India Air Strike News: पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तानच्या पंजाब भागात सुमारे १०० किमी आत घुसून पाकव्याप्त काश्मीरमध्ये क्षेपणास्त्रांनी हल्ला केला. या हल्ल्यात दहशतवाद्यांचे नऊ तळ पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहेत.
बुधवारी मध्यरात्री १.०५ ते १.३० च्या दरम्यान भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये २५ मिनिटांच्या आत २४ विशेष तंत्रज्ञानाची क्षेपणास्त्रे डागून आपली मोहिम पूर्ण केली.
या अत्यंत अचूक भेदक संयुक्त कारवाईत भारतीय लष्कर आणि हवाई दलाने पाकिस्तानचा सर्वात मोठा दहशतवादी नेता हाफिज सईद आणि मसूद अझहर याचा अभेद्य बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मोहम्मदच्या मुख्यालयांवर हल्ला करून ते उद्ध्वस्त केले.
भारतीय लष्कराच्या निशाण्यावर असलेल्या सर्व नऊ ठिकाणांमध्ये दहशतवाद्याचे तळ, त्यांच्या प्रशिक्षण केंद्रांचा समावेश होता. या हल्ल्यात कोणत्याही व्यक्ती किंवा पाकिस्तानच्या लष्करी विभागांना लक्ष्य करण्यात आले नव्हते. सध्याच्या परिस्थिती चिघळवण्याच्या पाकिस्तानने प्रयत्न केल्यास त्याला भारत सडेतो़डपणे उत्तरे सज्ज आहे, असे विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी पाकिस्तानच्या पोकळ धमक्यांनंतर सुनावले आहे.
ऑपरेशन सिंदूरमध्ये वापरण्यात आलेल्या शस्त्रास्त्रे आणि क्षेपणास्त्रांचा अधिकृत तपशील देण्यात आलेला नाही, परंतु स्कॅल्प डीप स्ट्राईक क्रूझ क्षेपणास्त्रे, हॅमर स्मार्ट वेपन सिस्टीम, गाइडेड बॉम्ब किट आणि एक्सकॅलिबर दारुगोळा डागणारी एम-७७७ हॉवित्झर या शस्त्रांचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे.
भारताने अचानक केलेल्या प्रत्युत्तरात सुमारे वीसहून अधिक दहशतवादी आणि त्यांचे निकटवर्तीयांचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताला खुद्द पाकिस्ताननेच दुजोरा दिला आहे. भारताची ही लष्करी कारवाई उरी हल्ल्यानंतर सर्जिकल स्ट्राईक आणि पुलवामा हल्ल्यानंतर बालाकोट एअर स्ट्राईकपेक्षा अधिक मोठी आहे, कारण पाकिस्तानचा दहशतवादाचा हा खेळ भारत कोणत्याही स्वरूपात खपवून घेणार नाही,असा स्पष्ट संदेश पाकिस्तानला भारताने या माध्यमातून दिला आहे.
पाकिस्तानविरोधात लष्करी कारवाई केल्यानंतर लष्कराच्या कर्नल सोफिया कुरेशी आणि हवाई दलाच्या विंग कमांडर व्योमिका सिंग या भारतीय लष्कराच्या दोन महिला अधिकाऱ्यांनी परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांच्यासमवेत पत्रकार परिषदेत ऑपरेशन सिंदूरची संपूर्ण माहिती दिली.
ऑपरेशन सिंदूरने रात्री 1.05 ते 1.30 च्या दरम्यान लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मोहम्मदचे मुख्यालय आणि भारतात दहशतवाद पसरविणाऱ्या इतर लक्ष्यांना लक्ष्य केले, असे कर्नल सोफिया कुरेशी यांनी सांगितले.तर विंग कमांडर व्योमिका सिंह म्हणाल्या, या कारवाईत नेमक्या क्षमतेच्या आणि विशिष्ट तंत्रज्ञानाच्या लढाऊ शस्त्रांची काळजीपूर्वक निवड करण्यात आली होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.