नगर जिल्ह्यात आघाडीचाच बोलबाला, पण?

अहमदनगर ( Ahmednagar ) जिल्ह्यात विधानसभेच्या दृष्टीने विचार केल्यास राष्ट्रवादी काँग्रेसची ( NCP ) ताकद अधिक असल्याचे दिसून येते.
Ahmednagar
AhmednagarSarkarnama

अहमदनगर : जिल्ह्यात विधानसभेच्या दृष्टीने विचार केल्यास राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद अधिक असल्याचे दिसून येते. राज्यात कितीही फेरबदल झाले, तरीही जिल्ह्यातील सोयऱ्या-धायऱ्यांच्या राजकारणाचा परिणाम येथील निवडणुकांवर होत असतो. आज निवडणूक झाल्यास राष्ट्रवादीचाच वरचष्मा असेल, अशी सध्याची स्थिती आहे. The Mahavikas Aghadi is the talk of the town district, but?

एके काळी म्हटले जायचे, की सर्वाधिक तरुण कार्यकर्ते शिवसेना, भाजपकडे आहेत. आज मात्र जिल्ह्यात तरुण आमदार राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे आहेत. बारापैकी सहा आमदार राष्ट्रवादीचे आहेत. हे सहाही मतदार फायरब्रँड आहेत. या सहा जणांनी गेल्या दोन वर्षांतच आपले मतदारसंघ अशा पद्धतीने बांधून ठेवले आहेत, की त्यांना धक्का देण्याची ताकद आज तरी विरोधी पक्षाकडे दिसत नाही. नीलेश लंके, रोहित पवार, प्राजक्त तनपुरे, आशुतोष काळे, संग्राम जगताप हे ते युवा आमदार आहेत.

Ahmednagar
सुजय विखे विरुद्ध निलेश लंके या लढाईच्या सेमीफायनलची तयारी जोरात

अहमदनगर जिल्हा राजकीयदृष्ट्या पाहिला, तर पैपाहुणे आणि नात्यागोत्यांनी विणलेला आहे. जिल्ह्यात चौदा तालुके आणि बारा विधानसभा मतदारसंघ आहेत. या सर्व मतदारसंघांचा आणि सर्वपक्षीय नेत्यांचा विचार केला, तर ही नाती लांबची नाहीत, तर अगदी कोणाच्या बहिणी, मुली एकमेकांच्या घराण्यात दिलेल्या आहेत. पैपाहुण्यांचे पक्ष आणि खांद्यावर झेंडे वेगळे आहेत. म्हणजेच, राजकारणात हाडवैर नाही.

अकोले, संगमनेर, कोपरगाव, शिर्डी, नेवासे, राहुरी, पाथर्डी-शेवगाव, नगर शहर, श्रीगोंदे, कर्जत-जामखेड, पारनेर आणि श्रीरामपूर असे बारा विधानसभा मतदारसंघ आहेत. आज बारा आमदारांपैकी राष्ट्रवादीचे संग्राम जगताप, नीलेश लंके, प्राजक्त तनपुरे, डॉ, किरण लहामटे, रोहित पवार, आशुतोष काळे, काँग्रेसचे बाळासाहेब थोरात, लहू कानडे, भाजपचे राधाकृष्ण विखे, मोनिका राजळे, बबनराव पाचपुते आणि मंत्री शंकरराव गडाख (अपक्ष आता शिवसेनेचे मंत्री) असे पक्षीय बलाबल आहे. थोरात, गडाख, घुले पाटील, तनपुरे, काळे, कोल्हे घराण्यांकडे पाहिले, तर त्यांचे नातेसंबंध निकटचे आहेत. या नात्यांचा या ना त्या कारणाने निवडणुकीवर परिणाम होत असतो. जी काही राजकीय मदत करायची, ती पडद्याआडून केली जाते, असे बोलले जाते. हे सर्व नेते जाहीर व्यासपीठावरून मात्र कडवे विरोधक असल्याचे दिसून येते.

Ahmednagar
बाळासाहेब थोरात म्हणाले, शेतकऱ्यांसमोर अहंकारी केंद्र सरकार झुकले...

थोरात-विखेंचे राजकीय वैर जिल्ह्यात बाळासाहेब थोरात आणि राधाकृष्ण विखे पाटील यांचे राजकीय वैर सर्वश्रुत आहे. हे वैर कॉंग्रेस पक्षात असतानाही होते आणि विखे भाजपमध्ये गेल्यानंतरही ते संपलेले नाही. हे दोन्ही नेते एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी तर कायमच झडत असतात. सामाजिक, राजकीय, शिक्षण किंवा कृषी क्षेत्र असेल किंवा निळवंडे धरणाचा मुद्दा असेल, आरोपप्रत्यारोप हे होणार म्हणजे होणार. त्यामध्ये कधी खंड पडल्याचे दिसत नाही.

