Narsayya Adam Master: भोगलेल्या आयुष्याची चित्तरकथा! इंदिरा गांधी ते मोदींपर्यंत सतत कामगारप्रश्नांसाठी धाव घेणारे आडम मास्तर

Narsayya Adam Political Struggle:आमदारकीला एकदा पराभव झाल्यानंतर त्यांनी त्यात कमीपणा न मानता पुन्हा नगरसेवकपदाला उभे राहून महापालिकेतही काम केले. मला पद पाहिजे आणि हेच पद पाहिजे असा आग्रह धरला नाही.
Narsayya Adam Political Struggl
Narsayya Adam Political StrugglSarkarnama
Published on
Updated on

सोलापूरचे माजी आमदार नरसय्या आडम यांची ओळख मास्तर म्हणून केवळ त्यांच्या मतदारसंघात झाली असे नाही, तर संपूर्ण राज्यात आणि विधानसभेतदेखील आडम मास्तर अशीच झाली. गमतीचा भाग असा, की या माणसाचे शिक्षण अवघे नववीपर्यंत झाले आहे; पण कामगारांचे सगळे खटले या माणसाने एखाद्या कसलेल्या वकिलाप्रमाणे कामगार न्यायालयात स्वतः बाजू मांडून त्यांना न्याय मिळवून दिला. आडम मास्तरांचा संघर्ष ही खरोखर एक दंतकथा शोभावी अशी संघर्षगाथा आहे.

या माणसाने यंत्रमागधारकांच्या विरोधात आंदोलन करून तेथील कामगारांसाठी लढा दिला. त्याचबरोबर विडी कामगारांसाठी सगळे आयुष्य दिले. विडी उद्योगातील कामगार महिलांची लढाई त्यांनी कायम लढली. या लढाईत त्यांनी कधीही समझोता केला नाही. कामगारांना न्याय मिळवून देताना त्यांनी त्यांना डोक्यावर छप्पर मिळेल याची काळजी घेतली. देशात कोठे नाही असे विडी कामगारांसाठी त्यांनी अत्यल्प दरातील गृहरचना संस्था उभी केली.

यामध्ये दहा हजार घरे उभी केली. त्यानंतर साडेपाच हजार घरांची दुसरी संस्था उभी केली. या दोन संस्था उभ्या करून ते थांबले नाहीत, तर त्यांनी असंघटित कामगारांसाठी थेट ३० हजार घरांची तिसरी संस्था उभी करून कमी पैशात एकूण ४५ हजारापेक्षा जास्त कुटुंबांना घर मिळवून दिले. देशाच्या इतिहासात असे उदाहरण अगदी विरळातील विरळ आहे.

कामगारांच्या लढ्याचा आणि कम्युनिस्ट पक्षाचा वारसा आडम मास्तरांना त्यांच्या आई-वडिलांकडून आला. त्यांचे आई-वडील कम्युनिस्ट पक्षाचे अगदी कट्टर कार्यकर्ते. त्यांच्या शिकवणुकीतून नरसय्या आडम मास्तर घडले. गाव पातळीवरच्या कार्यकर्त्यापासून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीपर्यंत जाण्याची त्यांची मजल ही कोणाही कार्यकर्त्याला प्रेरणादायी अशी आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे पॉलिटब्युरो सदस्य आणि आखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष अशोक ढवळे यांनी या आत्मचरित्राची प्रस्तावना लिहिली आहे.

Narsayya Adam Political Struggl
H. D. Deve Gowda Political Journey: सोसायटीचे अध्यक्ष ते मुख्यमंत्री अन् पंतप्रधान...

आडम मास्तरांच्या या आत्मचरित्रात अनेक प्रसंग विश्वास बसणार नाही किंवा एखाद्या चित्रपटात शोभावे असे आहे; पण हे सारे प्रसंग खरे आहेत यातील थरार वेगळा असला, तरी आडम मास्तरांच्या जिवावर अनेक वेळा बेतले आहे हे विसरून चालणार नाही. या माणसाने संपत्ती कमविली नाही; मात्र कामगारांचा प्रचंड असा विश्वास आणि अर्ध्या रात्री हाक मारली तर उभे राहतील असे शेकडो कार्यकर्ते आपल्याशी जोडून घेतले.

रिक्षाचालकांच्या प्रश्नांसाठी व त्यांच्यावर चुकीच्या पद्धतीने दाखल होणारे खटले संपुष्टात आणण्यासाठी थेट न्यायालयावर मोर्चा नेण्याचा निर्णय घेणारा आणि तशा कृतीसाठी सज्ज झालेल्या या नेत्याला थेट जिल्हा न्यायाधीशांनी बोलावून घेतले. त्यांच्याशी चर्चा केली आणि रिक्षाचालकांना न्याय मिळेल अशी रचना निर्माण केली. सरकारी यंत्रणा हलविण्यासाठी केवळ आंदोलन, संप किंवा कामबंदी हे शस्त्र न वापरता आकडेवारी आणि त्या प्रश्नाच्या सर्व बाजूंचा अभ्यास करून शासन आणि अन्य पातळीवर आपले प्रश्न सोडवून घेण्याची किमया त्यांनी सहजपणे साध्य केली होती.

