Sangli News : सांगली लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे विशाल पाटील यांनी बंडखोरी केली आहे. या संदर्भात तातडीने कारवाई करावी, अशी मागणी शिवसेना (उबाठा) गटाकडून केली जात आहे. यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधीमंडळ गटनेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण गुरुवारी ( 25 एप्रिल ) सांगलीत येणार आहेत. काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा घेणार आहेत. त्यानंतर कारवाई करण्याचे संकेत पटोले यांनी दिले आहेत. दरम्यान, पक्ष आदेशाचे उल्लंघन केले नाही, त्यामुळे कारवाईचा प्रश्नच नसल्याचा खुलासा विशाल पाटील यांनी केला आहे.
सांगली लोकसभेसाठी चंद्रहार पाटील (Chandrahar Patil) यांना महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाची उमेदवारी घोषित करण्यात आल्यानंतर काँग्रेस (Congress) प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील (Vishal Patil) यांनी बंडाचा पवित्रा घेतला होता. त्यांनी अखेर बंडाचा पवित्र कायम ठेवत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. (Sangli Congress News)
त्यांची बंडखोरी मागे घेण्यासाठी अखेरच्या दिवसापर्यंत प्रयत्न करण्यात आले. मात्र काँग्रेस नेत्यांचे प्रयत्न असफल झाले आहेत. त्यामुळे शिवसेना (उबाठा) गटाने विशाल पाटील यांच्यावर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. त्यासाठी प्रदेश काँग्रेची टीम गुरूवारी सांगलीत येणार आहे.
दरम्यान, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले, विशाल पाटील यांनी पक्षविरोधी भूमीका घेतल्याने त्यांच्यावर कारवाई होणार आहे. त्यांच्या उमेदवारीला कोणाची तरी फूस आहे. त्यांना माघार घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र त्यांनी अर्ज माघार घेतला नाही. सांगलीत गुरुवारी पक्षाच्या कार्यकर्त्यांची बैठक होणार आहे. या बैठकीनंतर कारवाईचा निर्णय घेऊ, असे त्यांनी सांगितले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
विशाल पाटील म्हणाले, मी काँग्रेस विरोधात कोणतीही भूमीका घेतली नाही. शिवाय पक्षाने मला कोणतीही नोटीस दिली नाही. पक्षाच्या आदेशाचे उल्लंघन देखील केले नाही. त्यामुळे कारवाईचा बडगा उगारला जाईल, असे मला वाटत नाही. सध्या नेत्यांना प्रचारसााठी काही तरी अडचणी आहेत. पण कार्यकर्ते जोमाने प्रचाराला लागले आहेत. प्रत्येक जण मनाने आमच्याकडे येत आहे. जनतेच्या मनातील माझी उमेदवारी आहे. त्यामुळे विजयी निश्चित असल्याचे त्यांनी सांगितले.
(Edited By : Sachin Waghmare)