Nagar News : नगर जिल्ह्यातील प्रत्येक निवडणुकीत विखे-तनपुरे-कर्डिले गटामध्ये राजकीय संघर्ष पाहायला मिळतो. ग्रामपंचायत निवडणुकीच्या माध्यमातूनदेखील हे गट आमने सामने आल्याचे पाहायला मिळाले. आता ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा धुरळा नुकताच खाली बसला असतानाच सहकारी संस्थेच्या निवडणुकीचा बिगुल वाजू लागले आहेत. राहुरी तालुक्यात 15 सहकारी संस्थांच्या लवकरच निवडणुका होणार आहेत. या सहकारी संस्थांची प्रारूप मतदार यादी सहायक निबंधक तथा तालुका सहकारी निवडणूक अधिकारी दीपक पराये यांनी नुकतीच प्रसिद्ध केली आहे.
सहकारी संस्थांची निवडणूक जरी असली, तरी यानिमित्ताने पुन्हा एकदा राहुरीतील राजकीय वातावरण ढवळून निघणार आहे. सहकारावर वर्चस्व मिळवण्यासाठी सर्वच राजकीय नेते पुन्हा एकदा आमने सामने येण्याची शक्यता आहे. या सहकारी संस्थांमध्ये निवडणुका झाल्यास पुन्हा विखे-तनपुरे-कर्डिले गटात चुरस रंगू शकते.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
सहकारी संस्थांची 30 नोव्हेंबरला प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली असून, सहा डिसेंबरपर्यंत हरकती मागवण्यात आल्या आहेत, तर या हरकतीवरील निर्णय 13 डिसेंबरला होईल. अंतिम मतदार यादी 13 डिसेंबरला प्रसिद्ध होणार असल्याचे निवडणूक अधिकारी यांनी सांगितले. या निवडणुका पुढील वर्षाच्या सुरुवातीला होण्याची शक्यता आहे.
राहुरी तालुका ट्रक ट्रान्सपोर्ट सहकारी संस्था मर्यादित शिवाजीनगर, नवनाथ ग्रामीण बिगर शेती सहकारी संस्था मर्यादित कोल्हार खुर्द, श्री संत गाडगे महाराज सहकारी अदी ग्राहक संस्था मर्यादित, जोगेश्वरी विविध कार्यकारी संस्थेचे सेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादित, राहुरी तालुका राजमाता नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, श्री गणेश सेवक सहकारी पतसंस्था मर्यादित, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, राहुरी तालुका डॉक्टर्स अॅण्ड केमिस्ट अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटी लिमिटेड, लोकमान्य नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित देवळाली प्रवरा, ग्रेड ओकास्टिंग (केएसबीसीआयएनएफ) सेवक सहकारी पतसंस्था मर्यादित, श्री समर्थ बाबूराव पा. महाराज नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित देवळाली प्रवरा, वैभव ग्रामीण बिगर शेतकरी सहकारी संस्था टाकळीमिया, राहुरी मर्चन्ट नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, महिला मर्चन्ट नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, प्रगती ग्रामीण बिगर शेती सहकारी संस्था मर्यादित या सहकारी संस्थांची निवडणूक होणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.