

Solapur, 15 May : केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे गुरुवारी (ता. १५ मे) सोलापूर दौऱ्यावर होते. अक्कलकोटहून आल्यानंतर गडकरी यांनी माजी सहकार मंत्री तथा आमदार सुभाष देशमुख यांच्या होटगी रस्त्यावरील घरी सदिच्छा भेट दिली. गेल्या १५ दिवसांत भाजपच्या तीन मोठ्या नेत्यांनी देशमुख यांच्या घरी भेट दिली आहे. त्यामुळे विदर्भातील मोठ्या नेत्यांचे सुभाष देशमुखांवरील प्रेम पुन्हा एकदा दिसून आले आहे.
गेल्या महिन्याच्या एप्रिलच्या शेवटी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्थानिक स्वराज्य संस्थांतील यशाबद्दल सोलापुरातील कार्यकर्त्यांचे कौतुक करण्यासाठी सोलापुरात आले होते. बार्शीहून आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नियोजित दौऱ्यात नसतानाही कार्यक्रमस्थळी जाण्याच्या अगोदर आमदार देशमुख यांच्या घरी भेट दिली होती.
फडणवीस यांच्यानंतर मागील आठवड्यात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे सोलापूर आणि करमाळ्याच्या दौऱ्यावर आले होते. त्यावेळी बावनकुळे हेही नियोजित दौऱ्यात नसताना माजी मंत्री देशमुख यांच्या घरी गेले होते. त्यामुळे बावनकुळे हे देशमुखांच्या घरी भेट देणारे नागपूरचे दुसरे नेते ठरले होते.
केंद्रीय मंत्री गडकरी हे गुरूवारी सोलापूरच्या दौऱ्यावर होते. पुणे ते पंढरपूर पालखी मार्गाची पाहणी गडकरी यांनी केली होती. त्यानंतर प्रशांत परिचारक यांच्या घरी दुपारचे भोजन घेतल्यानंतर गडकरी हे बायरोड अक्कलकोट गेले होते.
अक्कलकोटमधील कार्यक्रम आटोपून नितीन गडकरी हे मुक्कामासाठी सोलापुरात आले होते. त्या वेळी गडकरी यांनी देशमुख यांच्या घरी भेट दिली. या वेळी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मनीष देशमुख यांनी चरणस्पर्श करून गडकरींचे आशीर्वाद घेतले. देशमुख कुटुंबीयांनी गडकरी यांचे स्वागत केले.
या भेटीदरम्यान सोलापूर शहरातील विविध विकास कामांवर चर्चा झाली. त्यात शहरातील दोन्ही उड्डाणपूल, आसरा पूल याबाबत संवाद झाला. आमदार देशमुख यांनी हे प्रश्न त्वरित मार्गी लावण्याची मागणी केली. शहराच्या विकासासाठी केंद्र सरकारकडून आवश्यक सहकार्य मिळावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
गडकरी यांनी उड्डाणपुलाची आपण घोषणा केली आहे, ते पूर्ण होईलच असे सांगितले. त्यासाठी सर्व प्रक्रिया लवकरच पूर्ण केली जाईल, असे ते म्हणाले. जुना पुणे नाका ते बोरामणी नाका दरम्यानच्या उड्डाणपुलासाठी 1020 कोटी रुपये मंजूर करत असल्याचेही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी सांगितले.
या वेळी रोहन देशमुख व भाजपचे नेते, कार्यकर्ते उपस्थित होते. या भेटींमुळे सोलापूरच्या राजकारणात आमदार देशमुख यांचे वाढते महत्त्व अधोरेखित होत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.