Ahmednagar
राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, नगर जिल्ह्यातील एक मोठा मंत्री भ्रष्टाचारात अडकलायं...

घराणेशाही

अहमदनगर जिल्ह्यातही घराणेशाहीचे राजकारण आहे. ज्यांचे आजोबा आमदार, खासदार, नामदार होते, त्यांचे नातू आज राजकारणात सक्रिय असल्याचे दिसून येते. काही जण मंत्री आहेत, तर काही आमदार आहेत. काही जणांकडे भावी आमदार म्हणूनही पाहिले जाते. दुसरी-तिसरी पिढी यशस्वी होताना दिसत आहे. केवळ घराणेशाहीमुळे ते टिकून आहेत असे नव्हे, तर राजकारणासाठी ज्या गोष्टी आवश्यक आहेत, त्या त्यांनी आत्मसात केल्याचे दिसून येत आहे. एके काळी पटका, नेहरू शर्ट, गांधी टोपी घालणाऱ्या ज्येष्ठ नेत्यांची मुलं-मुली हायटेक आहेत. मराठी, इंग्रजी, हिंदी भाषांवर प्रभुत्व आहेच; शिवाय उच्चशिक्षण घेतले आहे. हे बदलते राजकारणही दिसून येत आहे.

जिल्ह्याचे राजकारण सहकारावर अवलंबून आहे. कारखानदारीमुळे काही तालुक्यांचे चेहरेमोहरे बदलले दिसून येत आहेत. सहकारात नवे नेतृत्व आज नवनवीन प्रयोग करतानाही दिसून येत आहे. पूर्वी जिल्ह्याचे नेतृत्व करणारा एखादा नेता असायचा. आज जिल्ह्याचा नेता कोण, हे सांगणे कठीण आहे. प्रत्येक आमदाराला आपला मतदारसंघ कसा सुरक्षित राहील याची काळजी असते. प्रस्थापित नेते, विरोधकांची मान वर निघणार नाही हे पाहत असतात.

संगमनेर, अहमदनगर शहर, पारनेर, शिर्डी, नेवासे हे मतदारसंघ असे आहेत, की तेथे विरोधकांची ताकद दिसून येत नाही. याचा अर्थ, त्यांना विरोध करणारे पक्ष नाहीत का? तर तसे नाही. या नेत्यांनी आपली अशी ताकद निर्माण केली आहे, की कार्यकर्ते त्यांना सोडत नाहीत. विरोधकांची धार येथे कधी दिसून येत नाही. त्यामुळे हे मतदारसंघ या नेत्यांना सुरक्षित वाटतात.

Ahmednagar
पवार-विखे वादाला तरूणाई मैत्रीत बदलू पाहतेय...

राष्ट्रवादीची ताकद

आज जिल्ह्याचा विचार केल्यास राष्ट्रवादी कॉंग्रेसची ताकद अधिक असल्याचे दिसून येते. एके काळी म्हटले जायचे, की सर्वाधिक तरुण कार्यकर्ते शिवसेना- भाजपकडे आहेत. आज मात्र जिल्ह्यात तरुण आमदार राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे आहेत. बारापैकी सहा आमदार राष्ट्रवादीचे आहेत. हे सहाही मतदार फायरब्रँड आहेत. या सहा जणांनी गेल्या दोन वर्षांतच आपले मतदारसंघ अशा पद्धतीने बांधून ठेवले आहेत, की त्यांना धक्का देण्याची ताकद आज तरी विरोधी पक्षाकडे दिसत नाही. नीलेश लंके, रोहित पवार, प्राजक्त तनपुरे, आशुतोष काळे, संग्राम जगताप, हे ते युवा आमदार आहेत. अकोल्याचे डॉ. लहामटे हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार आहेत, पण ते प्रसिद्धीपासून कोसो दूर आहेत. त्यांचा मतदारसंघात संपर्क असेलही, पण जिल्ह्याच्या राजकारणात त्यांचे नाव झळकताना दिसत नाही.

वास्तविक डॉ. लहामटे यांनी एक वजनदार नेते मधुकर पिचड यांचे पुत्र वैभव पिचड यांचा पराभव केला आहे. योगायोगाने राज्यात आघाडी सरकारची सत्ताही आली, मात्र त्यांना सत्तेचा लाभ मतदारसंघासाठी उठविता आला नाही, असे दिसून येते. आता कुठे दोन वर्षे झाली आहेत. त्यांच्या हातात आणखी तीन वर्षे आहेत. त्यांना संधी नाही असे नाही, पण आमदार म्हणून छाप पाडण्याची संधी त्यांनी गमावता कामा नये. डॉ. लहामटे असे संथगतीने राजकारण करू लागले, तर त्याचा फायदा पिचड घराणे उठविल्याशिवाय राहणार नाही.

