माढा (जि. सोलापूर) : माढा तालुक्याची कुर्डुवाडी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बिनविरोध निवडणुकीची परंपरा यंदा खंडित झाली आहे. माढ्यात राष्ट्रवादी काँग्रेस , शिवसेना, काँग्रेस, शेकाप असा चौरंगी सामना होण्याचा अंदाज आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बबनराव शिंदे (Baban Shinde), संजय शिंदे (Sanjay shinde) यांच्या एकहाती वर्चस्वाला आरोग्य मंत्री तानाजी सावंत (Tanaji sawant) आणि प्रा. शिवाजी सावंत यांनी कडवे आव्हान दिले आहे. त्यामुळे माढ्यात बाजार समितीची निवडणूक रंगतदार होण्याची शक्यता आहे. (Tradition of non-opposition in Madha market committee is broken)
बाजार समितीच्या १८ जागांसाठी तब्बल १४६ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. सत्ताधारी आमदार बबनराव शिंदे व आमदार संजय शिंदे, काँग्रेसचे माजी आमदार धनाजीराव साठे, तर शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. शिवाजीराव सावंत यांचे नेतृत्वाखालील सर्वपक्षीय परिवर्तन पॅनेल आणि शेतकरी कामगार पक्षाचे ॲड. बाळासाहेब पाटील अशा चार गटाच्या उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.
अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी आमदार बबनराव शिंदे, माजी आमदार धनाजीराव साठे, प्रा. शिवाजीराव सावंत ही नेतेमंडळी माढ्यात ठाण मांडून होती. अर्ज दाखल केलेल्या मातब्बर नेतेमंडळींमध्ये विद्यमान अध्यक्ष तथा आमदार संजय शिंदे, उपाध्यक्ष सुहास पाटील जामगावकर, शिवसेनेचे माढा लोकसभा संपर्क प्रमुख संजय कोकाटे, शेकापचे ॲड. बाळासाहेब पाटील यांचा समावेश आहे.
कृषी उत्पन्न बाजार समितीतील सत्ताधारी आमदार बबनराव शिंदे गट आणि प्रा. शिवाजीराव सावंत यांच्या नेतृत्वाखालील गटाने सर्व जागांवर उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. माजी आमदार धनाजीराव साठे यांच्या गटाने अठरा पैकी सतरा जागांवर, तर ॲड. बाळासाहेब पाटील यांनी आठ जागांवर अर्ज दाखल केले आहेत.
बाजार समितीतील आमदार शिंदे बंधूंच्या एकहाती वर्चस्वाला आमदार शिंदे विरोधकांची प्रा. शिवाजीराव सावंत यांच्या नेतृत्वाखाली मोट बांधण्यात आली आहे. या निवडणुकीमध्ये आमदार शिंदे यांना प्रा. शिवाजीराव सावंत यांच्याबरोबरच काँग्रेसच्या साठे गटाचे व शेकापच्या पाटील गटाने आव्हान दिले आहे.
उमेदवारी अर्जांची छाननी बुधवारी (ता. ४ एप्रिल) होणार असून २० एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज माघार घेण्याची मुदत आहे. उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतरच निवडणुकीची खरे चित्र स्पष्ट होणार आहे. मात्र मागील काही निवडणुका बिनविरोध होण्याची परंपरा यंदा राखली जाण्याची शक्यता कमी आहे.
सध्या तरी निवडणुकीचे चित्र चौरंगी दिसत असले तरी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत काही राजकीय हालचाली होऊन निवडणुकीचे चित्र बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही. बाजार समितीच्या निवडणुकीचे चित्र स्पष्ट होण्यासाठी २० एप्रिलपर्यंत वाट पहावी लागणार आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.