वाई : साताऱ्याचे नुतन पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी हुतात्मा पोलिस अधिकाऱ्याच्या आई-वडिलांसोबत आपली दिवाळी साजरी केली. समीर शेख यांनी सपत्नीक जाऊन हुतात्मा चंद्रशेखर देशमुख यांच्या घरी जाऊन दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. त्यांच्या या उपक्रमाचे जिल्ह्यात कौतूक होत आहे.
गडचिरोली येथील लाहेरी पोलिस ठाण्यात ८ ऑक्टोबर २००९ रोजी नक्षलवाद्यांशी लढताना केलेल्या बॉम्बस्फोटात हुतात्मा झालेले धोम (ता.वाई) येथील चंद्रशेखर देशमुख या पोलिस उपनिरीक्षकांच्या घरी जाऊन शेख यांनी त्यांच्या आई-वडिलांसोबत दिवाळी साजरी केली. चंद्रशेखर देशमुख यांचे आई-वडील धोम येथे शेती करतात. श्री.शेख हे गडचिरोली येथे अधिकारी होते.
गडचिरोली येथून सातारा आणि आता धोमला सपत्नीक घरी आल्याने हुतात्मा चंद्रशेखर देशमुख यांचे वडील संजय आणि आई सोयरा यांना खूप आनंद झाला. त्यांनी दु:खावेग बाजूला ठेऊन शेख यांचे स्वागत केले. समीर शेख यांनी सपत्नीक देशमुख यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. किमान दीड तास त्यांच्यासोबत गप्पा मारल्या. तसेच त्यांना दिवाळी भेट दिली. कोणतीही अडचण आल्यास माझ्याशी संपर्क करा असेही त्यांनी सांगितले.
त्यानंतर शेख यांनी वाईच्या महागणपतीचे दर्शन आणि आरतीही केली. वाई पोलिस ठाण्यात कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. महिला पोलिस कर्मचाऱ्यांची आस्थेवाईकपणे चौकशी केली व अडचणी जाणून घेतल्या. पोलिस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र तेलतुंबडे, उपनिरीक्षक कृष्णकांत पवार, स्नेहल सोमदे, सुधीर वाळुंज आदी अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. यानंतर शेख यांनी भुईंज पोलिस ठाण्याला भेट दिली. सहायक पोलिस निरीक्षक आशिष कांबळे यांनी त्यांना पोलिस ठाण्याबाबत माहिती दिली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.