
Satara, 07 June : पडझड झालेल्या आणि अखेरची घटका मोजत असलेल्या सातारा काँग्रेसच्या गडाची चावी खटाव तालुक्यातील रणजितसिंह देशमुख यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. अत्यंत कठीण काळात देशमुख यांच्याकडे काँग्रेस पक्षाची धुरा आली आहे, त्यामुळे पक्षाला नवसंजीवनी देण्यासाठी देशमुख यांना मोठी मेहनत घ्यावी लागणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीत चांगली कामगिरी करण्याचे मोठे आव्हान देशमुख यांच्यापुढे असणार आहे. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या मतदारसंघातून येणारे देशमुख यांच्यावर सातारा जिल्ह्यात काँग्रेस पक्ष वाढविण्याची जबाबदारी असणार आहे.
कार्यकाळ संपल्यानंतर डॉ. सुरेश जाधव यांनी सातारा काँग्रेसच्या (Satara Congress) जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदासाठी अनेक नावांची चर्चा सुरू होती. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी देशमुख यांच्या नावाला पसंती दर्शविल्यानंतर प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पत्राद्वारे त्यांची निवड जाहीर केली आहे. तसेच, पृथ्वीराज चव्हाण यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे.
विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील, आमदार विश्वजीत कदम यांनीही रणजितसिंह देशमुख (Ranjitsinh Deshmukh) यांच्या नावाला आपला पसंती दर्शवला आहे. त्यामुळे सातारा काँग्रेसची धुरा देशमुख यांच्या खांद्यावर आली आहे. मात्र, देशमुख यांच्यासमोर अत्यंत कठीण काळ असणार आहे. अनेक मोठे नेते पक्ष सोडून गेले आहेत, त्यामुळे जिल्हाध्यक्ष म्हणून देशमुखांची मोठी परीक्षा असणार आहे.
देशाला दिग्गज नेते देणाऱ्या सातारा काँग्रेसची अवस्था सध्या अत्यंत केविलवाणी आहे. अनेक मोठ्या नेत्यांनी साथ सोडल्याने काँग्रेसचे जहाज सध्या वादळात मोठ्या प्रमाणात हेलकावे खात आहे. निष्ठावंत म्हणून सातारा जिल्ह्यात नावलौकिक असणारे ॲड. उदयसिंह पाटील उंडाळकर यांनीही पक्षाला रामराम करत सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे मोजक्या मावळ्यांना सोबत घेऊन देशमुखांना काँग्रेस पक्षाला गतवैभव प्राप्त करून द्यावे लागणर आहे.
रणजितसिंह देशमुख हे खटाव तालुक्यातून येतात. घरातून त्यांना राजकीय वारसा मिळाला आहे. त्यांचे वडील धैर्यशीलराव देशमुख हे खटाव काँग्रेसचे नेते होते. त्यांचा राजकीय वारसा रणजितसिंह देशमुख पुढे चालवत आहेत. देशमुख यांनी खटाव सारख्या दुष्काळी तालुक्यात हरणाई सहकारी सूत गिरणी आणि माण तालुक्यात माणदेशी सहकारी सूतगिरणी यशस्वीरित्या चालवून दाखवल्या आहेत. त्यांच्या या दोन्ही सूतगिरणीचा विशेष लौकिक आहे.
रणजितसिंह देशमुख यांनी यापूर्वी युवक काँग्रेसच्या सातारा जिल्हाध्यक्षपदाची धुरा यशस्वीपणे सांभाळलेली आहे. मागील दुष्काळी परिस्थितीत रणजितसिंह देशमुख यांनी सोनिया गांधी यांना माण, खटाव तालुक्यात दुष्काळी कामाला प्रशासकीय पातळीवरून वेग देण्याचा प्रयत्न केला होता. देशमुख यांनी पुण्यातील विधी महाविद्यालयातून कायद्याची पदवी संपादन केली असून ते सध्या काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य आहेत.
अत्यंत अडचणीच्या काळातही रणजितसिंह देशमुख यांनी काँग्रेसची साथ सोडलेली नाही. त्यांचे राज्यातील काँग्रेस नेत्यांशी अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध आहेत. कार्यकर्त्यांचा मेळाव्यात देशमुख हे जिल्हाध्यक्षपदाचा पदभार लवकरच स्वीकारणार आहेत. या मेळाव्यासाठी पृथ्वीराज चव्हाण, आमदार सतेज ऊर्फ बंटी पाटील, विश्वजित कदम, डॉ. इंद्रजित मोहिते यांच्यासह अनेक मान्यवरांची विशेष उपस्थिती असणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.