
Satara Politics : वाई तालुक्याच्या राजकारणात मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील आणि खासदार नितीन पाटील यांची एकहाती सत्ता आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली पंचायत समितीवर २००७ पासून सलग तीन निवडणुकांत राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व राहिले आहे. बदलत्या राजकीय परिस्थितीत होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीतील भाजप आणि शिवसेना या पक्षांना सोबत घेऊन बेरजेचे राजकारण करणार की स्वतंत्र निवडणूक लढवून स्वतःची ताकद आजमावणार, याबाबत कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता आहे.
दरम्यान, राष्ट्रवादीला शह देण्यासाठी विरोधक कोणता गनिमी कावा करणार? भाजपचे प्रांतिक सदस्य, माजी आमदार मदन भोसले, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या अरुणादेवी पिसाळ यांच्यासह गावागावातील काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व रिपब्लिकन पक्षाचे पदाधिकारी कोणती रणनीती आखणार?, यावर निवडणुकीची रंगत ठरणार आहे.
तालुक्यात जिल्हा परिषदेचे यशवंतनगर, बावधन, ओझर्डे, भुईंज हे चार गट, तर पंचायत समितीचे अभेपुरी, यशवंतनगर, केंजळ, ओझर्डे, भुईंज, पाचवड, बावधन व शेंदूरजणे असे आठ गण आहेत. मागील निवडणुकीत आमदार मकरंद पाटील यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्हा परिषदेने चार गट आणि पंचायत समितीचे सहा गण जिंकले. काँग्रेसने पंचायत समितीच्या दोन गणांवर विजय मिळविला होता. त्यानंतर मार्च २०१७ ते सप्टेंबर २०१८ या काळात भुईंजच्या रजनी भोसले, तर त्यानंतर मार्च २०२२ अखेरपर्यंत पाचवडच्या संगीता चव्हाण यांनी सभापतिपद भूषविले. केंजळचे अनिल जगताप व अभेपुरीचे विक्रांत डोंगरे यांनी उपसभापतिपदावर काम पाहिले.
दुफळीनंतर बदलली समीकरणे राष्ट्रवादी काँग्रेसमधील दुफळीनंतर विधानसभेच्या तोंडावर राज्यात झालेल्या घडामोडींमुळे तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलली आहेत. विधानसभेत सलग चौथ्यांदा पोहोचलेले आमदार मकरंद पाटील महायुतीच्या सत्तेत मदत व पुनर्वसन विभागाचे मंत्री आणि बुलडाण्याचे पालकमंत्री झाले. तर जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील राज्यसभेचे खासदार झाले आहेत. पाटील बंधूंचा गावागावात, तळागाळात असलेला संपर्क, कार्यकर्त्यांचा मोठा संच, सर्वच संस्थांतील सत्ता यांचा मुकाबला विरोधक कसे करणार? यावर जय- पराजयाची गणिते अवलंबून असतील. खुल्या प्रवर्गात तालुक्यात इच्छुकांची संख्या मोठी असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी न मिळाल्याने विरोधकांकडे जाऊन उमेदवारी मिळविण्याचाही प्रयत्न असणार आहे.
भाजपमध्ये चैतन्य, शिवसेनाही सक्रिय :
किसन वीर साखर कारखान्यात झालेल्या सत्तांतरानंतर माजी आमदार मदन भोसले यांनी अनेकदा तटस्थ भूमिका घेतल्याने भाजप बॅकफूटवर आल्याचे चित्र होते; परंतु आता पुन्हा महायुतीच्या माध्यमातून राज्यात सत्तेवर असल्याने भाजप कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य दिसून येत आहे. काँग्रेसचे दीपक ननावरे हे मदन भोसले यांच्यासोबत भाजपवासी झाले असून, ते भाजपच्या तालुकाध्यक्षपदाची धुरा सांभाळत आहेत.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटाचे कार्यकर्ते सक्रिय झाले असून, सभासद नोंदणी, शाखा उद्घाटन व ग्रामीण भागातील सर्वसामान्य लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी ते पुढाकार घेताना दिसत आहेत. पश्चिम भागातील नेते बापूसाहेब शिंदे यांचे चिरंजीव विकास शिंदे या पक्षाचे जिल्हा उपप्रमुख झाले आहेत.
विरोधकांच्या भूमिका गुलदस्त्यात :
लोकसभा निवडणुकीनंतर शरद पवार गटात आलेले चैतन्य विधानसभेतील पराजयानंतर दिसत नाही. पंचायत समितीचे माजी उपसभापती अनिल जगताप यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडे विधानसभेची उमेदवारी मागितली होती; परंतु उमेदवारी मिळाली नाही. त्यांनी महाविकास आघाडीचे काम केले. तालुका सूतगिरणीचे अध्यक्ष शशिकांत पिसाळ यांच्या पत्नी माजी जिल्हा परिषद अध्यक्षा अरुणादेवी पिसाळ यांनी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून विधानसभेची निवडणूक लढवली होती. त्यामुळे पाटील आणि पिसाळ गटामध्ये फारकत निर्माण झाल्याचे दिसते.
तर तालुक्यात ऋतुजा शिंदे या एकमेव काँग्रेस नेत्या राहिल्या होत्या. त्यांचे पती काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष विराज शिंदे तसेच यशराज मोहन भोसले यांनी विधानसभेला महाविकास आघाडीला साथ दिली होती. यावेळी काँग्रेस पक्षाने सर्व स्थानिक संस्थांच्या निवडणुका पक्षाच्या चिन्हावर लढण्याचा निर्णय घेतला असून, तसा ठराव केला आहे. याशिवाय शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष) पक्षाची भूमिका अद्याप गुलदस्त्यात आहे.
सत्तेचे केंद्रीकरण कळीचा मुद्दा :
तीन वर्षांपूर्वी किसन वीर साखर कारखान्यात सत्तांतर झाले. त्यावेळी कारखान्याचे अध्यक्ष मंत्री मकरंद पाटील, तर खासदार नितीन पाटील संचालक झाले. त्यामुळे सर्वच संस्थांतील सत्तास्थाने एकाच कुटुंबात, सत्तेचे केंद्रीकरण हा मुद्दा विरोधक पुढे रेटण्याची शक्यता आहे. त्याला सत्ताधारी कसे तोंड देतात आणि विरोधक हा मुद्दा कसा पुढे नेतात, त्यावरच जनतेने त्याला किती महत्त्व द्यावे, हे ठरणार आहे.
सभापतिपदासाठी आशा पल्लवित :
सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुले झाल्याने अनेक इच्छुकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. माजी उपसभापती राष्ट्रवादीचे विक्रांत डोंगरे, आनंद चिरगुटे, महादेव मस्कर, भाजप युवा महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा डॉ. सुरभी भोसले, मदन भोसले यांचे पुतणे ईशान भोसले हे राजकीय इनिंग सुरू करण्याच्या प्रयत्नात असतील. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष (कै.) नारायणराव पवार यांचे पुतणे, भाजपचे जयवंत पवार, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे माजी उपसभापती अनिल जगताप, माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीप बाबर आदी इच्छुक असणार आहेत. ते पंचायत समिती किंवा जिल्हा परिषदेच्या मैदानात उमेदवार असू शकतात. याशिवाय नवखे चेहरेही रिंगणात उतरण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.