
प्रभूलिंग वारशेट्टी
Solapur, 07 June : सोलापूर भाजपमधील वाद अत्यंत टोकाला गेल्याचे पुन्हा एकदा उघड झाले आहे. सत्ताधारी भाजपचे आमदार एकमेकांना बोलणे तर सोडाच पण समोरासमोर येत नसल्याचे राज्याचे मत्स्य आणि बंदरे विकास मंत्री नीतेश राणे यांच्या दौऱ्यात प्रकर्षाने जाणवले. जोपर्यंत आमदार विजयकुमार देशमुख हे राणे यांच्यासोबत होते, तोपर्यंत आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी मंत्र्यांकडे जाणे टाळले. मंत्री राणे जेव्हा कल्याणशेट्टी यांना भेटण्यासाठी सुधीर थोबडे यांच्या घरी गेले, त्यावेळी देशमुखांनी काढता पाय घेतला. त्यानंतर कल्याणशेट्टी आणि राणे हे दोघे एकाच गाडीतून सांगोल्याला गेले. मात्र, सोलापूर भाजपमधील संघर्ष दिवसेंदिवस तीव्र स्वरूप घेताना दिसत आहे.
मंत्री नीतेश राणे (Nitesh Rane) हे दोन दिवसांपूर्वी सोलापूर दौऱ्यावर बाबा कादरी आणि पंजाब तालीम घटनेतील पीडित हिंदू कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी आले होते. मंत्री राणे हे गुरुवारी (ता. 05 जून) सकाळी अकराच्या सुमारास पीडितांच्या घरी भेटायला आले. या भेटवेळी राणे यांच्यासोबत शहरातील एकही आमदार नव्हता. शहर उत्तरचे भाजप आमदार विजयकुमार देशमुख हे हिरेहब्बू यांच्या वाड्यात मंत्री राणे यांची वाट पाहत थांबले होते. पीडितांच्या भेटीनंतर राणे यांनी वडार गल्ली येथील अय्या गणपतीची आरती केली.
वडार गल्लीतील गणपतीच्या आरतीनंतर नीतेश राणे हे बाळीवेस येथील कपिलसिद्ध मल्लिकार्जून मंदिरात महाआरतीसाठी आले होते. तोपर्यंत हिरेहब्बू वाड्यात भाजप आमदार विजयकुमार देशमुख (Vijaykumar Deshmukh), तर हाकेच्या अंतरावरच असलेल्या सुधीर थोबडे यांच्या घरी अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी मंत्र्यांची वाट पाहत थांबले होते.
आमदार कल्याणशेट्टी आल्याचे तोपर्यंत कोणत्याही भाजप कार्यकर्त्याला साधी खबरदेखील नव्हती. महाआरतीनंतर मंत्री राणे यांची पत्रकार परिषद होईपर्यंत आमदार देशमुख सोबत होते. पत्रकार परिषद संपल्यानंतर आमदार सचिन कल्याणशेट्टी (Sachin Kalyanshetti) आल्याची कुणकुण देशमुख यांना लागली होती, त्यामुळे मंत्री राणे यांनी थोबडे यांच्या घरी मोर्चा वळविला.
आमदार कल्याणशेट्टी हे थोबडेंच्या घरी थांबल्याचे समजताच आमदार देशमुखांनी राणेंच्या दौऱ्यातून काढता पाय घेतला. त्यानंतर मंत्री राणे आणि आमदार कल्याणशेट्टी यांनी चर्चा केली आणि बाहेर पडले. आमदार कल्याणशेट्टी बाहेर पडेपर्यंत पत्रकारांनाही ते आल्याची माहिती नव्हती. चर्चेनंतर कल्याणशेट्टी आणि राणे हे दोघे बाहेर येताच सर्वजण चकित झाले. आमदार देशमुख हे थोबडे यांच्या घरी न येण्याचे कारण आमदार कल्याणशेट्टी यांची असलेली उपस्थिती हे असल्याची कुजबूज त्यावेळी सुरू हेाती.
चर्चेनंतर आमदार कल्याणशेट्टी आणि मंत्री राणे दोघेही सांगोल्याच्या दिशेने एकाच गाडीत निघून गेले. राज्याचे मंत्री आल्यानंतरही भाजपमधील वरिष्ठ आमदारांमधील गटबाजी उघडपणे समोर येत आहे. मात्र, सोलापूरच्या जनतेने मताचे दान भरभरून देऊनही हे सत्ताधारी आमदार जनतेसाठी काही न करता एकमेकांमध्ये भांडत असल्याचे दिसून येत आहे.
Edited By : Vijay Dudhale
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.