचाई जाणवू लागली आहे. वसंतदादा पाटील, पतंगराव कदम, आर. आर. आबांनी दुष्काळात कधीच पक्षपात केला नाही. टंचाईतून पाणी दिले. आताच्या सरकारची मात्र शेतकऱ्यांप्रती संवेदना नाही. गेली पाच महिने मी सरकारला सतर्कतेचा इशारा देतोय. परंतु, सरकार पक्ष फोडाफोडीत गुंतले आहे. जे अनैतिक मार्गाने सरकार स्थापन झाले आहे, त्यातील लोकांची चापलुसी करण्यात सगळे व्यस्त आहेत.
ग्रामीण प्रश्न, पाण्याचे प्रश्न, शेतीचे प्रश्नाचे कोणालाही पडले नाही. कोयनेच्या पाण्यासंदर्भात बैठक झाली, त्यात २५ मिनिटे साताऱ्यावर चर्चा आणि पाच मिनिटे सांगलीवर. ही मंडळी मस्तवाल झाली आहेत. त्यांचा चुकीचा हेतू साध्य करू पाहत आहेत. आम्ही खंबीर आहोत. इंग्रजांच्या हुकूमशाहीविरुद्ध स्वातंत्र्य सैनिकांनी लढा दिला, तसाच लढा आता आपणास या हुकूमशाही विरोधात द्यायचा आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
आमदार विक्रम सावंत म्हणाले, ‘‘दुष्काळी गावांत पाणीपुरवठा करताना २०११ ची जनगणना ग्राह्य मानली जातेय, हे चुकीचे आहे. त्यामुळे पाणी कमी पडत आहे. जनावरांच्या पाण्याचे नियोजनच केले नाही. काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी सांगलीच्या आमदारांवर हल्ला चढवला. ते म्हणाले, ‘‘ऑगस्टपासून पाच वेळा कृष्णा नदी कोरडी पडली. त्यावर आमदार विधानसभेत चकार शब्द बोलत नाहीत. श्री गणरायाचे विसर्जन दूषित पाण्यात करावे लागले, याचे पाप हिंदुत्वाचा डंका पिटणाऱ्या आमदारांना लागणार आहे. हे सरकार झोपेचे सोंग घेत आहे. त्यांना खडबडून जागे करायला काँग्रेसने मोर्चा काढला आहे. हा ट्रेलर आहे.
प्रॉपर्टीवाले खासदार
विशाल पाटील (Vishal Patil) यांनी खासदार संजय पाटील (Sanjay Patil) यांच्यावर हल्लाबोल केला. ते म्हणाले, भाजपचे (Bjp) पालकमंत्री, खासदार, आमदार, पाण्यासाठी राजकारण करत आहेत. शेतकरी पाणी सोडा म्हणून गेले की पालकमंत्री, खासदारांना भेटल्याशिवाय पाणी सोडणार नाही, असे अधिकारी सांगत आहेत. पाण्याचे राजकारण करणाऱ्यांना देव माफ करणार नाही. भाजपच्या नेत्यांना शेतकऱ्यांचा शाप लागेल. खासदार फक्त मालमत्ता वाढवण्यात व्यस्त असल्याची टीका त्यांनी केली.
(Edited By : Sachin Waghmare)
R