Solapur News: आगामी लोकसभा, विधानसभा आणि महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार हालचाली सुरु केल्या आहेत. अनेक ठिकणी कोणत्या मतदारसंघात कोणता उमेदवार असावा, याबाबत उमेदवाराच्या चाचपण्या देखील पक्षाकडून सुरु आहेत. तर माढा लोकसभा मतदारसंघाची चर्चा राजकीय वर्तुळात नेहमीच असते.
माढा लोकसभा जिंकण्याचे लक्ष्य आणि माळशिरस मधून पुन्हा उमेदवारी मिळण्याची अपेक्षा पक्षासाठी प्रतिष्ठेची असलेल्या आमदार राम सातपुते यांचे मतदारसंघात दौरे वाढले आहेत. माढा लोकसभा मतदारसंघ पुन्हा जिंकण्यासाठी आणि माळशिरस विधानसभा निवडणुकीत पुन्हा उमेदवारी मिळेल, अशी अपेक्षा असल्याने, आमदार राम सातपुते यांनी पुन्हा एकदा मोहिते - पाटलांशी तडजोड करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. यातूनच त्यांचे अकलूजचे दौरे वाढले आहेत.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
2019 च्या विधानसभा निवडणुकीत माळशिरस (राखीव) मधून राम सातपुते यांना भाजपने उमेदवारी दिली. राष्ट्रवादीतून नुकतेच भाजपमध्ये आलेल्या मोहिते -पाटलांनी पहिल्यांदाच आपल्या मर्जीविरुद्ध वरून लादलेला उमेदवार स्वीकारला आणि जीवाचे रान करून आपल्या प्रतिष्ठेसाठी निवडूनही आणला. अतिशय चुरशीने झालेल्या त्या निवडणुकीत पारंपरिक मोहिते - पाटील विरोधक परंतु मूळ भाजपच्या स्थानिक नेत्यांनीही नेटाने प्रयत्न केले होते. त्यामुळेच राम सातपुते निसटत्या मतांनी का असेनात विजयी झाले.
निवडणुकीनंतर मात्र, सातपुते यांनी आपला मुक्काम माळशिरस येथे फिक्स केला. शासकीय अधिकाऱ्यांच्या बैठका असोत की, विकास कामांच्या शिफारशी या मोहिते -पाटलांच्या अनुमती शिवाय केल्या जाऊ लागल्या. मूळ भाजपच्या नेत्यांनाही विश्वासात घेऊन काम सुरू केले. आमदार सातपुते यांच्यामुळे शिवरत्नला समांतर व्यवस्था माळशिरसमध्ये तयार झाली.
शिवाय मोहिते -पाटील विरोधकांनी राम सातपुते यांच्याशी सलगी वाढवून रखडलेली विकास कामे रेटण्यास सुरुवात केली. गेल्या सत्तर वर्षात माळशिरस तालुक्यात अकलूज आणि शिवरत्नशी समांतर व्यवस्था उभा राहिली नव्हती, ती राम सातपुते यांच्या रूपाने उभा राहू लागली. त्यामुळे अकलूज आणि माळशिरस यांच्यातील अंतर वाढत गेले. मागील चार वर्षात राम सातपुते अकलूज आणि शिवरत्नला जाण्याचे टाळत होते.
राम सातपुते आणि खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या कार्यपद्धती विषयी खुद्द विजयसिंह मोहिते पाटील यांनी भाजपच्या वरिष्ठांकडे तक्रार केली होती अशी चर्चा आहेत. याच अनुषंगाने आगामी विधानसभा निवडणुकीत राम सातपुते यांना भाजपकडून पुन्हा उमेदवारी मिळेल, याची शक्यता धूसर झाली होती. मोहिते -पाटील यांनी पर्यायाची चाचपणीही सुरू केली होती. दरम्यानच्या काळात राम सातपुते यांचे नाव सोलापूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार म्हणूनही चर्चेत आले होते.
एकंदरीत मोहिते पाटील आणि आमदार राम सातपुते यांच्यात मनभेद झालेले दिसत असताना मागील काही महिन्यांपासून राम सातपुते यांच्या अकलूज वाऱ्या वाढल्या आहेत. मोहिते पाटील यांच्या कार्यक्रमास सातपुते यांची उपस्थिती ठळकपणे जाणवू लागली आहे.
राम सातपुते यांनी वाढदिवसानिमित्त झालेल्या सत्कार समारंभात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला कानमंत्र जाहीर करून टाकला. त्यामुळे पुन्हा एकदा सातपुते यांनाच माळशिरसमधून उमेदवारी देण्याचा भाजपचा मनसुबा दिसत आहे. त्यामुळेच पुन्हा एकदा राम सातपुते यांनी अकलूजकरांशी तडजोडीचे प्रयत्न सुरू केल्याचे दिसून येत आहे.
Edited by : Ganesh Thombare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.