पळशी : 'जरंडेश्वर'चा (Jarandeshwar Mill) गळीत हंगाम संपला असून, प्रोसेसमधील साखर काढण्यासाठी दोन दिवस जातील. त्यानंतर ईडीकडून (ED) कारखान्याचा प्रत्यक्ष ताबा घेतला जाईल. आता हा कारखाना सभासदांच्या ताब्यात मिळावा, या मागणीसाठी आवश्यक तेवढ्या सभासदांच्या सह्यांचे निवेदन प्रतिज्ञापत्रासह 'ईडी'च्या न्यायालयात दिले जाणार आहे. (Jarandeshwar Sahkari Sugar Mill Latest News)
आता कारखान्यासंदर्भातील माझे मुंबईतील काम संपल्याने यापुढे माझे कायमस्वरूपी वास्तव्य कोरेगाव तालुक्यातच राहणार असल्याची माहिती 'जरंडेश्वर'च्या संस्थापिका माजी मंत्री डॉ. शालिनीताई पाटील (Shalini Patil) यांनी आज (ता.16 मे) कोरेगाव येथे पत्रकार परिषदेत दिली. 'जरंडेश्वर'चा विषय ईडीच्या न्यायालयाच्या अखत्यारीतील असल्याने याप्रश्नी कोणालाही सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) जाता येणार नाही, असा दावा त्यांनी केला.
जरंडेश्वर साखर कारखान्याची आठ कोटी ३४ लाखांची धनलक्ष्मी ठेव शिखर बँकेमध्ये असून, या ठेवीची मुदत वाढवण्यासाठी आमच्या कारखान्याच्या एमडींकडे शिखर बँकेने केलेला पत्रव्यवहार आमच्याकडे आहे, असे नमूद करून पाटील म्हणाल्या की, "गेल्या दोन जुलै रोजी न्यायालयाच्या आदेशाने ईडीने कागदपत्री कारखाना ताब्यात घेतला; परंतु कारखान्याच्या कामकाजात बाधा आली नाही. तत्पूर्वी दोन वेळा ईडी व इन्कम टॅक्सचा छापा कारखान्यावर पडला. त्यातून एक हजार ४०० कोटींचा गैरव्यवहार बाहेर आला.
दरम्यानच्या काळात किरीट सोमय्या यांच्या माध्यमातून आमचे संचालक मंडळ ईडी कार्यालयाच्या संपर्कात होते. गेल्या दहा दिवसांपासून कोरेगाव, खटाव तालुक्यातील सभासदांच्या सह्या घेण्याचे काम कार्यकर्त्यांनी केले आहे. आमदार महेश शिंदे यांचेही सहकार्य आहे. आता हा कारखाना सभासदांच्या ताब्यात मिळावा, या मागणीसाठी आवश्यक तेवढ्या सभासदांच्या सह्यांचे निवेदन प्रतिज्ञापत्रासह ईडीच्या न्यायालयात दिले जाणार आहे.
आमच्या विरोधातील जिल्ह्यातील चोंबडे लोक जरंडेश्वरप्रश्नी सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचे सांगत आहेत; परंतु हा ईडीच्या न्यायालयातील विषय असल्याने याप्रश्नी सर्वोच्च न्यायालयात जाता येणार नाही. कारखान्याचे यापुढील काम राज्य शासनाशी संबंधित नाही, तर ते केंद्र शासनाशी निगडित आहे. यापुढे माझे कायमस्वरूपी वास्तव्य कोरेगाव तालुक्यातच राहणार आहे. कारखाना ताब्यात मिळाल्यावर तेथील बंगल्यावर जाता येईल." जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांची विशेष सभा कोरेगाव येथे येत्या २५ तारखेला दुपारी चार वाजता होणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. या वेळी संचालक पोपटराव शेलार, हणमंतराव भोसले, आनंदराव गायकवाड, अक्षय बर्गे, धनंजय कदम, संतोष कदम, किसनराव घाडगे उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा नामोल्लेख टाळून पाटील म्हणाल्या, "बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतरचा वाघ खरोखरच कागदाचा वाघ आहे. घडी-घडी आजारी पडतात. त्यांनी मुख्यमंत्रिपदावर राहण्याचा सोस कशाला करावा? त्यांच्या पक्षातील योग्य व्यक्तीला मुख्यमंत्रिपद द्यावे. विधानसभेच्या गेल्या निवडणुकीत महेश शिंदे यांना शिवसेनेचे उमेदवार म्हणून नव्हे, तर नरेंद्र मोदी यांना पाठिंबा दर्शविण्यासाठी आम्ही पत्र दिले होते." अशीही टीका त्यांनी केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.