Solapur News: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर यापुढे निवडणूक लढणार नाही अशी घोषणा केली आहे. तर दुसरीकडे आमदार प्रणिती शिंदे यांच्याबद्दल पक्षाअंतर्गत नाराजी वाढली असून अनेकांनी पक्षांतर केले आहे. अशा दुहेरी संकटात सापडलेल्या काँग्रेसला पुन्हा एकदा 'अच्छे दिन' आणण्यासाठी सुशीलकुमार शिंदे यांनाच पुढाकार घ्यावा लागणार आहे. त्यांच्यापुढे काँग्रेसपक्षासाठी वेळ देऊन सर्वांची नाराजी दूर करण्याचं आव्हान आहे.
एकेकाळी शहरात काँग्रेसचा ‘हात’कोणीच धरू शकत नव्हते, अशा मजबूत स्थितीत पक्ष होता. विष्णुपंत कोठे, धर्मण्णा सादूल, धर्मा भोसले, प्रकाश यलगुलवार, निर्मला ठोकळ, दिलीप माने, महेश कोठे, सुधीर खरटमल, प्रकाश वाले, आसिफ शेख, संजय हेमगड्डी, ॲड. यु. एन. बेरिया, अलका राठोड, नलिनी चंदेले, अरुणा वाकसे, सुशीला आबुटे, चेतन नरोटे, अमोल शिंदे, श्रीदेवी फुलारे, फिरदोस पटेल यांच्यासह इतर मातब्बर नेत्यांची फळी सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar shinde) यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी होती.
पण, काळाच्या ओघात ज्यांनी आपल्यासाठी खूप मेहनत घेतली, त्यांच्याच अपेक्षा पूर्ण करायला नेतेमंडळी कुठेतरी कमी पडली आणि पक्षाअंतर्गत धुसफूस सुरु झाली. त्याचा अंदाज न घेता नेत्यांची वाटचाल तशीच पुढे सुरू राहिली आणि हळूहळू पक्षातील मातब्बर नेतेमंडळींनी पक्षाला रामराम केला. त्यामुळे एकाकी पडलेल्या सुशीलकुमार शिंदे यांना सलग दोनवेळा लोकसभा निवडणुकीला पराभवास सामोरे जावे लागले. आता त्या नेत्यांमधील काहीजणांचे निधन झाले असून काहीजण वयामुळे राजकीयदृष्ट्या अलिप्त आहेत.
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असतानाही अनेकांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली, हे विशेष. विशेष बाब म्हणजे लोकसभा निवडणुकीत दोन्ही वेळेस भाजपच्या नवख्या उमेदवारांनी बाजी मारली. एकेकाळी मजबूत असलेला काँग्रेस पक्ष स्वत:च्या अस्तित्वासाठी संघर्ष करू लागल्याचे चित्र आहे. काँग्रेसच्या कठीण परिस्थितीत सुशीलकुमार शिंदे यांनी ॲक्टिव्ह होऊन पक्षांतर थांबवून जुन्या-नव्यांचा मेळ मजबूत केल्यास त्याचा निश्चितपणे फायदा महापालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत होऊ शकतो.
शिंदे ॲक्टिव्ह अन् पुन्हा लोकसभेची चर्चा...
माजी केंद्रीयमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी यापुढे निवडणूक लढवणार नाही असे स्पष्ट करताच माजी शहराध्यक्ष सुधीर खरटमल, माजी महापौर ॲड. यु. एन. बेरिया, नलिनी चंदेले यांनी पक्ष बदलला. माजी नगरसेविका श्रीदेवी फुलारे, प्रिया माने यांच्यासह अनेक आजी-माजी नगरसेवक पक्षापासून दुरावले आहेत. त्यातच जिल्हाध्यक्ष काँग्रेस भवनात येईनात, आमदार प्रणिती शिंदे या वेळ देत नाहीत अशी खंत अजूनही अनेकांच्या मनात आहे.
या पार्श्वभूमीवर आता सुशीलकुमार शिंदे पुन्हा राजकीय आखाड्यात दिसू लागले आहेत. त्यामुळे शिंदे पुन्हा एकदा लोकसभा निवडणूक लढवतील, असे बोलले जात आहे. पक्षश्रेष्ठीने त्यादृष्टीने सूचना केल्याचीही चर्चा आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.