
सांगोला : स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीच्या तोंडावर सांगोल्यात शेतकरी कामगार पक्षाला खिंडार पडले आहे. अनेक प्रमुख कार्यकर्त्यांनी 'हाती'कमळ घेत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यामुळे आगामी निवडणुकीत सांगोला तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. या प्रवेशात विविध गावांचे सरपंच, उपसरपंच, सोसायटी अध्यक्ष आणि कार्यकर्ते सहभागी झाले. या पक्षप्रवेशामुळे आगामी, नगरपालिका, पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीपूर्वी भाजपला मोठा राजकीय लाभ होणार आहे.
शेकापतील अनेक कार्यकर्ते गेल्या काही दिवसांपासून नाराज होते आणि याबाबत त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे तक्रारीही केल्या होत्या. हेच कार्यकर्ते काल व्यासपीठावर दाखल झाले. त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. पालकमंत्री तथा ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आणि माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा झाला. या कार्यक्रमाला अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार देवेंद्र कोठे, जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार, श्रीकांत देशमुख उपस्थित होते.
उद्योगपती बाळासाहेब एरंडे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सचिन देशमुख, पंचायत समितीच्या माजी सभापती बाळासाहेब काटकर, माजी जि. प. सदस्य राणीताई दिघे, माजी नगरसेवक स्वाती मगर, जुबेर मुजावर, सरपंच दीपाली खांडेकर, सरपंच संजय इंगोले, धनाजी पांढरे, माजी सरपंच तानाजी नरळे, लोणारी संघटनेचे संतोष कारंडे या दिग्जांसह वाकी शिवणेतील सुमारे शंभर मुस्लिम कार्यकर्ते यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
"सांगोला तालुक्याशी माझे विशेष जिव्हाळ्याचे नाते आहे. टेंभू, म्हैसाळ, उजनी आणि नीरा उजवा कालवा या प्रकल्पांतील पाणी प्रश्न सुटेपर्यंत मी कोणताही सत्कार स्वीकारणार नाही, अशी शपथ घेतली आहे. तालुक्याच्या विकासासाठी मी नेहमीच तयार आहे; फक्त तुम्ही मागणी करा, ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील राहीन," असे माजी खासदार नाईक-निंबाळकर म्हणाले.
यावेळी स्वाती मगर, पोपट गडदे, भाऊसाहेब रूपनर, सुशांत फुले, जुबेर मुलाणी, उल्हास धायगुडे, संभाजी अलदर, अशोक पवार, बाळासाहेब काटकर, सचिन देशमुख, ब्रह्मदेव पडळकर आदींनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष बाळासाहेब केदार यांनी केले.
यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले, मी मंत्री असो किंवा नसो, तुम्ही दाखविलेला विश्वास कधीही व्यर्थ जाणार नाही. सांगोला तालुक्यातील प्रत्येक कार्यकर्त्याला पक्षात योग्य स्थान दिले जाईल. आम्ही राजकारणासाठी नाही, तर विकासासाठी कार्य करतो. तालुक्याच्या पाणी प्रश्नांसह इतर विकास कामांसाठी मी स्वतः पुढाकार घेणार आहे. आगामी निवडणुकीत पक्षाची ताकद निश्चितपणे दाखवून दिली जाईल. ही पक्ष प्रवेशाची फक्त टेलर असून पिक्चर येत्या काही दिवसात निश्चितपणे दिसेल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.