अहमदनगर - अहमदनगर दक्षिणचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील ( Dr. Sujay Vikhe Patil ) यांची सरकारनामाचे संपादक योगेश कुटे यांनी विशेष मुलाखत घेतला. यात त्यांनी राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार रोहित पवार, संग्राम जगताप, नीलेश लंके यांच्या संदर्भात महत्त्वपूर्ण वक्तव्य केले. ( Statements made by Sujay Vikhen regarding Thorat, Lanke, Sangram Jagtap, Rohit Pawar: Sarkarnama Special Interview )
डॉ. सुजय विखे पाटील म्हणाले की, मला असे वाटते की माझ्या खासदारकीच्या तीन वर्षांच्या कार्यकाळापैकी दीड-दोन वर्षे कोविडमध्ये गेले. खरे तर खासदारकीचे एकच वर्षे पूर्ण झाले आहे. मी या कार्यकाळात केलेल्या कामातून समाधानी आहे. या कार्यकाळात नगर शहरातील उड्डाणपूल, राष्ट्रीय वयोश्री योजना, नगर शहराचे बाह्यवळण, नगर-करमाळा रस्ता, नगर शहरासाठीची अमृत पाणीपुरवठा योजनेची भरीव कामे करू शकलो. या कामांसाठी 90 टक्के भूसंपादनाचे काम लोकांच्या सहकार्याने झाले. लोकांचा माझ्यावरील विश्वासामुळे हे घडले.
टक्केवारी मागणाऱ्यांना वॉर्निंग
नगर-शिर्डी महामार्ग मी खासदार झाल्यावर राष्ट्रीय महामार्गाकडे वर्ग करून घेतला त्यासाठी 500 कोटींचा निधी आणला. मात्र महाविकास आघाडीच्या लोकप्रतिनिधीमुळे ठेकेदाराला मानसिक त्रास झाला. या लोकप्रतिनिधीने ठेकेदाराकडे टक्केवारीची मागणी केली. केंद्र सरकारच्या कामात राज्यातील महाविकास आघाडीचा लोकप्रतिनिधी टक्केवारी मागतो हे दुर्दैवी आहे. त्यामुळे या रस्त्याचे काम निम्मे सोडून ठेकेदार निघून गेला आहे. पावसाळ्यात पूनर्निविदा प्रक्रिया राबवावी लागेल. नवीन येणाऱ्या ठेकेदाराला टक्केवारी मागणार असेल तर मी वॉर्निंग देतो. की अशा लोकप्रतिनिधीचे नाव मी जाहीर करेल. नगर शहरातील उड्डाणपूल, बाह्यवळण रस्ता, नगर-करमाळा रस्त्यांची कामे वेगात होत आहेत उड्डाणपुलाचे काम मुदतीपूर्वी होत आहे. तेथे सर्व राष्ट्रवादी काँग्रेसचेच आमदार आहेत. तरीही कामात अडचण येत नाही. मग येथेच अडचण का येते हे मला लोकांना सांगावे लागेल, असा इशाराही त्यांनी नाव न घेता दिला.
नगर शहरात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत. त्यांचे व माझे छान ट्युनिंग आहे. तिथे मी आरोप करत नाही. कारण त्यांनी उड्डाणपुलाच्या कामात टक्केवारी मागितली नाही. नगर-करमाळा दरम्यानही राष्ट्रवादीचा आमदार आहे. त्यांनीही काही कामात अडचण आणली नाही. मात्र नगर-शिर्डी रस्त्या दरम्यान जे महाविकास आघाडीचे आमदार आहेत. त्यांना घरी जाताना याच रस्त्यावरील खड्डयाचे दणके खात जावे लागते. माझेही घर याच रस्त्याने आहे. ज्यांच्यावर सध्या कारवाया सुरू आहेत त्यांच्यावर मी काय कारवाई करणार, असा टोलाही लगावला.
शरद पवारांकडे दोनदा तर अजित पवारांकडे तिनदा गेलो
खासदारकीच्या निवडणुकीच्या वेळी तिकीट मिळविण्यासाठी मी व माझे वडील हे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याकडे दोन वेळा, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे प्रत्येकी तीन वेळा गेलो होतो. मात्र त्यांना वाटले मी निवडून येणार नाही. त्यांनी तिकीट दिले नाही. त्यामुळे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखाली भाजपमध्ये गेलो. खासदार झालो. माझा निर्णय योग्य होता. सर्वांत जास्त आमदार असूनही राज्यात सत्ता नसल्याने लोकांना तो निर्णय चुकीचा वाटत आहे. मी खासदार झालो त्यावेळी माझे आई व वडील दोघे नामदार व मी खासदार असे घरात तीन पदे असल्याने लोकांनी निर्णय योग्य असल्याचे सांगितले होते. आता तेच लोक निर्णय चुकल्याचे सांगतात. माझ्या भाजप प्रवेशाच्या निर्णयावर माझे वडील मला कधीही बोलले नाहीत. आम्ही आमच्या निर्णयावर समाधानी आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पक्षापेक्षा लोकांचे प्रश्न महत्त्वाचे
दिवंगत खासदार बाळासाहेब विखे पाटील हे मुख्यमंत्री पदाच्या लायकीचे व्यक्तिमत्त्व होते. काँग्रेसमध्ये ते अनेक वर्षे होते मात्र त्यांना मंत्रीपद मिळाले नाही. हिंदु ह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना पहिल्यांदा केंद्रात मंत्रीपद दिले. वडिलांना काँग्रेसने राज्यात मंत्रीपदे दिली मात्र पाटबंधारेसारखे मोठे मंत्रीपद दिले नाही. पक्ष कुठलाही असला तरी आम्ही हिमतीने लोकांच्यासमोर जातो. वारंवार पक्ष बदलून सुद्धा लोकांना आमचा तिरस्कार असता असे वाटणाऱ्यांनी लोक आम्हाला निवडून का देता हे समजून घेतले पाहिजे. आमच्यासाठी पक्षापेक्षा लोकांचे प्रश्न महत्त्वाचे आहेत. जो लोकांचे प्रश्न सोडवेल त्याच्या बरोबर आम्ही जातो. आमचे अस्तित्व टिकले तर आम्ही जनतेसाठी काहीतरी करू. त्यामुळे वाईटपणा येतो. पक्षांतर्गतही वाईटपणा येतो, असे त्यांनी सांगितले.
