
सोलापूर व मराठवाड्यातील अतिवृष्टी व महापुरामुळे शेतकरी आणि नागरिकांचे मोठे नुकसान झाले असून हजारो कुटुंबे रस्त्यावर आली आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मदत-आवाहनाला प्रतिसाद देत पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने मुख्यमंत्री सहायता निधीस 1 कोटी रुपयांची मदत जाहीर केली.
पूरग्रस्त महिलांसाठी रुक्मिणीमातेची महावस्त्रे प्रसादरूपाने देणे, पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या, लाडूप्रसाद व फूड पॅकेट वाटप अशी अतिरिक्त मदतही मंदिर समितीकडून दिली जाणार आहे.
Pandharpur, 28 September : सोलापूर जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्यात अतिवृष्टी आणि महापुरामुळे सर्वत्र हाहाकार उडाला आहे. सोलापूर जिल्ह्यातील भीमा, सीना आणि माण नदीला आलेल्या महापुरामुळे शेतकरी आणि सर्वसामान्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतातील पिकांसह जमीनही वाहून गेली आहेत, तर घरात पुरामुळे वाहून आलेला गाळ साचला आहे, त्यामुळे नागरिक रस्त्यावर आले आहेत.
पूरग्रस्ताच्या मदतीसाठी पंढरपूर येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने (Vitthal-Rukmini Mandir Samiti) मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी एक कोटी रुपयांची मदत जाहीर केली. तसेच, रुक्मिणी मातेचे महावस्त्रही पूरग्रस्त महिलांसाठी प्रसाद म्हणून देण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून अतिवृष्टी होत आहे. त्यात अनेकांचे घरे, संसार वाहून गेला आहे. पिकांची नासाडी झाली असून शेतजमीनही वाहून गेली आहे. त्यामुळे राज्यातील शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. संकटात सापडलेल्या बळीराजाला मदतीचा हात देण्यासाठी राज्यातील दानशूर, देवस्थाने आदींनी पुढे यावे, असे आवाहन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केले होते.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या आवाहनास पंढरपूरमधील विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने प्रतिसाद दिला आहे. राज्यातील पूरग्रस्तांना मदत मिळावी; म्हणून श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने मुख्यमंत्री सहायता निधीला एक कोटी रुपयांचे साहाय्य देण्याचा निर्णय घेतला आहे. हा एक कोटी रुपयांचा निधी देण्यासोबतच पूरग्रस्त महिलांना रुक्मिणीमातेची महावस्त्रे वाटप करण्याचा निर्णय घेतला.
पंढरपूर येथील मंदिर समितीच्या वतीने पूरग्रस्तांना पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या, लाडूप्रसाद उपलब्ध करून देण्यात येत आहे. पूरग्रस्तांना प्रत्येक वेळी मंदिर समितीकडून फुड पॅकेट वाटप केले जाते. यापूर्वीही आपत्तीच्या काळात मंदिर समितीने राज्याल मदत केली आहे. विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने 2013, 2015, 2018 व 2020 या काळातही मुख्यमंत्री सहायता निधीस प्रत्येकी 1 कोटी रुपयांची मदत दिलेली आहे.
मंदिर समितीची सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या अध्यक्षतेखाली 26 सप्टेंबर रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सभा झाली. या सभेत मुख्यमंत्री सहायता निधीस 1 कोटीची मदत तसेच श्री रूक्मिणीमातेचा प्रसाद म्हणून महावस्त्रे वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.
या सभेला शकुंतलाताई नडगिरे, डॉ. दिनेशकुमार कदम, भास्करगिरी बाबा, संभाजी शिंदे, ज्ञानेश्वर देशमुख जळगांवकर, ॲड. माधवीताई निगडे, प्रकाश जवंजाळ, अतुलशास्त्री भगरे गुरुजी, शिवाजीराव मोरे तसेच कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, प्रभारी व्यवस्थापक पृथ्वीराज राऊत, लेखा अधिकारी मुकेश अनेचा उपस्थित होते.
प्र: मदत निधीस किती रक्कम देण्याचा निर्णय झाला?
उ: मुख्यमंत्री सहायता निधीसाठी 1 कोटी रुपये.
प्र: मंदिर समितीने महिलांसाठी कोणती खास योजना जाहीर केली आहे?
उ: पूरग्रस्त महिलांना रुक्मिणीमातेची महावस्त्रे प्रसादरूपाने दिली जाणार आहेत.
प्र: यापूर्वीही मंदिर समितीने मदत केली आहे का?
उ: हो, 2013, 2015, 2018 आणि 2020 मध्येही प्रत्येकी 1 कोटी रुपये मुख्यमंत्री सहायता निधीस दिले आहेत.
प्र: निर्णय घेण्यासाठी सभा कधी आणि कशी झाली?
उ: 26 सप्टेंबर रोजी गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या अध्यक्षतेखाली व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सभा घेण्यात आली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.