राजेंद्र त्रिमुखे
Ahmednagar News : कांद्यावर 40 टक्के निर्यात कराच्या निर्णयावर कांदा पट्यात तीव्र आंदोलन करत सरकारवर दबाव वाढवणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे केंद्र सरकारच्या दोन लाख मेट्रिक टन खरेदीच्या निर्णयानंतर समाधान झालेले नाही. सरकारने घोषित केलेला दोन हजार 410 रुपये दराबाबत स्वाभीमानी पक्षाचा आक्षेप असून कांद्याला सरसकट तीन हजार रुपये प्रति क्विंटलचा भाव घोषित करा. स्वाभिमानी पक्षाच्या मागण्या असून या मागण्या मान्य न झाल्यास येत्या शुक्रवारी (25 ऑगस्ट) नगर- मनमाड महामार्गावर राहुरी शहरात बाजार समिती कार्यालयासमोर रास्तारोको आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
31 मार्च पर्यंत खरेदी केलेल्या कांद्याला 350 रुपये प्रति क्विंटल अनुदान देऊ केले पण ते अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यात जमा नाही ते त्वरित जमा करावे, अशा प्रमूख तीन मागण्या करण्यात आल्या आहेत. यावेळी सचिन गडगुळे, प्रकाश देठे, प्रमोद पवार, जुगलकुमार गोसावी, सचिन म्हसे, दत्तात्रय मोरे,रविंद्र निमसे, सतीश पवार आदींची उपस्थिती होती.
केंद्र सरकारने 19 ऑगस्ट रोजी कांद्यावर 40 टक्के निर्यात कर लावताच शेतकरी प्रश्नांवर नेहमी आक्रमक असलेल्या नगर जिल्ह्यातील स्वाभिमानी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली राहुरी, नगर,नेवासे आदी तालुक्यांच्या ठिकाणी बाजार समिती आवारात आंदोलनास सुरुवात केली. त्याचबरोबर विक्रीला आलेल्या कांद्याचा लिलाव होऊ दिला नाही. जिल्ह्यातील व्यापारी यांनीही दरा बाबतचा जिव्हाळ्याचा विषय असल्याने लिलाव बंद ठेवले. आता केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या संतप्त भावना पाहता तातडीने दोन लाख मेट्रिक टन कांद्याची खरेदी नाशिक-नगर जिल्ह्यात सुरू केली असली तरी स्वाभिमानी संघटनेचे यावर समाधान झाले नसून आता रास्तारोकोचा इशारा देण्यात आला आहे.