Pandharpur, 26 July : विधानसभा निवडणुकीला आणखी तीन महिन्यांचा कालावधी असला तरी इच्छुकांकडून उमेदवारीसाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. पंढरपूर मतदारसंघातून भगीरथ भालके यांनी महाविकास आघाडीकडून उमेदवारीसाठी प्रयत्न चालवले आहेत. मध्यंतरी त्यांनी ज्येष्ठ नेते शरद पवारांचीही भेट घेतली होती.
मात्र, आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, पंढरपूरचे माजी तालुकाध्यक्ष प्रकाश पाटील तुंगतकर यांचेही नाव अचानकपणे पुढे आले आहे, त्यामुळे पंढरपुरात महाविकास आघाडीची उमेदवारी कोणाच्या गळ्यात पडते, याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.
प्रकाश पाटील तुंगतकर ((Prakash Patil Tungatkar)) हे गेल्या तीन दशकाहून अधिक काळ पंढरपूरच्या राजकारणात सक्रिय आहेत. काँग्रेसचे (Congress) तालुकाध्यक्षपद त्यांच्याकडे अनेक वर्ष होते. त्याच प्रकाश पाटील यांनी आता विधानसभा निवडणुकीसाठी चाचपणी सुरू केली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या उमेदवारीची लॉटरी नेमकी कोणाला लागते, याकडे पंढरपूरच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
प्रकाश पाटील हे माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. त्यांनी आतापर्यंतच्या राजकारणात सुशीलकुमार शिंदे यांना नेहमीच साथ दिलेली आहे. लोकसभेच्या निवडणुकीतही प्रकाश पाटील यांनी प्रणिती शिंदे यांच्या निवडणुकीच्या प्रचाराची संपूर्ण धुरा आपल्या खांद्यावर घेतली होती. त्याच पद्धतीने त्यांनी प्रणिती शिंदे यांच्यासाठी लोकसभा निवडणुकीत प्रचार यंत्रणा राबवली होती. आतापर्यंतच्या राजकारणात पाटील यांनी सुशीलकुमार शिंदे यांना निष्ठेने साथ दिली आहे.
लोकसभेनंतर आता विधानसभा निवडणुकीचा धुरळा उडणार आहे. संभाव्य उमेदवार तथा इच्छुकांनी आपापल्या परीने फिल्डिंग लावायला सुरुवात केली आहे. त्यात प्रकाश पाटील यांचे नावही चर्चेत आले आहे. त्यामुळे पंढरपूरमध्ये काँग्रेसचे उमेदवार कोण असणार, याची सर्वांना उत्सुकता आहे.
विठ्ठल सहकारी कारखान्याचे अभिजीत पाटील यांची ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी कारखान्याच्या मेळाव्यात पंढरपूरमधून विधानसभेची उमेदवारी जाहीर केली होती. मध्यंतरी लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत अभिजीत पाटील यांनी पवारांची साथ सोडून भाजपच्या उमेदवारांना पाठिंबा जाहीर केला होता, त्यामुळे महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असणार, याची चर्चा सुरू आहे.
लोकसभा निवडणुकीत भगीरथ भालके यांनीही काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांचे काम केले आहे, काँग्रेसकडून उमेदवारी मिळावी, यासाठी भगीरथ भालके यांचे प्रयत्न सुरू आहेत. लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान सुशीलकुमार शिंदे यांच्या भगीरथ भालके यांची उमेदवारीच्या संदर्भात चर्चा झाल्याची माहिती आहे. त्यामुळे काँग्रेसकडून नेमकी कोणाला उमेदवारी मिळणार, याची सर्वांना उत्सुकता आहे.
शिंदे यांच्याबरोबरच भगीरथ भालके यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची बारामतीत जाऊन भेट घेतली होती. त्यामुळे पंढरपूरमधून महाविकास आघाडीकडून कोण उमेदवार असेल. त्यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी दिली जाते का, याची चर्चा सुरू आहे. महाविकास आघाडीकडून सक्षम उमेदवाराचा शोध सुरू असला तरी प्रकाश पाटील यांच्या नावाला संमती मिळते का हेही पाहावे लागणार आहे. कारण ते मध्यंतरी सक्रीय राजकारणापासून काहीसे दूर हेाते.
Edited By : Vijay Dudhale
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.