सातारा : सर्वसामान्य कामगारांवर अन्याय होत असेल तर आम्ही अन्यायाला विरोध करणारच. पंडीत ऑटोमोटिव्हच्या जागेसह सर्वच व्यवहार झालेल्या जागांची न्यायालयीन चौकशी लावणार असून यातून सर्व काही बाहेर येईल, असा इशारा खासदार छत्रपती उदयनराजे भोसले (Udayan Raje Bhosale) यांनी दिला.
या संदर्भात उदयनराजे यांनी फेसबुक पोस्ट केली आहे. पंडीत ऑटोमोटिव्हची जागा भाजपचे (BJP) आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले (ShivendraSinh Raje Bhosale) यांनी विकत घेतली आहे. त्यावरुन उदयनराजे यांनी इशारा दिला आहे. त्यामुळे सातारा शहरात पुन्हा एकदा दोन्ही राजेंमध्ये वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
उदयनराजे यांनी म्हटले आहे की, सातारा एमआयडीसीची तसेच गोरगरीब, सर्वसामान्य कामगारांची दुर्दशा कोणामुळे झाली, असा सवाल त्यांनी केला. याची संपूर्ण माहिती सातारा जिल्ह्यातील जनतेला आहे. मुळात सातारची एमआयडीसी स्थापन झाली त्यावेळी आम्ही तीसरीमध्ये होतो. त्यांचा तर जन्मही नव्हता, असा टोला त्यांनी लगावला.
तत्कालीन लोकप्रतिनिधी, त्यानंतरचे लोकप्रतिनिधी व ज्यांचा बालकमंत्री म्हणून उल्लेख केला गेला होता, या सर्वांच्या कचखाऊ वृत्तीमुळे, बांधकामास सुरुवात करणारी डॉ. बेग, इंडीयन सिमलेस पाईप्स, एल & टी यांच्या सारख्या अनेक कंपन्या रातोरात दुसरीकडे गेल्या. या अशा कारणांमुळे सातारा एमआयडीसीची खरी वाट लागली हे त्यांना सुध्दा माहिती आहे. मात्र, त्यांना जळी, स्थळी, काष्ठी सर्वत्र उदयनराजेच दिसतात म्हणून आमच्या नावाने नेहमीप्रमाणे ओकतात, असा आरोप त्यांनी केला.
साताराबरोबरच सुरु झालेली नगरची एमआयडीसी आज कुठच्या कुठे गेली आहे. त्यांनी वस्तुस्थिती समजून घेवून वक्तव्य करावे. साप समजुन भुई थोपटण्याची सवय सोडावी. पडद्या. आडून गुन्हे करणाऱ्या (व्हाईट कॉलर) क्रिमिनल्सनी दुस-यांवर आरोप करणे त्यांना शोभुन दिसते. त्यांनी केलेल्या आरोपांना आपण आणि सामान्य जनता काडीचीही किंमत देत नाही, असेही उदयनराजे यांनी सांगितले.
वय वाढले कि बाल बुध्दी येते मग राजकारणातील त्यांच्या पेक्षा सर्व जेष्ठ व्यक्तींचीही बालबुध्दी आहे असेच त्यांना म्हणायचे आहे का. असे असेल तर मात्र, नक्कीच मोठा मानसिक धक्का त्यांना बसला असावा आणि आता त्यांना तातडीने उपचाराची गरज आहे. त्यांच्या बालबुध्दी वक्तृत्वाची त्यांच्यापेक्षा जेष्ठ असलेल्या राजकारणी व्यक्ती नक्कीच नोंद घेतील आणि ते सर्व मिळुन त्यांना आणखी पक्षविरहीत धक्के देतील. काळजी वाटते, असेही ते म्हणाले. थंड रक्ताचे नाही. सर्वसामान्यांवरील अन्याय होत असेल तर आम्ही त्यांच्यासारखे अन्यायाला विरोध करणारच. पंडीत ऑटोमोटिव्हच्या जागेसह सर्वच व्यवहार झालेल्या जागांची न्यायालयीन चौकशी लावणारच आहे. त्यात सर्व काही बाहेर येईल, असेही उदयनराजे भोसले यांनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.