कामगारांचा संप किंवा असंघटित कामगारांचा लढा देताना त्यांनी अनेक वेळा तुरुंगवास भोगला. या सर्व काळात त्यांचे घराकडे दुर्लक्ष झाले. मात्र त्यांच्या पत्नीने घराची बाजू अर्थात संसाराची आघाडी अत्यंत सक्षमपणे सांभाळल्यामुळे आडम मास्तरांनी सार्वजनिक पातळीवर सक्रिय भाग घेता आला. आपल्या पत्नीला त्याचे योग्य श्रेय देण्यात ते कुठेही कुचराई करीत नाहीत. अन्यायविरुद्ध संघर्ष करताना ज्या-ज्या अडचणींना तोंड द्यावे लागेल त्या सगळ्यांना त्यांनी तोंड दिले. तीन वेळा मिसासारख्या कायद्याखाली त्यांना अटक झाली.

सोलापूर, बार्शी, अक्कलकोट, उस्मानाबाद, येरवडा, औरंगाबाद, आताचे छत्रपती संभाजीनगर, मुंबई या शहरांतील तुरुंगांमध्ये त्यांना राहावे लागले. तीन हजार वेळा धरणे आंदोलन, निषेध मोर्चे, घेराओ, उपोषणे यांची गणती नाही. दररोज एक तरी भाषण त्यांना करावे लागले. ६० वर्षांत कामगारांच्या हक्कासाठी लढणाऱ्या या नेत्याला कामगारांनी वर्गणी गोळा करून त्यांना चारचाकी गाडी दिली. कामगारांच्या हक्कासाठी भांडणाऱ्या या नेत्याला सोलापूरमधून तीन वेळा नगरसेवक, तर तीन वेळा आमदार म्हणून लोकांनी निवडून दिले.

Narsayya Adam Political Struggl
Operation Sindoor India :पाकिस्तानात एअर स्ट्राईक कसा झाला? कोणत्या शस्त्रांचा वापर करण्यात आला? ऑपरेशन सिंदूरचे महत्वाचे मुद्दे

आमदारकीला एकदा पराभव झाल्यानंतर त्यांनी त्यात कमीपणा न मानता पुन्हा नगरसेवकपदाला उभे राहून महापालिकेतही काम केले. मला पद पाहिजे आणि हेच पद पाहिजे असा आग्रह धरला नाही. यंत्रमाग कामगारांसाठी यंत्रमाग कामगार महामंडळ उभे राहण्यासाठी त्यांनी सतत प्रयत्न करून अनेक मुख्यमंत्र्यांकडे याचा पाठपुरावा करून २५ वर्षे न थकता मेहनत घेऊन सरकारदरबारी आपली बाजू पटवून दिली आणि यंत्रमाग कामगार कल्याण महामंडळ सरकारला स्थापन करायला लावले. कोरोना महासाथीच्या काळातदेखील जनतेसाठी लढणाऱ्या या नेत्याने आपल्या प्रकृतीचा विचार न करता गरिबांच्या घरातील चूल कशी पेटेल यासाठी प्रयत्न केले.

आयुष्यात नोकरीच्या वयात त्यांनी लष्करात भरती होण्यासाठी प्रयत्न केले. देशसेवा करण्यासाठी एकोणिसाव्या वर्षी लष्करात जाण्यासाठी प्रयत्न केले; पण वैद्यकीय परीक्षेत त्यांना अपात्र ठरविण्यात आले. वडिलांनी त्यांचे सांत्वन करताना त्यांना सांगितले, ‘‘नरसू, तू सैनिक होऊ शकला नाही; पण हरकत नाही. देशातील कामगारांसाठी तू लढ. हीसुद्धा देशसेवाच आहे. आईचे आणि वडिलांचा हा सल्ला त्यांनी तंतोतंत अमलात आणला.

मरण्यापूर्वी आईने विडी कामगार महिलांसाठी काहीतरी नक्की कर असे वचन घेतले. या वचनपूर्तीसाठी त्यांनी आपल्या कामगार बहिणींना घर मिळावे यासाठी अथक मेहनत घेतली आणि पहिल्यांदा १० हजार घरांची वसाहत उभी केली. त्यानंतर आशिया खंडात विक्रम व्हावा इतकी मोठी घरांची वसाहत उभी केली. दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यापासून विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत त्यांनी सतत कामगारप्रश्नांसाठी त्यांच्यापर्यंत धाव घेऊन काही प्रश्नांची सोडवणूक केली.

रे वसाहतीचे स्वप्न त्यांनी कसे साकार केले हे सारे या पुस्तकातून आवर्जून वाचण्यासारखे आहे. सरकारी यंत्रणा कशी चालते आणि सरकारमधील निर्णय घेणाऱ्या नेत्यांनी जर जनसेवेसाठी कायद्यात बदल करायचे ठरवले तर काय घडू शकते याची प्रचिती या उदाहरणातून येते. विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय पातळीवर नरेंद्र मोदी यांच्या हाताखालील प्रशासनाने रे वसाहतीसाठी किती मदतीची भूमिका घेतली व आडम मास्तरांचे स्वप्न त्यांच्यामुळे कसे पूर्ण झाले हे लक्षात येते.

अत्यंत सुशिक्षित अशा मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह यासारख्या व्हाइट कॉलर सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी आडम मास्तरांनी प्रयत्न केल्यामुळे आधी महाराष्ट्रात आणि नंतर देशभरात त्यांच्यासाठी कामगार कायदा लागू झाला आणि त्यांची औषध कंपन्यांकडून होणारी पिळवणूक थांबली. संघर्षाची ही थरारक सत्यकथा आवर्जून वाचावी अशी आहे.

  • पुस्तक - संघर्षाची मशाल हाती

  • लेखक - नरसय्या आडम

  • प्रकाशक - समकालीन प्रकाशन

  • किंमत - ४०० रुपये

  • पृष्ठे - ३०४

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com