मोहोळ (जि. सोलापूर) : ‘‘गेल्या २५ वर्षांपासून तुमचेच सरकार आहे, तरीही मोहोळ तालुक्याचा विकास खुंटला आहे. सोलापूर जिल्ह्यात आजही माजी आमदार राजन पाटील (rajan patil) यांच्या शब्दाला मान आहे. माझ्यासारखा जिल्हा परिषद सदस्य एका फोनवर कामे करतो; मग तुम्ही ती का करू शकत नाही,’’ असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे (ncp) प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील (umesh patil) यांनी आपल्याच पक्षाचे माजी आमदार राजन पाटील यांना केला आहे. (Umesh Patil criticizes former MLA Rajan Patil over development in Mohol)
ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या वाढदिवसापासून उमेश पाटील यांनी नागरिकांच्या विविध समस्यांच्या निपटाऱ्यासाठी गावोगावी जनता दरबाराचे आयोजन केले आहे. त्याचा आढावा घेताना पाटील माध्यमांशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी वरील आरोप केला. गेल्या दोन महिन्यांपासून राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन पाटलांमध्ये संघर्ष सुरू आहे. त्यांच्यात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. या वेळी मोहोळचे माजी नगराध्यक्ष रमेश बारसकर, पंचायत समितीचे माजी उपसभापती मानाजी माने, अशोक क्षीरसागर, सचिन चव्हाण, अतुल क्षीरसागर, शीलवंत क्षीरसागर, तन्वीर शेख यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.
उमेश पाटील म्हणाले की, राजकीय इच्छाशक्तीअभावी मोहोळ तालुक्याचा गेल्या २५ ते ३० वर्षांपासून विकास खुंटला आहे. नागरिकांना अनाठायी भीती दाखवून त्यांच्या पायात साखळी बांधण्याचे काम गेल्या अनेक वर्षांपासून सुरु आहे. पण, आताची तरुणपिढी हुशार आहे, त्यांनी संघर्षाच्या माध्यमातून या साखळीला एक हिसका दिला तरी ती साखळी तुटायला वेळ लागणार नाही. मात्र, ती साखळी नसून सुतळी आहे, या मानसिकतेतून मनाची तयारी झाली पाहिजे.
घाटणे बॅरेज अडविणे, गेल्या पंचवीस वर्षांपासून रखडलेला मलिकपेठचा पूल कार्यान्वित करणे ही कामे केवळ एका फोनवरची आहेत. पण, गेल्या पंचवीस वर्षांत ती झाली नाहीत, हे वास्तव आहे. प्रगतीसाठी मोहोळ तालुक्याला नैसर्गिक वातावरण आहे, त्यातही राष्ट्रीय महामार्ग तालुक्यातून गेला आहे. उजनी डावा कालवा, आष्टी जलाशय आहे. मग, कामे का होत नाहीत, त्यासाठी मानसिकता बदलली पाहिजे, असेही पाटील म्हणाले.
सर्वसामान्यांची जिल्हा मध्यवर्ती बँक, दूध संघाचे वाटोळे केले, तरीही सत्तेसाठी त्यात घुसण्याची इच्छा प्रबळ आहे, हे लोक आता उघड बोलू लागले आहेत. शरद पवारांसारख्या नेत्याचा वापर यांनी चुकीच्या कामासाठी केला. पवारांकडे यादी आहे. ज्याच्या विरोधात तक्रार आहे, त्याच्या नावावर फुलीऐवजी तक्रार करणाऱ्याच्या नावापुढे फुली असते, हे समजून घ्या. जनता एक दिवस या सर्वांचा जाब विचारणार आहे. मात्र पवारांचा कार्यकर्ता म्हणून या गोष्टी मी कदापि सहन करणार नसल्याचे पाटील यांनी सांगितले. या वेळी माजी नगराध्यक्ष बारसकर, माजी उपसभापती माने यांची भाषणे झाली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.