Nagar Politics : कोपरगाव, राहाता, श्रीरामपूर सभासद कार्यक्षेत्र असलेल्या राहाता तालुक्यातील श्रीगणेश सहकारी साखर कारखान्याची निवडणूक राज्यात प्रचंड गाजली ती विखे विरुद्ध थोरात-कोल्हे यांनी उभ्या केलेल्या पॅनेलमुळे. या निवडणुकीत राधाकृष्ण विखेंची अनेक वर्षांची असलेली सत्ता काँग्रेसचे बाळासाहेब थोरात आणि भाजपचे युवा नेते विवेक कोल्हे यांनी एकतर्फी खेचून आणत विखेंना तालुक्यात मोठा राजकीय शह दिला.
अनेक वर्षे अडचणीत असलेला श्रीगणेश कारखाना यंदा गाळपाच्या तयारीला लागला असला तरी आवश्यक असलेले कर्जे जिल्हा सहकारी बँकेकडून मिळत नसल्याने यास विद्यमान संचालक मंडळाने विखेंना जबाबदार धरले आहे. याबाबत जिल्हा बँकेकडून मदतीसाठी प्रयत्न करावेत, यासाठी संचालक मंडळाने आता सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले आहे.
याबाबत कारखान्याच्या वतीने श्रीगणेश कारखाना सुरू होण्याच्या दृष्टीने सकारात्मक गोष्टी घडू लागल्या आहेत. मात्र, पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील कारखान्याने जिल्हा बँक तसेच साखर आयुक्त यांना पत्र देऊन 'श्रीगणेश'च्या मार्गात अडथळे निर्माण केले आहेत. मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या सांगण्यावरूनच जिल्हा बँकेने 'श्री गणेश' ला कर्ज नाकारले आहे. त्यामुळे विखेंच्या दहशतीला सहकार खात्याने बळी पडू नये, अशी विनंती श्री गणेश सहकारी साखर कारखान्याच्या संचालकांनी मंत्री वळसे पाटील यांना केली आहे.
श्रीगणेश सहकारी साखर कारखाना सुरू करण्याच्या हेतूने सध्या प्रयत्न सुरू आहेत. मंत्री राधाकृष्ण विखे यांनीही 'श्रीगणेश' सुरू करण्यासाठी आम्ही पाठीशी राहू, असा शब्द निवडणूक झाल्यावर दिला होता. मात्र, तो शब्द फिरवीत 'गणेश'च्या मार्गात काटे निर्माण करण्याचे काम त्यांच्याकडून सुरू असल्याचा आरोप कारखान्याचे उपाध्यक्ष दंडवते यांनी केला आहे.
श्रीगणेश सहकारी साखर कारखान्याच्या कर्ज प्रकरणाला जिल्हा बँकेने मंजुरी दिली. त्यानंतर पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याने बँकेला पत्र देऊन 'श्रीगणेश'ला कर्ज देऊ नये, असे सांगितले. गणेश कारखान्याकडून अवाच्या सव्वा रकमेची मागणी केली, असा आरोप दंडवते यांनी केला आहे. नुकतेच पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कारखान्याने श्रीगणेश कारखान्याला पत्र देऊन ५० कोटी रुपये येणे असल्याचे कळविले. श्रीगणेश कारखान्याला कर्ज मिळू नये, यासाठी चाललेला हा आटापिटा आहे, असे दंडवते म्हणाले.
जिल्हा बँकेने राजकारण केल्याचा एकनाथ गोंदकर यांचा आरोप
नगर जिल्हा बँकेने श्रीगणेश कारखान्याला कर्ज मंजूर केले आणि दुसरीकडून अटींचा खोडा घातला. त्यामुळे जिल्हा बँकेचा हेतू स्पष्ट दिसून येत आहे. हे सर्व कोणाच्या सांगण्यावरून सुरू आहे, हे न समजायला जनता दूधखुळी नाही, असा आरोप डॉ. एकनाथ गोंदकर यांनी केला.
Edited By- Anuradha Dhawade
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.