Ahmednagar
कर्जतमध्ये दोन वर्षांनी पुन्हा राम शिंदे विरुद्ध रोहित पवार सामना

राज्यात कॉंग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस या तीन पक्षांचे सरकार आहे. हे सरकार पाच वर्षे टिकले, तर जिल्ह्यात महाविकास आघाडीचेच वर्चस्व दिसून येईल. जी ताकद राष्ट्रवादीची दिसून येते, तशी भाजपची दिसून येत नाही. भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील हे एक वजनदार नेते आहेत. त्यांचे पुत्र डॉ. सुजय विखे खासदार आहेत. या पितापुत्रांचाही जिल्ह्याच्या राजकारणावर प्रभाव आहेच. तो कमी झाला नाही. विखेंच्या मतदारसंघाची बांधणीच अशी आहे, की त्याला कधीच खिंडार पडणार नाही. मतदारसंघात काय नाही, असा प्रश्न पडतो. डॉ. सुजय विखेंनी खासदार म्हणून चांगले बस्तान बसविले आहे. विशेषत: युवा पिढी त्यांच्यामागे आहे. त्याचा काही प्रमाणात भाजपला फायदा होऊ शकतो. आज विधानसभा निवडणूक झाली, तर जिल्ह्याचे चित्र काय असेल, याचा विचार केल्यास राष्ट्रवादी कॉंग्रेस टॉपला राहील असे दिसते.

Ahmednagar
खासदार विखे म्हणाले, कर्डिले होणार आमदार...

एकच महिला आमदार

पाथर्डी-शेवगावच्या आमदार मोनिका राजळे विजयाची हॅटट्रिक करण्याची शक्यता नाकारता येत नाही. मराठा व वंजारी समाजाची एकजूट व राजळे यांचा दांडगा संपर्क, या बळावर ही निवडणूक राजळे जिंकण्याची शक्यता नाकारता येत नाही. मतदारसंघात मराठा व वंजारी समाजाची संख्या लक्षणीय असून, मराठा समाज राष्ट्रवादीकडे झुकलेला आहे, तर वंजारी समाजावर (स्व.) गोपीनाथ मुंडे यांचा प्रभाव असल्याने, हा समाज भाजपकडे झुकलेला आहे. राजळे स्वतः मराठा असल्याने, या समाजाची मोठी व्होट बँक राष्ट्रवादीकडे न जाता राजळेंच्या पारड्यात मते टाकतात. वंजारी समाज हा भाजपचा पारंपरिक मतदार असल्याने, ही सर्व मते राजळे यांना मिळतात. या मतदारसंघात काँग्रेस व शिवसेनेचे अस्तित्व कागदोपत्री असून, सर्व राजकारण राष्ट्रवादी व भाजपभोवती फिरते. भविष्यात आघाडीतील तीनही पक्ष एकत्र आले, तरीही त्याचा फारसा परिणाम या मतदारसंघावर न होता, खरा सामना भाजप विरुद्ध राष्ट्रवादी, असाच रंगणार आहे.

Ahmednagar
अॅड. प्रताप ढाकणे यांच्या पुनर्वसनासाठी आमदार रोहित पवार प्रयत्न करणार

राष्ट्रवादीकडून माजी आमदार चंद्रशेखर घुले व प्रताप ढाकणे हे दोन प्रबळ उमेदवार आहेत. घुले यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिली तर ते शेवगाव तालुक्यातून मताधिक्य घेऊ शकतात, मात्र त्यांना पाथर्डी तालुक्यात राजळे यांना रोखण्यासाठी पुन्हा संपर्क वाढवावा लागेल.

कॉंग्रेसचा बालेकिल्ला श्रीरामपूर मतदारसंघात मागील २५ वर्षांपासून काँग्रेसचा उमेदवार निवडून येत असल्याने, मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. शहरी भागातील मतदारसंख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. काँग्रेस पक्षासाठी येथील जातीय समीकरणे अनुकूल आहेत. श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात आज निवडणूक घेतल्यास काँग्रेसचा अथवा महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून येईल. मतदारसंघ पुढील दोन पंचवार्षिक मागास प्रवर्गासाठी (SC) राखीव असल्याने, काँग्रेस, राष्ट्रवादीसह शिवसेनेसाठी पोषक वातावरण आहे. निवडणुकीच्या तोंडावर पाणीप्रश्नी राजकीय समीकरणे बदलतात.

