जालिंदर सत्रे
Patan News : निकृष्ट दर्जाची कामे, ठेकेदारांची मलिदा गॅंग आणि टक्केवारी याच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने शुक्रवारी तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. त्याला शिवसेना शिंदे गटाने प्रति मोर्चा काढून आव्हान देण्याचा प्रयत्न केला. शिवसेनेचे दोन्ही गट आमनेसामने आल्या मुळे कऱ्हाड चिपळूण राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक दोन तास ठप्प होती.
शिवसेना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाचे जिल्हाप्रमुख हर्षद कदम यांनी आक्रमक भूमिका घेऊन प्रशासनाला धारेवर धरले आणि लायब्ररी चौकापर्यंत मोर्चा नेला. शिंदेंच्या शिवसेनेचा (Shivsena) प्रति मोर्चा पोलिसांनी नविन बसस्थानक परिसरातील धांडे पुलावर अडवून मोर्चा विसर्जित केला. त्यामुळे पुढील अनर्थ टळला.
शुक्रवारी तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यासाठी उबाठा सेनेचे शिवसैनिक हर्षद कदम, तालुकाप्रमुख सुरेश पाटील, जिल्हा उपप्रमुख रवि पाटील यांच्या नेतृत्वाखाली पंचायत समितीच्या पुर्व बाजूला सकाळी 11 वाजता जमले होते. त्याच दरम्यान शिंदेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते पश्चिम बाजूला प्रति मोर्चा काढण्यासाठी जमले होते. बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो व जय भवानी जय शिवाजीच्या घोषणा एका गटाकडून व दुसऱ्या बाजूने एकच वाघ शंभूराज अशी घोषणाबाजी सुरू झाली.
ठाकरे गटाने दुपारी 12 वाजता मोर्चास प्रारंभ केला. त्यावेळी पंचायत समितीच्या समोर पोलिस वाहने आडवी उभी करून शिंदे गटाचा प्रति मोर्चा पोलिसांनी अडवला. मात्र कार्यकर्ते आक्रमक झाले आणि पोलिसांशी वादविवाद झाला. परंतु पोलिसांचे कडे तोडून कार्यकर्ते धावू लागले. धांडे पुलाच्या पाठीमागे पोलिसांनी साखळी तयार करून सर्वांना रोखुनी धरले.
त्याच दरम्यान हर्षद कदम मोर्चा घेऊन झेंडा चौकात आले. पाटण शहराच्या दोन्ही बाजूला अडवून धरलेले कार्यकर्ते मोर्चात सामील होत नाहीत तोपर्यंत मी हलणार नाही, अशी भूमिका घेऊन ठिय्या आंदोलन सुरू केले. पोलिसांनी परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून संबंधित कार्यकर्ते झेंडा चौकात आणण्यासाठी प्रयत्न केले आणि कार्यकर्ते मोर्चात सहभागी झाले आणि मोर्चा लायब्ररी चौकापर्यंत नेला. पोलिसांनी त्याठिकाणी मोर्चा अडवला आणि तहसीलदार अनंत गुरव यांनी मोर्चाला सामोरे जात निवेदन स्वीकारले.
दुसरीकडे प्रति मोर्चा धांडे पुलावरच पोलिसांनी अडवून ठेवला होता. त्यावेळी शिंदेंच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख जयवंतराव शेलार घटनास्थळी दाखल झाले आणि पालकमंत्री शंभूराज देसाई यांचा निरोप घेऊन मी आलोय आपणाला थांबले पाहिजे असे कार्यकर्त्यांना सांगितले. मात्र, कार्यकर्ते ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते. पोलिसांनी योग्य भूमिका समजावून सांगितले. धांडे पुलावर उपविभागीय पोलिस अधिकारी विजय पाटील यांनी प्रति मोर्चाचे निवेदन स्वीकारले आणि मोर्चा विसर्जित करण्यात आला.
हर्षद कदम पत्रकारांशी बोलताना म्हणाले, लोकशाहीत मोर्चा काढण्याचा अधिकार आहे. याचे सत्ताधारी पालकमंत्र्यांना विसर पडला आहे. आम्ही विकास कामांच्या दर्जाबाबत केलेले आरोप चुकीचे होते, तर विकास कामांची तपासणी करण्यासाठी कमिट्या गावागावात का फिरतात, आरोपांबाबत पालकमंत्री जनतेला उत्तर का देत नाहीत. विधानसभा निवडणुकीत जनताच उत्तर देईल? असा हल्लाबोल केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.