

सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी नागरिक मागास प्रवर्ग महिलेसाठी आरक्षण जाहीर झाल्याने बुध गटाला पहिल्याच निवडणुकीत अध्यक्षपदाची मोठी संधी मिळाली आहे.
आमदार महेश शिंदे, मंत्री जयकुमार गोरे, आणि राष्ट्रवादीचे दोन्ही गट या निवडणुकीत प्रभाव दाखवण्याचा प्रयत्न करत असून महिला उमेदवारांच्या शर्यतीला जोर आला आहे.
काँग्रेस-राष्ट्रवादीचे जुने नेते नवीन राजकीय समीकरणं उभी करण्याच्या तयारीत असून ग्रामविकास मंत्री गोरे यांच्या निर्णायक मतांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.
Pusegaon, 31 October (ऋषिकेश पवार ) : सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलेचे आरक्षण जाहीर झाले. नेमके तेच आरक्षण बुध गटासाठीही जाहीर झाले आहे, त्यामुळे नवख्या बुध गटाला पहिल्याच निवडणुकीत अध्यक्षपदाचा उमेदवार निवडून देण्याची संधी चालून आली आहे. या गटात आमदार महेश शिंदे यांची शिवसेना, त्यांच्या पत्नी डॉ. प्रिया शिंदे यांच्यासह भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसमधून कोणता उमेदवार द्यायचा, याची मोठी चुरस पाहायला मिळणार आहे, त्यामुळे अध्यक्षपदाच्या खुर्चीपर्यंत जाण्याचा मार्ग ऐकीच्या कर्मावर अवलंबून असणार हे स्पष्ट आहे.
बुध गटांतर्गत डिस्कळ आणि बुध हे दोन्ही पंचायत समितीचे गणही सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झाल्याने येथे महिलाराज येणार आहे. त्यासाठी राजकीय नेत्यांना आता आपल्या कुटुंबातील महिलेच्या उमेदवारीसाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. अशा स्थितीत वडुजपासून जवळ असलेल्या खटाव तालुक्यातील बुध गटात ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांचा कौल आणि समन्वयाचे प्रयत्न कितपत यशस्वी ठरणार, ते कोणती रणनीती आखणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
दोन्ही राष्ट्रवादीची सलगी
राज्यात राष्ट्रवादीत फूट पडून दोन गट पडले असले, तरी बुध जिल्हा परिषद गटातील आमदार शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे कार्यकर्ते दोन्ही नेते आपलेच असल्याची भूमिका खासगीत मांडत आहेत. त्यामुळे येथे दोन्ही राष्ट्रवादी मिळून एकच उमेदवार देण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे झाल्यास कायमच राष्ट्रवादीचा बालेकिल्ला राहिलेल्या या गटात राष्ट्रवादीकडून स्मिता संतोष साळुंखे, सुनीता विजय कचरे यांना उमेदवारी मिळू शकते.
आमदार महेश शिंदे गटाकडून मोनिका सागर मदने, पूनम मंदार माळी या नवीन चेहऱ्यांना संधी मिळू शकते. बुध गणात राष्ट्रवादीकडून तळागाळातील जनतेशी संपर्क असलेल्या संजय चव्हाण, बाळासाहेब इंगळे, सागर साळुंखे यांच्या कुटुंबातील महिलेला संधी मिळण्याची दाट शक्यता आहे, तर आमदार महेश शिंदे गटाकडून अभय राजेघाटगे, महेश पवार, हरी सावंत यांच्या कुटुंबातील नावे चर्चेत आहेत.
डिस्कळला अनेक जण इच्छुक
डिस्कळ गणात राष्ट्रवादीकडून डॉ. महेश पवार, प्रदीप गोडसे, कैलास घाडगे यांच्या कुटुंबातील महिला उमेदवार असू शकते, तर आमदार महेश शिंदे गटाकडून शिवाजी शेडगे, अमित जगताप यांच्या कुटुंबातील नावे आघाडीवर आहेत. या गणात कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राहुल फडतरे यांच्या विचाराच्या उमेदवारीची शक्यता नाकारता येत नाही.
नव्या समीकरणांचा उदय
तत्कालीन काँग्रेस-राष्ट्रवादीचे आघाडी सरकार असताना मानाजी घाडगे, विठ्ठलराव फडतरे, महेश नलवडे, राजेंद्र घाटगे, पोपट बिटले आदी नेत्यांचे बुध गटावर वर्चस्व राहिले आहे. अजूनही या नेतेमंडळींची बुध जिल्हा परिषद गटावर मजबूत पकड आहे. त्यामुळे ही जुनी काँग्रेसची मंडळी स्वतः उमेदवार न देता बेरजेच्या गणितातून एखादे नवे राजकीय समीकरण उदयास आणतात का? हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे.
मागील काळापासून या भागात राष्ट्रवादीचे वर्चस्व राहिले आहे. बुध जिल्हा परिषद गटातील सध्याची राजकीय परिस्थिती पाहता आमदार महेश शिंदे यांनी संघटनेची ताकद वाढवली आहे. राष्ट्रीय काँग्रेस आणि शिवसेनेची भूमिका अजून गुलदस्त्यातच आहे. त्यामुळे या गटात तुल्यबळ आणि चुरशीच्या लढती पाहावयास मिळणार आहेत.
मंत्री गोरेंची मेहेरनजर महत्त्वाची
ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांना मानणारा मोठा वर्ग बुध जिल्हा परिषद गटात आहे. या गटातील प्रत्येक गावात त्यांचा तगडा संपर्क आहे. मंत्री झाल्यापासून त्यांनी येथील आपले जुने सहकारी आणि कार्यकर्त्यांना विकासकामांच्या माध्यमातून बळ दिल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत हक्काच्या निर्णायक मतांमुळे गोरे यांची भूमिका देखील महत्त्वाची ठरणार आहे.
Q1. बुध गटासाठी कोणते आरक्षण जाहीर झाले?
A1. बुध गटासाठी नागरिक मागास प्रवर्ग महिलेसाठी आरक्षण घोषित झाले आहे.
Q2. कोणत्या नेत्यांचे गट या निवडणुकीत प्रमुख ठरणार आहेत?
A2. आमदार महेश शिंदे, राष्ट्रवादीचे दोन्ही गट, आणि मंत्री जयकुमार गोरे यांचे गट प्रमुख ठरणार आहेत.
Q3. राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका कशी आहे?
A3. दोन्ही राष्ट्रवादी गट एकत्र येऊन एकच उमेदवार देण्याची शक्यता आहे.
Q4. जयकुमार गोरे यांची भूमिका का महत्त्वाची आहे?
A4. त्यांच्या गटाचा बुध जिल्हा परिषदेत मोठा प्रभाव असल्याने ते निर्णायक भूमिका बजावतील.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.