नीलेश लंकेंच्या लोकसभा उमेदवारी विषयी
लोकसभेच्या आगामी निवडणुकीत माझ्या विरोधात कोण लढेल याची परवा करत नाही. कागदावर आणि वास्तविकतेत मोठा फरक आहे. नगर जिल्ह्याचे राजकारण यातच खेळते. हे नगर जिल्ह्याचे वैशिष्ट्य आहे. तुम्हाला पक्षाचे कागदावर पदाधिकारी दिसतात. मात्र जेव्हा निवडणूक लागते त्यावेळी तुम्हाला कळेल कोण कोणाच्या बरोबर राहील. नगर जिल्हा हा वैचारिक जिल्हा आहे. तो कर्तृत्ववान माणसाला संधी देतो. प्रसारमाध्यमांत दिसणारे व सोशल मीडियात राहणारे लोकांच्या मनात असतात असे नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.
रोहित पवार व संग्राम जगताप यांच्याशी मैत्री
मी आमदार संग्राम जगताप यांच्या विरोधात निवडणूक लढविली त्यावेळी मी त्या मतदार संघाचा मतदारही नव्हतो. तरीही लोकांनी मला संधी दिली. उड्डाणपुलाच्या कामासाठी मी व संग्राम जगताप एकत्र आलो. आमचे विचार जुळले. त्यामुळे ट्युनिंग जमले. कर्जत-जामखेडमध्ये मला विचारतात रोहित पवार तुमचे मित्र आहेत. त्यावेळी मी त्यांना सांगितले, रोहित पवार माझे शत्रू नाहीत. मित्र आहेत की नाहीत यावर मी भाष्य करणार नाही. मात्र त्यांच्या काही कार्यपद्धती चुकतात. या बाबत मी त्यांना सांगितले आहे. कार्यकर्यांचा प्रवेश करून घेते. दबावाचा वापर करणे, ही प्रथा राजकारणात योग्य नाही. ते लोक पक्षात येतील मात्र मनाने तेथेच राहतील. मला कोणी बिनविरोध करणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेसने कोणाला माझ्या विरोधात तिकीट द्यावे हा त्यांचा प्रश्न आहे. माझ्या विरोधात कोण उभा राहिल यावरून मी रणनीती आखत नाही. मी माझ्या कामाच्या जोरावर लोकांना आवाहन करेल. लोकांना योग्य वाटले तर ते निवडून देतील, असे त्यांनी स्पष्ट केले.
विखे-थोरातांच्या वादावर भाष्य
बाळासाहेब थोरातांशी असलेले वैर कमी करण्यासाठी प्रयत्न करण्याबाबत खासदार डॉ. सुजय विखे पाटील म्हणाले, कुठलीही गोष्ट होण्यासाठी जुन्या काळातील राजकारणी व नवी पिढी महत्त्वाची असते. शरद पवार व माझ्या आजोबांत मोठा संघर्ष होता. अजित पवार व माझ्या वडिलांतील संघर्ष मुळा प्रवरावरून झाला. मात्र जेव्हा पुढची पिढी आली मी, रोहित पवार, पार्थ पवार. आम्ही जेव्हा अनौपचारिक भेटलो, बोलतो. तेव्हा कटूता कमी होते. विखे परिवाराच्यावतीने माझ्याशी संभाषण करता येते. मात्र त्यांच्या परिवाराशी संभाषण करायचे कोणाशी यामुळे कटूता आहे. माझे वडील व थोरातांतील कटुताही जुनी आहे. मी पुढाकार घ्यायचा ठरविला तरी बाळासाहेब थोरात यांच्या कुटुंबात अनेकजन राजकारणात असले तरी त्यांचा वारसदार निश्चित नाही. त्यामुळे मी संवाद ठेवायचा कुणाशी हा प्रश्न आहे. माझी संवाद करायची तयारी आहे. व्यक्तिगत मनात कटुता ठेऊन पक्षाच्या पलिकडे जाऊन भूमिका कधीकधी घेतली जाते. ती थांबली पाहिजे, अशी अपेक्षा खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.