Ahmednagar
स्नेहलता कोल्हे यांनी पिचड कुटुंबीयांना भेटून दिली श्रद्धा व सबुरीची शाल

पारनेरमध्ये सब कुछ लंके

राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व शिवसेना यांची युती झाली वा नाही झाली तरीही पारनेर-नगर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नीलेश लंके हेच निवडून येणार, हे निश्चित आहे. आमदार लंके यांनी कोरोना काळात रुग्णांसाठी केलेले काम व सध्या त्यांनी मतदारसंघात आणलेला विकासनिधी, तसेच तरुणांशी असलेला जनसंपर्क, ही त्यांची जमेची बाजू आहे. त्या मानाने शिवसेना सध्या तरी विस्कळित आहे. कोरोना काळात व गेली दोन वर्षे तालुक्यातील त्यांची कामे व जनतेशी असलेला संपर्क कमी झाला आहे. भारतीय जनता पक्षाचे तालुक्यात फारसे अस्तित्व नाही. त्यांच्याकडे साधा उमेदवारीसाठी चेहरासुद्धा नसल्याने, आगामी काळात कोणत्याही वेळी निवडणूक झाली तरी राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार निवडून येणार, हे जवळ जवळ निश्चित आहे.

Ahmednagar
बाळासाहेब थोरात म्हणाले, शेतकऱ्यांसमोर अहंकारी केंद्र सरकार झुकले...

श्रीगोंदे मतदारसंघात आघाडीला संधी

श्रीगोंदे मतदारसंघाचे राजकारण नेहमीच व्यक्तिकेंद्रित राहिले आहे. पक्षापेक्षा व्यक्तीला या मतदारसंघात महत्त्व राहिल्याचा इतिहास आहे. आज विधानसभा निवडणूक झाली, तर महाविकास आघाडीला विजयाची संधी अधिक जाणवते. भाजपचे आमदार बबनराव पाचपुते यांचे आजारपण व त्यांची निवडणुकीतील राजकीय धुरा सांभाळणारे त्यांचे बंधू सदाशिव पाचपुते यांचे झालेले आकस्मिक निधन, हा पाचपुते यांच्यासाठी मोठा सेट बॅक समजला जातो.

याचा मोठा फटका आमदार पाचपुते गटाला बसत आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी आमदार राहुल जगताप, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष घनश्याम शेलार, महिला काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस अनुराधा नागवडे हे तगडे उमेदवार महाविकास आघाडीकडे आहेत. अर्थात, बबनराव पाचपुते आजारी असले, तरी त्यांच्या पत्नी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतिभा पाचपुते या वेळी रिंगणात उतरू शकतात, अशी चर्चा आहे. पाचपुते यांची कमान प्रतिभा पाचपुते यांनी हातात घेतली व समोरून जगताप, नागवडे व शेलार यांच्यापैकी कोणीही दोन उमेदवार उभे राहिले, तरी पाचपुते यांची सरशी होण्याची शक्यता आहे. त्याचे प्रमुख कारण, पाचपुते यांच्याविरुद्ध एकच उमेदवार दिला तर ते अडचणीत येतात, हा इतिहास आहे. एकापेक्षा जास्त प्रबळ उमेदवार असतील, तर मग पाचपुते पुन्हा बाजी मारतील. आजच्या घडीला श्रीगोंदे मतदारसंघात विस्कळितपणा जाणवत आहे.

Ahmednagar
लॉकडाऊनविरोधात अनुराधा नागवडे झाल्या आक्रमक : महसूलमंत्र्यांना घातले साकडे

भारतीय जनता पक्षाने ऐन वेळी माजी आमदार शिवाजी कर्डिले यांना उमेदवारी दिल्यास यात अजून वेगळेपण दिसून येईल. तथापि, सद्यःस्थितीत जनसंपर्काच्या जोरावर महाविकास आघाडीचे घनश्याम शेलार हे आमदारकीच्या स्पर्धेत आघाडीवर मानले जातात. अनुराधा नागवडे व राहुल जगताप यांच्याकडे सहकारी साखर कारखान्याची सत्ता असल्यामुळे त्यांचा गट प्रबळ आहे. एकूणच, महाविकास आघाडीला सद्यःस्थितीत चांगले दिवस असले, तरी जगताप, नागवडे व शेलार यांच्यात एकी राहीलच अशी स्थिती नाही. त्यातच पाचपुते यांची घटणारी राजकीय शक्ती कुणासाठी फायद्याची आहे, हे समजण्यास वेळ लागेल. ऐन वेळी भाजपचा उमेदवार कोण असेल, हेही आत्ताच सांगणे कठीण होऊन बसले आहे. पर्यायाने, पक्षापेक्षा या मतदारसंघात व्यक्तीलाच पुन्हा महत्त्व प्राप्त होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com